कसोटी की क्रिकेटला ओहोटी?

    09-Jan-2020
Total Views |

vedh_1  H x W:


फुटबॉलनंतर जगभरात सर्वाधिक पसंती असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या खेळात सध्या कसोटीच्या सामन्यांबाबत समीक्षकांकडून विविध मत-मतांतरे व्यक्त केली जात आहेत. कसोटी क्रिकेटचे अस्तित्व टिकविण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नुकत्याच एका समितीची नियुक्ती करत हा सामना पाचऐवजी चार दिवसांचा कसा करता येईल, याबाबत अहवाल सोपविण्यास सांगितले आहे. समितीच्या अहवालानंतर याबाबत नियम घेण्यात येणार असल्याचे आयसीसीने सांगितले. मात्र, कसोटी सामना पाचऐवजी चार दिवसांचा करण्याबाबत आयसीसीने पावले उचलण्यास सुरुवात केल्यानंतर माजी क्रिकेटपटूंसह अनेक क्रीडासमीक्षकांनी याबाबत आपली मते व्यक्त करत या प्रक्रियेला आपला ठाम विरोध दर्शविला. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी हा निव्वळ मूर्खपणा असल्याचे मत व्यक्त केले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या वक्तव्यांचे दाखले देत पाटील यांनी कसोटी क्रिकेट चार दिवसांची करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. कसोटी या प्रकारात खरी कसोटी असते ती म्हणजे खेळाडूची. कसोटीतील पहिला दिवस हा तेज गोलंदाजांचा असतो. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत खेळपट्टीचे स्वरूप बदलत जाते. पहिल्या दिवशी तेज गोलंदाजांसाठी पोषक मानली जाणारी ही खेळपट्टी उत्तरार्धात फिरकी गोलंदाजीसाठी मदतीची ठरते. त्यामुळे फलंदाजांसह गोलंदाजांना प्रत्येक दिवशी आपल्या खेळण्याच्या शैलीत बदल करावा लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत खेळताना खेळाडूंचा कस लागतो. हेच खरे कसोटी क्रिकेटचे वैशिष्ट्य आहे. अवघ्या चार दिवसांत कसोटी सामना संपण्यास सुरुवात केल्यावर पाचवा दिवस जो फिरकी गोलंदाजांसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो, त्या दिवसाचे काय? अनेकदा वेळेअभावी कसोटी क्रिकेटचे सामने पूर्ण न झाल्याने ते अनिर्णित (ड्रॉ) राहतात. सामने अनिर्णित राहिल्यानंतर क्रीडा रसिकांच्या पसंतीस तो उतरत नाही. परिणामी, कसोटी क्रिकेट कंटाळवाणी वाटते. पाच दिवस कमी पडत असताना सामना चार दिवसांवर आणल्यास अनेक सामने अनिर्णित राहण्याची भीती आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटबाबतचा हा निर्णय क्रीडारसिकांच्या आनंदाची ओहोटी तर ठरणार नाही ना, येथेही त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.



ज्याचे काम त्यानेच करावे!

भारतीय क्रिकेट संघात अनेक आमूलाग्र बदल घडविणारा कर्णधार म्हणून नाव घ्यायचे झाल्यास यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचेच नाव योग्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २००७ साली विश्वचषक स्पर्धेत दुबळ्या बांगलादेशविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल घडले. तत्कालीन प्रशिक्षकांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर संघाच्या कर्णधारपदी यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याची नियुक्ती करण्यात आली. राहुल द्रविडने कर्णधारपदावरून राजीनामा दिल्यानंतर धोनीपेक्षाही अनेक अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात होते. मात्र, त्या सर्वांना डावलून धोनीकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले. २००७ सालीच टी-२० ची पहिली विश्वचषक स्पर्धा भरविण्यात आली. अशा महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक परिस्थितीत कर्णधारपदाची धुरा पहिल्यांदाच धोनीच्या खांद्यावर सोपविण्यात आली. धोनीने ही परिस्थिती योग्यरित्या हाताळत भारताला पहिला टी-२० विश्वचषक जिंकून दिला. त्यानंतर आशिया चषक, विविध परदेशी दौरे आदींमध्येही भारतीय संघाने त्याच्याच नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केली. २०११ साली भारताने विश्वचषक जिंकला तोही धोनीच कर्णधारपदी असताना. असा हा धोनी वयाच्या अडतिशीत आल्यानंतर त्याच्या निवृत्तीबाबत वारंवार वावड्या उठवल्या जात आहेत. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी याबाबत भाष्य करत धोनी लवकरच निवृत्ती स्वीकारू शकतो, असे संकेत दिले. एकदिवसीय क्रिकेटमधून धोनी लवकरच निवृत्ती स्वीकारू शकतो, असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले. त्यांच्या या विधानानंतर धोनीच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांनी पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात जोर धरला आहे. २००७ नंतर निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीत धोनीने स्वतःला सिद्ध केले. त्यानंतर जवळपास सलग दहा वर्षांहून अधिक काळापर्यंत यशस्वीरित्या नेतृत्व करत भारतीय संघाला विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून दिले. अशा या धोनीला आपल्या निवृत्तीबाबत निर्णय घेताना अडचणी निर्माण होतील, याबाबत शंका नाही. याबाबतही तो निर्णय घेण्यास सक्षम असून निवृत्तीचा निर्णय त्यानेच जाहीर करावा, अशी मागणी क्रिकेटरसिकांची आहे. त्यामुळे ज्याचे काम त्यानेच करावे, अशी अपेक्षा क्रीडारसिकांची आहे.

- रामचंद्र नाईक

अग्रलेख
जरुर वाचा
काँग्रेसमधल्या

काँग्रेसमधल्या 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, महत्त्वाच्या पदावर पाणी सोडलं! सांगितलं 'हे' कारण...

(Anand Sharma Resigns As Chairman Of Congress Foreign Affairs Department) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी दि. १० ऑगस्ट रोजी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी, त्यासाठी आपण हे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा प्रदीर्घ काळापासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121