करन जोहर निर्मित 'कलंक' या मल्टी स्टारर आणि बिग बजेट चित्रपटानंतर 'तख्त' हा तसाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना मुघल साम्राज्याच्या काळात घेऊन जाणार आहे. या चित्रपटाच्या कामाला सध्या जोरदार सुरुवात झाली असून या चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी प्रचंड अभ्यासाची गरज आहे त्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे. दरम्यान या चित्रपटातील पात्रांविषयी काही खुलासे करण्यात आले आहेत अशी चर्चा सध्या सुरु आहे.
मुघल काळातील एका सत्य कथेवर आधारित या चित्रपटात रणवीर सिंह आणि विकी कौशल या चित्रपटात सख्या भावांची भूमिका साकारणार आहेत तर करीना कपूर त्यांच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. आलिया भट रणवीर सिंहच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे तर भूमी पेडणेकर या चित्रपटात विकी कौशलच्या पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळेल. अनिल कपूर, रणवीर आणि विकी कौशल यांच्या वडिलांची भूमिका मोठ्या पडद्यावर वठवणार आहे तर जान्हवी कपूर एका गुलाम मुलीची भूमिका साकारणार आहे. अशी चर्चा सध्या सुरु आहे. आता या सगळ्या भूमिका एकत्र येऊन 'तख्त' कसा साकार होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
'तख्त' या चित्रपटात एवढे प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे साहजिकच प्रेक्षकांच्या या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'कलंक' च्या बाबतीत पण हेच झाले होते मात्र कलंक प्रेक्षकांच्या अपेक्षांना तितकासा न्याय देऊ शकला नाही हे चित्रपटाच्या कमाईवरून लक्षात येते. मात्र आता या चित्रपटाच्या बाबतीत प्रेक्षकांच्या झोळीत एक चांगली कलाकृती येते की पुन्हा एकदा त्यांची निराशा होते हे पाहणे महत्वाचे ठरेल.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat