नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाची सुनावणी ३ महिने पुढे ढकलली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये मध्यस्थी समितीचे अध्यक्ष न्या. एफ.एम.आय. खलीफुल्ला यांनी न्यायालयाकडे अहवाल सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. यावर न्यायालयाने ही विनंती मान्य करत मध्यस्थी समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर १५ ऑगस्टनंतर सुनावणी होणार आहे.
मध्यस्थी समितीची स्थापना करण्यात आल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनावणी होणार होती. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी मध्यस्थी समिती स्थापनेचा आदेश दिला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एफ. एम. कलीफुल्ला, आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा या ३ सदस्यीय समितीमध्ये समावेश करण्यात आला होता.
दरम्यान, सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. एस.ए. बोबडे, न्या. डी.वाय. चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने मध्यस्थी समितीच्या विनंतीनंतर अयोध्या प्रकरणाची सुनावणी ३ महिने पुढे ढकलत असल्याचे सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat