म्युच्युअल फंड क्या है? (भाग १)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Aug-2019
Total Views |
 



मागच्या पंधरवाडयात आर्थिक तसेच राजकीय पटलावर अनेक घडामोडी झाल्या. सिसीडीचे प्रवर्तक सिद्धार्थ यांचा गूढपणे झालेला मृत्यू. त्याबद्दल समाज माध्यमांवरून आलेल्या सरकारी धोरणांवर सूचना वजा टीका पासून आयुष्यात मित्र किती महत्वाचे असतात इथपर्यंत.

 

या मैत्रीदिनाला आपण किती मित्रांना फोन करून आठवण काढलीत? अशा विविधांगी प्रतिक्रिया वाचतांना लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे अजून तरी सिद्धार्थ यांच्या कुटुंबियांकडून आलेली अधिकृत प्रतिक्रिया माझ्या वाचनात आली नाही. त्यानंतर आले केंद्र सरकारने 'कलम ३७०''३५ अ' हटविण्याचे दोन्ही सभागृहात पारित केलेले विधेयक. त्यावरून तर एवढा जल्लोष झाला कि, काश्मिरी नागरिक एवढे दिवस पारतंत्र्यात राहत होते आणि याची जाणीव त्यांनाच नव्हती. त्यादिवशी 'बार कौन्सिल ऑफ इंडिया'चा देखील भारतात कायदयाची जाण फक्त न्यायव्यवस्थेला असते, हा भ्रम पहिल्यांदाच दूर झाला असेल. त्याच दिवशी श्रीमती सुषमा स्वराज या राजकारणातील विदुषीचं अकाली निधन सर्वांना अतीव वेदना देणारं होतं.

 

आर्थिक आघाडीवर बघता विदेशी गुंतवणूकदारांनी कमविलेल्या भांडवली नफ्यावर अर्थमंत्र्यांनी कर रचनेत बदल केल्यामुळे गटांगळ्या खाणारा बाजार, एकाच सत्रात सकारात्मक बातमीने ६०० अंकांनी वधारला. बाजारात खरेदी-विक्री करणारे म्हणजे ट्रेडर्स गुंतवणूकदाराला भय किंवा लालूच दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या सापळ्यात तुटपुंजा गुंतवणूकदार अडकतो आणि नुकसान झालं कि बाजाराला दोष देत असतो. ट्रेडर्स टेक्निकली तर इन्व्हेस्टर्स फंडामेंटली बोलत असतात. ट्रेडर्स चार्ट तर इन्व्हेस्टर्स ताळेबंद बघतात. मग बाजारात गुंतवणूक करतांना टेक्निकल कि फंडामेंटल पद्धतीने करावी? याचा उलगडा सामान्य बचतकर्त्याला होत नाही. म्हणूनच मग विविध वित्तीय गुतंवणूक साधनं बाजारात उपलब्ध असतात. त्यातील एक म्हणजे म्युच्युअल फंड.

 

म्युच्युअल फंड, विविध गुंतवणूकदारांचा बचत निधी एकत्र करून गुंतवणूकयोग्य एकरकमी स्त्रोत तयार करण्याचे काम करत असतो. शेअर घेऊ कि रोखे कि कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता.

 

म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते. उदाहरणार्थ मुदत ठेव, सोने, चांदी वा इतर धातू. परंतु म्युच्युअल फंडात विविध पर्यायांतून जोखीम व परतावा यांचा मेळ विभागून गुंतवणूक व्यवस्थापन करता येते. म्युच्युअल फंडाच्या ज्या योजना समभाग (Equity Schemes) संलग्न गुंतवणूक करतात त्यांचा जोखीम व परतावा यांचे गुणोत्तर उच्चतम असते. तर ज्या योजना रोखे (Debt Schemes) स्वरूपाच्या साधनांमधे गुंतवणूक करतात त्या जोखीम व परतावा यांचे समतोल गुणोत्तर राखून भांडवलाची सुरक्षितता जपणाऱ्या असतात.

 

म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे ढोबळ फायदे –

१. जोखीम विभागणी – तुम्हाला एकाच वेळी समभाग, रोखे, कमोडीटी अशा विविध साधनांमधे गुंतवणूक करून जोखीम विभागता येते किंवा जोखीम घेऊन अधिकचा परतावा दीर्घकालीन गुंतवणूकीतून मिळविता येतो.

 

२. व्यावसायिक गुंतवणूक व्यवस्थापन – गुंतवणूक हे एक शास्त्र आहे. त्यासाठी कौशल्य आणि पूर्णवेळ काम करावे लागते. तुमच्या छोटयाशा गुंतवणूक रकमेतून तुमच्यासाठी पात्रताधारक संशोधन करणारे फंड व्यवस्थापक अहोरात्र काम करत असतात. एक योजना चालविण्यासाठी होणारा खर्च सर्व गुंतवणूकदारांमध्ये समप्रमाणात विभागला जातो. त्यालाच Total Expense Ratio(TER) म्हणतात.

 

३. विविधता - म्युच्युअल फंडात जर तुमचा गुंतवणूक कालावधी, जोखीम क्षमता आणि अपेक्षित परतावा तुम्हाला निश्चित माहिती असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड नाराज करणार नाही. फक्त मत्ता विभागणी करता आली पाहिजे.

 

४. अनुकुलता - म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे व काढणे अतिशय सुलभ आहे. तुम्ही एक फॉर्म भरून किंवा ऑनलाईन व्यवहार करू शकता. तुम्हाला गुंतवणूक रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी कमाल ३ दिवस लागू शकतात. एका योजनेतून दुसऱ्या योजनेत पैसे देता येतात. तुम्हाला जेवढया रकमेची गरज आहे तेवढीच रक्कम काढू शकता.

 

५. कर सुलभता – जेव्हा तुम्ही वित्तीय साधनांमधून भांडवली नफा कमवितात तेव्हा तुम्हाला कर दायित्व लागू होते. शेअर्सच्या प्रत्येक खरेदी-विक्री व्यवहारावर तुम्हाला कर लागू शकतो. म्युच्युअल फंडात मिळालेल्या भांडवली नफ्यावर गुंतवणूक कालावधी व रक्कम यांचे गुणोत्तर तपासून कर भरावा लागू शकतो. कर बचत योजनेत गुंतवणूक केल्यास कलम 80C चा लाभ घेता येतो. या गुंतवणूका ३ वर्षांसाठी मुदतबंद असतात.

 

६. पारदर्शी व सुनियंत्रित व्यवसाय - म्युच्युअल फंडात होणारे व्यवहार नियंत्रकाच्या (Security Exchange Board Of India) निगराणीखाली व कायद्याच्या बंधनाला अधीन राहूनच होत असतात. प्रत्येक योजनेचे दैनंदिन मूल्य म्हणजेच NAV (Net Asset Value) प्रति युनिट रोज जाहीर करणे तसेच योजनेचा पोर्टफोलिओ प्रत्येक महिन्यास गुंतवणूकदारास सादर करणे बंधनकारक असते.

 

७. विकल्प उपलब्धता –

अ) सरकारी रोखे: प्रत्येक वैयक्तिक गुंतवणूकदार सरकारी रोखे खरेदी करू शकत नाही परंतु म्युच्युअल फंडाच्या योजनांमधून त्यांना सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

 

आ) आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे शेअर्स – सामान्य गुंतवणूकदारास विविध देशांत ट्रेडिंग करणे सहज शक्य नसते. आंतरराष्ट्रीय फंडांच्या माध्यमातून तेथील कंपन्यांमधे गुंतवणूक करून भांडवलवृद्धी करू शकतात.

 

८. भांडवल सुरक्षितता - म्युच्युअल फंड कंपन्या भांडवल सुरक्षिततेची कुठलीही शाश्वती देत नाही. कारण या गुंतवणूका समभाग संलग्न असल्यास बाजारातील चढ उताराची जोखीम नैसर्गिकरीत्या असतेच. काही योजना फक्त सरकारी रोखे किंवा अल्पमुदतीसाठी असलेल्या तारण रोख्यांमधे गुंतवणूक करतात. अशा योजनांमधे भांडवल सुरक्षिततेची शक्यता जास्त असते.

 

९. महागाई दरावर मात - म्युच्युअल फंड योजना महागाई दरावर मात करण्याची कुठलीही हमी देत नाही. परंतु चांगल्या रोखे किंवा समभाग योजनांमधे दीर्घकालीन गुंतवणूक सुरु ठेवल्यास महागाई दरावर मात मिळविणे शक्य आहे.

 

१०. रोकड सुलभता – सेबीच्या नियमानुसार म्युच्युअल फंडाच्या सर्व योजना रोकड सुलभ असतात. फक्त हि रोकड सुलभता योजनेच्या प्रकारावर अवलंबून असते. गुंतवणूकीसाठी कायम खुली (Open Ended) व मुदत बंद (Close Ended) योजना असे दोन प्रकार असतात. कायम खुल्या योजनेतून पैसे कधीही काढता येतात तर मुदत बंद योजनेचा ठरवून दिलेला कालावधी पूर्ण होईपर्यंत थांबणे फायदयाचे असते. मुदत बंद योजना शेअर बाजारात नोंदणी करणे बंधनकारक असल्यामुळे तुम्ही दलालामार्फत युनिट्सची विक्री करू शकतात.

 

११. मानांकन पद्धती - म्युच्युअल फंडाच्या योजनांना कुठलेही मानांकन (Credit Rating) देण्याची अधिकृत संस्था अथवा नियमावली नाही. संकेतस्थळांवर उपलब्ध असलेले मानांकन प्रत्येक अभ्यासकाचा वैयक्तिक अभिप्राय असून त्याला कुठलीही अधिकृत मान्यता नियंत्रकांकडून नाही. मानदंड (Benchmark) हे योजनेचा परतावा तपासून बघण्यासाठी वापरले जाते.

 

१९९१ सालापर्यंत म्हणजेच मुक्त आर्थिक धोरणचा स्विकार होईपर्यंत आपली अर्थव्यवस्था उदारीकरणाच्या (Liberalization) समाजवादी विचारांवर आधारित होती. नंतर खासगीकरण (Privatization) या उद्दिष्टावर सुरु झालेले आपले मार्गक्रमण या दशकात जागतिकीकरणाच्या (Globalization) टप्प्यावर येऊन पोहचले आहे. भारताच्या ७३व्या स्वातंत्र्यदिनी आपला वैयक्तिक आर्थिक स्तर तपासणे, हे देखील देशाच्या ढोबळ उत्पन्नात वाढ करण्यासाठी गरजेचे आहे. दूरसंचार क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आपला नवउद्यमी युवावर्ग जागतिकीकरणाच्या स्पर्धेत सक्षमपणे उभा ठाकला आहे. त्यांच्या स्टार्ट अपची फळं सर्वांनाच चाखायची असतील तर आपण देखील स्टार्ट घेणे गरजेचे आहे.

 

मी, या रक्षाबंधनाला माझ्या बहिणींना अर्थसक्षम बनविण्यासाठी भेट म्हणून SIP सुरु करून दिली.

 

अतुल प्रकाश कोतकर

9423187598

[email protected]

(लेखक आर्थिक सल्लागार असून त्यांच्याशी संपर्क साधून गुंतवणूक विषयक मार्गदर्शन मिळवू शकतात.)

@@AUTHORINFO_V1@@