राहुल गांधींचा उद्दामपणा ; म्हणे मी दोषी नाहीच...

    04-Jul-2019
Total Views |

 

 

रा. स्व. संघ अब्रुनुकसानी खटल्यात राहुल गांधी आणि सीताराम येचुरी यांना जामीन मंजूर

 

मुंबई : रा. स्व. संघाची बदनामी केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरूद्ध येथील माझगाव न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यासंदर्भात राहुल गांधी आज स्वतः न्यायालयात उपस्थित राहिले. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून, आपण दोषी नसल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. राहुल गांधी यांची न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर सुटका केली आहे. काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्यासाठी जामीन अर्ज दाखल केला. या खटल्याची पुढील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.

 

गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केल्याप्रकरणी राहुल गांधी व सीताराम येचुरी यांच्याविरूद्ध हा खटला दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्याप्रमाणेच सीताराम येचुरी यांनाही १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. येथील वकील आणि संघ कार्यकर्ते धृतिमान जोशी यांनी सप्टेंबर २०१७मध्ये हा खटला दाखल केला होता.

 

हिंदुत्वविरोधी लिखाण करणाऱ्या व डाव्या विचारांच्या कट्टर समर्थक लेखिका-पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी हत्या झाली होती. ही घटना घडून २४ तास उलटण्याच्या आतच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. तर, संघाच्या विचारसरणीतून संघ कार्यकर्त्यांनी गौरी लंकेश यांची हत्या केली, असा आरोप सीताराम येचुरी यांनी एका चर्चासत्रामध्ये केला होता. या विधानांवर आक्षेप घेऊन अॅड. धृतिमान जोशी यांनी राहुल गांधी व सीताराम येचुरी यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

 

भिवंडी न्यायालयात शनिवारी सुनावणी

 

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडी येथील आपल्या प्रचारसभेत काँग्रेसचे तत्कालीन उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधींजींची हत्या रा. स्व. संघानेच घडवून आणली’, असे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याविरूद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भिवंडी तालुका कार्यवाह राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्याविरूद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी येत्या ६ जुलै रोजी भिवंडी सत्र न्यायालयात होणार आहे. ॲड. गणेश धारगळकर आणि ॲड. नंदू फडके हे राजेश कुंटे यांचे वकील असून ॲड. नारायण अय्यर हे राहुल गांधी यांची बाजू मांडणार आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121