नवतेची वहिवाट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jul-2019
Total Views |




‘गेम ऑफ थ्रोन्स’ सारखी मालिका जगभर लोकप्रिय होते, ती तिच्या उच्च निर्मितीप्रक्रियेमुळे. नवमाध्यमांच्या आशयनिर्मितीच्या कामात भारत म्हणून आपण कुठे आहोत, याचा विचार आपल्याला कधीतरी गांभीर्याने करावाच लागेल.

 

आपल्या आठव्या सिझनमुळे चर्चेत आलेल्या आणि जगभरातल्या वाहिनीविश्वात अग्रस्थानी येऊन बसलेली वेबसिरीज म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’. ‘हॉट स्टार’ या अमेरिकेत लोकप्रिय असलेल्या अ‍ॅक्शन दूरचित्रवाहिनीने १७ एप्रिल, २०११ रोजी अमेरिकेत १० भागांचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’चा पहिला सिझन प्रकाशित केला आणि जगभरातल्या वाहिनी विश्वात खळबळ माजली. तोपर्यंत वाहिन्यांवर अशा प्रकारे चाहतावर्ग निर्माण व्हायला सुरुवात झाली नव्हती. आज हा सगळा तपशील समोर येण्याचे कारण म्हणजे ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या कलाकरांचे अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या ‘अ‍ॅमी’ पुरस्कारांसाठी झालेले नामांकन. संपूर्ण जगावर राज्य करणारे एक राजसिंहासन व त्यावर आपला हक्क सांगण्यासाठी झगडणारी सात-आठ राजघराणी असा या कथानकाचा मुख्य गाभा. यात अनेकांचा होणारा उत्कर्ष व अपकर्ष. बदलत्या भावभावना. मानवी संबंध या सगळ्यावर आधारलेली ही वेबसिरीज.

 

गेम ऑफ थ्रोन्सगाजण्याचे अजून एक कारण म्हणजे यात वापरण्यात आलेले स्पेशल इफेक्ट्स. डनायरसला आपली आई मानून तिच्या यशापयशाचे साथीदार झालेले ड्रॅगन. मूल्यांची जपणूक करण्यासाठी कटिबद्ध असलेला जॉन स्नो आणि अशी अनेक कितीतरी पात्रे ‘गेम ऑफ थ्रोन्स’मध्ये आपल्याला भेटत राहातात. भारतीय प्रेक्षक सहज स्वीकारू शकणार नाही, इतकी लैंगिकता आणि हिंसादेखील. तरीसुद्धा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सिरीज आज चर्चेचे कारण ठरते. कारण, मनोरंजनाबरोबरच माध्यमविश्वातील ‘वेबसिरीज’ या प्रकाराला त्याने मिळवून देलेली मान्यता. ‘वेबसिरीज’ हा नवा माध्यम प्रकार आता त्यामुळे जगभरात वेगळ्या पद्धतीने पाहायला सुरुवात झाली आहे. आपल्याला द्यायच्या असलेल्या सामाजिक, राजकीय संदेशांसाठीदेखील वेबसिरीज मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जातील. ‘हॉट स्टार’शी समकक्ष असणार्‍या ‘नेटफ्लिक्स’ या वेबचॅनलवर याच वेळी ‘क्राऊन’ नावाची वेबसिरीज सुरू होती. ‘क्राऊन’ ही व्हिक्टोरिया राणीच्या आयुष्यावर बेतलेली वेबसिरीज. राणीच्या सकारात्मक प्रतिमा निर्मितीसाठी या वेबसिरीजचा वापर केला गेला, असे एक मत या वेबसिरीज बाबतीत व्यक्त केले गेले आहेच.

 

२००५ साली वेबसाईटसाठी मजकूर लिहिणे सुरू झालेले होते. इंटरनेटच्या विश्वात अद्याप मंदगती वाटचाल असल्याने आजच्या इतकी धमाकेदार गती नसली तरी वाटचाल मात्र उत्साहवर्धक होती. पोर्टलविश्वात निर्माण होणारी नवमाध्यमे आपल्या वाचकांना ताब्यात घेत होती. मात्र, त्यांचे अद्याप ‘प्रेक्षक’ झालेले नव्हते. २०००-२००२ सालापर्यंत नावाजलेल्या अशा अनेक संकेतस्थळांचा अंत वेबदुनियेने जवळून पाहिला. इंटरनेटचा स्पीड वाढणे व फोर-जी चा उदय हा वेबविश्वातील घडामोडींचा मुख्य आधार होता. यातून ‘इन्फोटेन्मेंट’ हा नवा माध्यम प्रकार आकाराला आला. आजच्या वेबसिरीजचे भवितव्य त्यातून सुरू झाले. टीव्हीवर एका ठराविक दिवशी ठराविक वेळी दाखविल्या जाणार्‍या मालिका किंवा दररोज चालणारी मालिका या सगळ्याच्या पलीकडे जाऊन वेबसिरीजनी स्वत:चे स्थान निर्माण केले. इथे सिझन व भाग असले तरी तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला वाहिन्यांच्या मर्जीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. मोबाईलवर थ्री-जी किंवा फोर-जी नेटवर्क आल्यामुळे मोबाईलवर हेडफोन लावून वेबसिरीज पाहणार्‍यांची एक पिढीच्या पिढी आज निर्माण झाली आहे.

 

तंत्रज्ञानाची ताकद आणि सृजनाची ताकद यांचा मेळ आणि संघर्ष इथे कसा सुरू असतो, हे पाहणे काहीसे रंजक आहे. मुळात मल्टिमीडिया मजूकर हा दृक्श्राव्य आणि मोबाईलच्या आधारावर कुठेही पाहण्यासारखा, त्यामुळे कुठेही नेता येईल असा. या सगळ्या निर्मितीप्रक्रियेने स्वत:चे असे काही निकषही तयार केले. त्याला तंत्रज्ञानाचा म्हणून एक आयाम आहे. मजकूर जितका लहान तितकाच प्रसारित करायला सोपा, असा एक ठोकताळा माध्यमविश्वात मांडण्यात आला. त्याला अनुसरून अनेक लहानमोठ्या मल्टिमीडिया मजकुराची निर्मिती झालीसुद्धा. मात्र, ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सारख्या एका तासाचा एक भाग आणि असे सत्तरहून अधिक भाग असणारी महाकाय मालिका लोकांनी पाहिली आणि लोकप्रियही केली. मूळ मुद्दा असा की, आता मग यातले योग्य ते काय? या प्रश्नांचे थेट असे उत्तर काही केल्या सापडत नाही. या नव्या माध्यमांच्या मुळाशी गेले की स्पर्धेत उतरलेल्या आणि टिकाव धरून असलेल्या त्याचबरोबर स्वत:चा असा प्रभाव निर्माण करणार्‍या माध्यमांच्या खोलात गेले की, असे लक्षात येते की, अपारंपरिक माध्यमात यश मिळविणारे या क्षेत्रातले बरेचसे खेळाडू पारंपरिक माध्यमातूनच आलेले आहेत. अगदी दिग्दर्शक आणि कलाकारसुद्धा. नवमाध्यमांच्या आगमनामुळे पारंपरिक माध्यमांचा अस्त जवळ आला आहे, असे तर्क मांडणार्‍यांसाठी हा एक प्रकारचा धडाच आहे.

 

भारतासारख्या बहुविध गरजा असणार्‍या लोकांच्या देशात तर ही नवमाध्यमे काही वेगळीच तथ्ये समोर घेऊन येतात. इथे मुद्रित माध्यमांचा वाचकवर्ग वाढतच असतो, पण त्याचबरोबर डिजिटल स्वरूपाची नवमाध्यमे हाताळणारा एक वर्गही निर्माण होतो. या दोन्ही प्रकारांत रस असलेला एक वर्गही पुन्हा आहेच. भारतीय वेबमाध्यमात यश मिळविलेल्या वेबसिरीज प्रामुख्याने आपल्या सिनेमात यश मिळविलेल्या मंडळींच्याच आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजल्या आहेत व जागतिक प्रेक्षक आपल्याकडे खेचून घेऊ शकतील, अशा प्रकारच्या निर्मिती आपल्याकडे फारशा होताना दिसत नाहीत. याचे कारण भारतीय जनमानसातल्या माध्यमांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात दडले आहे. त्याचेच प्रतिबिंब नवमाध्यमातल्या निर्मितीप्रक्रियेत पडलेले दिसते.

 

युरोप किंवा अमेरिकेत भावलेल्या मजकुरासाठी किंमत मोजण्याची तयारी तिथल्या वाचकाची किंवा प्र्रेक्षकाची असते, तसे आपल्याकडे नाही. वर्तमानपत्रापासून ते वाहिन्यांपर्यंत जे काही स्वस्तात किंवा फुकट मिळेल, ते आपल्याला हवे असते. अर्थात, त्याचा म्हणून एक परिणाम आपल्या अभिव्यक्ती माध्यमांच्या दर्जावर होतोच. ‘बीबीसी’सारखी सक्षम माध्यमे येतात, टिकतात व नवमाध्यमातही आपला प्रभाव वाढवितात, त्याचे कारण त्याच्या उच्च निर्मितीमूल्यात दडलेले आहे. बदलत्या काळातील ही बदलती माध्यमे आशयनिर्मितीचे काम जोरदारपणे करीतच आहेत. जुन्या चौकटी मोडून किंवा नव्या निर्माण करून त्यांचे काम सुरूच आहे. या निर्मितीप्रक्रियेत भारत म्हणून आपण कुठे आहोत, याचा विचार आपल्याला कधीतरी गांभीर्याने करावा लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@