वसुंधरेचा संवर्धक आणि रक्षक वराह देव

    25-Aug-2025
Total Views |


वराह अवताराचा इतिहास

वराह अवतार हा भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार आहे. यामध्ये विष्णूंनी वराह म्हणजे रानडुकराचे रूप धारण करून पृथ्वीचे रक्षण केले अशी पौराणिक मान्यता आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला विष्णूने वराह अवतारात जन्म घेतला. एकदा हिरण्याक्ष नावाच्या दैत्याने देवांवर विजय मिळवून पृथ्वीला पाताळात ओढून नेले. त्यामुळे देवतांनी भगवान विष्णूंना पृथ्वी देवीला (भूमीला) वाचवण्याची प्रार्थना केली. विष्णूंनी वराहाचे रूप धारण केले आणि समुद्रात प्रवेश करून पृथ्वीला आपल्या दातांवर उचलून सुरक्षित स्थानी ठेवले. यानंतर विष्णूंनी हिरण्याक्षाबरोबर युद्ध करून त्याचा वध केला. वराह अवतारामुळे भू-देवीचे रक्षण झाले, त्यामुळे हा अवतार "भू-पालनकर्ता" म्हणून ओळखला जातो. या घटनेमुळे पृथ्वीवर पुन्हा जीवनाची सुरुवात होऊ शकली असे देखील मानले जाते. या वसुंधरेचा वराह देव हा संवर्धक आणि रक्षक असून सर्व प्रकारच्या दृष्ट प्रवृत्तीचा नाश करणारा आहे. आपले सर्वच सण उत्साहात साजरे झाले पाहीजेत. आपल्या भावी पिढीला आपल्या सण उत्सवांविषयी, आपल्या इतिहासाविषयी माहिती मिळाली पाहीजे. भारतीय पौराणिक कथा आणि लोकसाहित्यामध्ये दैवतांचे अवतार नेहमीच धर्म, नैतिकता, निसर्ग रक्षण आणि समाजातील संतुलन यांचे प्रतीक मानले जातात.

चित्रपटामध्ये वराह अवतार

वराह अवताराचा प्रभाव २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला कन्नड चित्रपट “कांतारा” मध्ये स्पष्टपणे दिसतो. वराह अवताराने पृथ्वीचे रक्षण केले तसेच कांतारामध्ये दैवत त्याचं गाव आणि निसर्गाचे रक्षण करते. या चित्रपटातील वराह रूपम् हे गाणं देखील प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

भारतामधील वराह मंदिरे

दक्षिणेमध्ये अनेक वराहस्वामी मंदिरं पाहायला मिळतात. तिरुपती बालाजी मंदिरात जाण्याआधी प्रथम वराहस्वामीचे दर्शन घेणे आवश्यक मानले जाते. कारण पुराणकथेनुसार तिरुमला पर्वताचं स्वामित्व वराहदेवाकडे होते. भगवान वेंकटेश्वराने वराहस्वामींची परवानगी घेतल्यावरच येथे वास केला. त्यामुळे भक्त आधी वराहस्वामीचे दर्शन घेऊन नंतरच श्री वेंकटेश्वराचे दर्शन घेतात. वराह अवताराने दक्षिण उत्तर भारत जोडल्याचे दिसते. मध्यप्रदेशच्या खजुराहोतील वराह मंदिरात एक दगडी वराह मूर्ती आहे. संपूर्ण मूर्तीवर विविध देवदेवतांच्या नक्षी कोरलेल्या आहेत. हे मंदिर ९ व्या शतकातील चंदेल राजांच्या काळातील मानले जाते. या दिवशी मूर्तीवर पंचामृत आणि पूजा विधी केली जाते. वराह स्तोत्र व विष्णू सहस्रनाम पठण केले जाते. भूमीची व निसर्गाची पूजा करून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प घेतला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी भक्त उपवास करतात. काही ठिकाणी पुराणपठण व कथा-कीर्तन यांचे आयोजन केले जाते. वराह अवतार हा फक्त देवकथेतील प्रसंग नाही, तर जीवनाला दिशा देणारा आदर्श आहे. अशीच वराह देवतेची मंदिरं महाराष्ट्रातील रामटेकमध्ये, कर्नाटक मधील हलासीत, मध्यप्रदेशातील इरई गावाजवळील उदयगिरी गुफेत, उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ परिसरात पाहायला मिळतात.