सात्विकराज-चिरागला थायलंड ओपनचे विजेतेपद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Aug-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारताच्या सात्विकराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावून इतिहास रचला. सात्विकराज आणि चिराग 'सुपर टूर्नामेंट ५००' प्रकारात अव्वल येणारी पहिलीच भारतीय जोडी ठरली. या जोडीने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनच्या ली जुन हुई आणि लियू यू चेन या जोडीचा २१-१९, १८-२१, २१-१८ अशा फरकाने पराभव केला. हा सामना एक तास रंगला.

 

विशेष म्हणजे, सात्विकराज आणि चिरागने याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत या चिनी जोडीचा सामना करावा लागला होता. त्यावेळी चिनी जोडीने २१-१९, २१-१८ अशा फरकाने विजय नोंदवला होता. थायलंड ओपनमधील अंतिम सामन्याच्या सुरुवातीपासून सात्विकराज आणि चिरागने चांगला खेळ करत आघाडी कायम ठेवली. चिनी जोडीने खेळात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय जोडीने चीनच्या जोडीला संधी दिली नाही. मध्यतरानंतर चीनी जोडीने भारतीय जोडीशी १५-१५ बरोबरी केली. पण, सात्विकराज आणि चिरागने प्रयत्नांची शर्थ करत पहिला सेट जिंकला.

 

दुसऱ्या सेटच्या सुरूवातीला भारतीय जोडीने पुन्हा ५-२ अशी आघाडी केली. मात्र, जोरदार पुनरागमन करत चीनच्या जोडीने २१-१८ अशा फरकाने दुसरा सेट खिशात घातला. तिसऱ्या सेटमध्ये चिनी जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर सात्विकराज आणि चिराग यांनी खेळात सुधारणा करत तिसरा सेट आपल्या नावे करून थायलंड ओपनच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

@@AUTHORINFO_V1@@