व्यापारयुद्ध आणि अवमूल्यन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Aug-2019   
Total Views |



चीनच्या धटिंगणपणातूनच अमेरिकेबरोबर सुरू झालेले व्यापारयुद्ध आता त्या देशालाच अडचणीत आणत असल्याचे दिसते. नुकतेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनबद्दल वक्तव्य केले, जे चांगलेच परिणामकारक ठरू शकते. "चीन व्यापारयुद्धावर तोडगा काढू इच्छितो, कारण कित्येक दशकांनंतर त्यांच्यासाठीचे हे सर्वात वाईट वर्ष आहे. परंतु, चीनची अवस्था यापेक्षाही वाईट आणि अधिकाधिक वाईट होणार आहे. हजारो कंपन्या चीनमधून पलायन करत आहेत, आपला व्यवसाय बंद करत आहेत.

 

म्हणूनच चीन आता समझोत्याची गोष्ट करत असल्याचे दिसतो. मी मात्र चीनबरोबर कोणत्याही वाटाघाटी करायला वा व्यापारयुद्धातून मार्ग काढायला तयार नाही," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. कोणत्याही विषयावर आक्रस्ताळेपणे व्यक्त होण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची जुनीच सवय आहे. आताही ट्रम्प तसेच काहीसे बोलल्याचे दिसत असले तरी ते आपल्या व चीनमधील आर्थिक समस्येवर उत्तर शोधायला तयार नसल्याची खात्रीही यातून पटते.

 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानालाही गेल्या कित्येक महिन्यांतील घडामोडींची पार्श्वभूमी आहे. दोन्ही देशांतील व्यापारयुद्ध तर ट्रम्प यांच्या वक्तव्याला कारणीभूत आहेच, पण नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही चीनबद्दल अंदाज वर्तवला. ‘आयएमएफ’च्या भाकितानुसार चीनच्या जीडीपीमध्ये आणखी घट होणार असून ती ०.८० टक्क्यांपर्यंत असेल. ‘आयएमएफ’ने चिनी अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दरही कमी करत ६.२ टक्क्यांवर आणला. तत्पूर्वी अमेरिकेने चीनमधून आयात केल्या जाणार्‍या ३०० अब्ज डॉलसपर्यंतच्या सामानावर १० टक्के आयात शुल्क लावले आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १ सप्टेंबरपासून करण्यात येईल. ‘आयएमएफ’ने यावरून असाही इशारा दिला की, अमेरिकेने चीनच्या उर्वरित सामानावर २५ टक्क्यांपयर्र्ंत आयात शुल्क लावले, तर चीनची आर्थिक स्थिती आणखी बिकट होईल.

 

तसेच दोन्ही देशांतील व्यापारयुद्धाचा विपरित परिणाम वैश्विक अर्थव्यवस्थेवर होईल, अशी भीतीही ‘आयएमएफ’ने व्यक्त केली. सोबतच अमेरिका व चीनने सामंजस्याने परस्परांतील तणाव मिटवण्याचेही आवाहन केले. अमेरिका मात्र चीनबरोबरील व्यापारलढ्याला आणखी लांबवू इच्छिते. कारण, ट्रम्प यांच्या मते, चीनबरोबरील व्यापारयुद्धामुळे अमेरिकेचा फायदा होत आहे, तर चीनचे नुकसान. त्यामुळेच त्यांनी चीनशी सुरू असलेल्या व्यापारयुद्धावर ठाम राहत तो देश अधिकाधिक गाळात रुतेल, असे वक्तव्य केले. आता याच मालिकेतील एक भाग म्हणून अमेरिका सप्टेंबर महिन्यात चीनबरोबर होणारी व्यापारविषयक चर्चाही रद्द करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चीनही अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धातून बाहेर पडण्यासाठी काही ना काही पावले उचलताना दिसतो. नुकतेच चीनने आपल्या ‘युआन’ या चलनाचे ५ ते २७ टक्के इतके अवमूल्यन केले.

 

जगातील सर्वात मोठा निर्यातक असलेल्या चीनने आपल्या निर्यातदरांतही घट केली आहे. ‘आयएमएफ’ने याची माहिती दिली असून यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अन्य देशांच्या तुलनेत चिनी सामान किमान किमतीत उपलब्ध होईल. अर्थात याचा फायदा चीनला आपली विक्री वाढवण्यात होईल. अशाप्रकारे चीन अमेरिकेकडून लावल्या जाणार्‍या अधिकच्या आयात शुल्कामुळे होणार्‍या तोट्यातून वाचू शकतो. परंतु, यामुळे वैश्विक चलनयुद्धाची स्थितीही निर्माण होऊ शकते. कारण, चीनच्या चलन अवमूल्यनाचा परिणाम इतर देशांच्या मालावर होईल व ते देशही आपली विक्री वाढवण्यासाठी आपल्या चलनाचे अवमूल्यन करतील!

 

उल्लेखनीय म्हणजे, चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यावर टीकाही केली. ट्रम्प यांनी चीनची, ‘चलनात फेरफार करणारा देश’, अशी संभावना केली. सोबतच, "असे करूनही चीनला त्याचा काहीही फायदा होणार नाही," असेही म्हटले. याचा अर्थ अमेरिका चीनविरोधत इतरही काही पावले उचलू शकते, असाही होतो. दरम्यान, चीन व अमेरिकेतील व्यापारयुद्धाचा आणि आता चीनच्या चलन अवमूल्यनाचा वाईट प्रभाव भारतीय अर्थव्यवस्थेवरही पडू शकतो. त्यामुळेच आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ, भारतानेही आपल्या चलनाचे अवमूल्यन करायला हवे, असा सल्ला देत आहेत! परंतु, त्यावर काय निर्णय घ्यायचा यासंबंधीचा विचार केंद्र सरकारच करू शकते.

 
 
@@AUTHORINFO_V1@@