मुंबई : ऑनलाईन फूड डिलिव्हर कंपन्यांनी दिलेल्या भरगोस सवलतींमुळे प्रसिद्ध झालेल्या फूड डिलिव्हरी कंपन्यांनी आता आपला हात आखडता घेतला आहे. परिणामी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. याचा फटका नियमित ग्राहकांना बसला असून पूर्वीप्रमाणे हॉटेलमध्ये फोन करून जेवण मागविण्याचा जूनाच पर्याय स्वीकारल्याचा कल दिसून येत आहे. ऑर्डर डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीवर याचा परिणाम जाणवू लागला आहे. त्यामुळे कंपन्यांनी पुन्हा रॉयल्टीवर सुट देण्याची सुरुवात केली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार, झोमॅटो, स्वीगी आदी कंपन्यांच्या विक्रीत ५ ते ६ टक्क्यांची घट झाल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. झोमॅटोतर्फे ऑन टाईम डिलिव्हरीची सुविधाही देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना १० रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. ठरलेल्या वेळेत खाद्यपदार्थ न मिळू शकल्यास ग्राहकांकडून कुठलेही शुल्क आकारले जाणार नाहीत. झोमॅटोने गोल्ड मेंबरशीपमध्येही वाढ केली आहे. याशिवाय अंतरानुसार डिलिव्हरी चार्ज लागू केला जाणार आहेत. डिलिव्हरीसाठी १६ ते ४५ रुपये अतिरिक्त घेतले जाणार आहेत. स्वीगीतर्फेही डिलिव्हरी चार्ज आकारला जाणार आहे.
याला पर्याय म्हणून ग्राहकांनी आता जवळच्या रेस्टॉरंटद्वारे खाद्यपदार्थ मागवण्याचा पर्याय निवडला आहे. ग्राहकांना हॉटेल रेस्टॉरंटद्वारे ऑनलाईन कॅश पेमेंट आणि कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय दिला जात आहे. तसेच जवळच्या हॉटेलद्वारे खाद्यपदार्थ मागवल्यामुळे वेळेत अन्न घरपोच मिळत आहे. ऑनलाईन डिलिव्हरी करताना पॅकींगवर होणारा खर्च वाचल्याने ग्राहकांना हा पर्याय जवळचा वाटत आहे.