महिलांना निर्भयत्व प्रदान करणारे निर्भय पथक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019   
Total Views |


nirbhaya_1  H x



नाशिक शहर पोलिसांमार्फत सध्या नाशिक शहरात निर्भया पथकाच्या माध्यमातून अनोखे स्टिंग ऑपरेशन राबवत महिला सुरक्षेस प्राधान्य दिले जात आहे. शहरातील माताभगिनींना याद्वारे निर्भयपणे जगण्यासाठी मदत मिळाली आहे. या निर्भया पथकाचे कार्य खरोखरच अभिमानास्पद आणि अभिनंदनीय आहे.



हैदराबाद आणि उन्नाव येथील महिला अत्याचाराच्या घटनांनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे
. महिला सुरक्षा ही सामाजिक जबाबदारी आहे की, सुरक्षा दल (पोलीस) यांचे कर्तव्य हा चर्चेचा विषय ठरू शकतो. मात्र, समाज आणि पोलीस दल यांनी एकत्रितपणे आपली नेमकी भूमिका बजावली, तर हा प्रश्न सुटणे सहज शक्य आहे. आजवर नाशिक शहरामध्ये तक्रार दाखल झाल्यावर कार्यवाही करणे, हेच पोलीस दलाचे कार्य आपणास परिचित आहे. मात्र, हे स्टिंग ऑपरेशन नेमके काय आहे आणि ते कसे घडते, हे खालील काही घटनांवरून सहज लक्षात येईल.


घटना क्र
. १ : दि. २७ डिसेंबर रात्री ११ च्या सुमारास अमृतधाम परिसरातील हमरस्त्यावर पोलीस जीप येऊन उभी राहते. रस्त्याचा आडोसा पाहून जीप उभी केली जाते. त्या जीपमधून पंजाबी ड्रेस घातलेली एक मुलगी उतरते आणि पाठीला सॅक लावून रस्त्याने चालू लागते. तिच्यामागे छुप्या पद्धतीने हातात मोबाईल फोन घेऊन व्हिडिओ शूटिंग करत दोन कर्मचारी चालत असतात. रस्त्यावरून जाणार्‍या टवाळखोरांनी या मुलीशी लगट साधण्याचा प्रयत्न केल्यास त्याला जेरबंद करण्यासाठी हे कर्मचारी सज्ज असतात आणि ती मुलगी म्हणजे महिला पोलीस कॉन्स्टेबल असते.


घटना क्र
. २ : सरकारवाडा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला कर्मचारी रोहिणी सवंद्रे या साध्या वेशात सीबीएस परिसरात बसची वाट बघत होत्या. परिसरात पोलीस कर्मचारी पाळत ठेवून होते. रात्री १२ वाजता एक अनोळखी इसम स्थानकात येऊन बसला व तो महिलेकडे एकटक बघत असल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले. महिला कर्मचारी पोलिसांच्या खासगी वाहनात बसण्यासाठी गेल्या असता संशयिताने कारने पाठलाग केला. गंगापूररोडवरील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ त्याने कार थांबवत पोलीस महिला कर्मचार्‍याला हाताने इशारे केले असता पथकाने त्यास ताब्यात घेतले. चौकशीत कमलकुमार गिरधारीलाल खेमानी (५२, रा. चेतनानगर, राणेनगर) असे नाव त्याने सांगितले. त्याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



घटना क्र
.३ : पंचवटी कारंजा येथे महिला पोलीस कर्मचारी साध्या वेशात उभी असताना संशयित आशिष लक्ष्मीचंद अग्रहरी याने तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अंगलट करण्याचा प्रयत्न केला असता पथकाने त्यास अटक केली. रामकुंड येथे साध्या वेशात महिला कर्मचारी फिरत असताना अक्षी आमिर इस्माईल अन्नम (रा. पंचवटी) याने एकटी महिला असल्याचे बघत अश्लील हावभाव केल्याचे कॅमेर्‍यात कैद झाले. घटना क्र.२ व ३ दि. २७ डिसेंबरच्या पूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे यात आरोपी गजाआड झाले. क्रमांक १ च्या घटनेमुळे केवळ दोन दिवसांत या परिसरात आरोपी फारसे न दिसणे, हेच या स्टिंग ऑपरेशनचे फलित आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नाशिक शहर पोलीस दलाने टवाळखोरांचा बंदोबस्त करता यावा, यासाठी या स्टिंग ऑपरेशनची मोहीम हाती घेतली आहे.



शहरातील महिलांना सुरक्षित आणि सुव्यवस्थित जीवनमान व्यतीत करता यावे आणि महत्त्वाचे म्हणजे पोलीस नसतानाही महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे
-पाटील यांच्या संकल्पनेतून शहर पोलीस दलात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिला छेडछाडीस प्रतिबंध करणे, हेच या पथकाचे मूळ उद्दिष्ट आहे. हैदराबाद आणि तेलंगण राज्यात महिला सुरक्षेसाठी ‘शी टीम’ नावाचे पथक कार्यरत आहे. याच संकल्पनेतून नाशिकमध्ये निर्भया पथकाची मुहूर्तमेढ ६ जून, २०१९ मध्ये रोवण्यात आली. या पथकात एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी, दोन महिला कर्मचारी आणि दोन पुरुष कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली असते.



नाशिक शहरात महिला सुरक्षा ऐरणीवर येऊ शकते
, अशी सुमारे ५५० संवेदनशील ठिकाणे या पथकाच्या निगराणीखाली सतत असतात. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या चार विभागात आठ पथके कार्यरत असून ते महिला सुरक्षेची ग्वाही नाशिककरांना देत आहेत. अर्ली मॉर्निंग टू मिडनाईट या स्वरूपात दोन सत्रांत या पथकाच्या माध्यमातून कार्य केले जाते. चारही विभागांचे सहायक आयुक्त हे या पथकांच्या कामगिरीची निगराणी करत असून पोलीस उपायुक्त (मुख्यालय) या प्रमुख आहेत. सकाळी परिसरातील जॉगिंग ट्रॅक, शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस, स्कूलबसची ठिकाणे, भाजी मार्केट आदी ठिकाणी साध्या वेशातील निर्भया पथक तैनात असते व त्यांच्यामार्फत परिसरातील टवाळखोरांवर कारवाई केली जाते. त्यांच्यावर विनयभंग, भादंवि ११०/११२ चे गुन्हे नोंदवून खटलेदेखील दाखल करण्यात आले आहेत.



विशेष म्हणजे तक्रारीचा दूरध्वनी आल्याबरोबर हे पथक घटनास्थळी रवाना होते
. गुन्हा घडल्यावर कारवाई करणे हे जसे पोलीस दलाचे काम आहे, तसेच, गुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना करणे आणि त्या प्रत्यक्षात अमलात आणणे, हेदेखील पोलीस दलाचे आद्य कर्तव्य समजले जाते. त्यामुळे महिला सुरक्षा संबंधी आणि निर्भया पथकाची माहिती व्हावी, या उद्देशाने महिलांची जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. पथकाला संशय आल्यास प्रथमत: विचारपूस केली जाते. त्यानंतर संबंधित महिला वा मुलगी यांची तक्रार असल्यास कारवाई केली जाते. तसेच, महिला व बालकल्याण समिती, बालन्याय मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक यांच्यामार्फत संबंधितांचे समुपदेशनदेखील करण्यात येत असते. त्यामुळे गुन्हेगाराला शिक्षा जशी आवश्यक आहे, तसेच, चुकीचे कृत्य हातून घडत असेल तर योग्य मार्ग दाखविण्याचे कामदेखील निर्भया पथक करत असते. या पथकाच्या कामगिरीची पावती म्हणजे पीडित मुली व महिला या स्वतःहून समोर येत आपल्यावरील अन्याय आता कथन करत आहेत. तसेच, टवाळखोरांचे छायाचित्रदेखील आता नागरिक निर्भयाकडे पाठवू लागले आहेत. या सर्व प्रकारात पीडितेचे नाव समोर येत नसल्याने महिलांच्या मनात विश्वास निर्माण होण्यास मदत होते. दोन महिलांमध्ये असणारे बेबनाव दूर करण्याचे कार्यदेखील निर्भयाच्या माध्यमातून झाले आहे. चुकीच्या मार्गावर मार्गक्रमण करत असलेल्या अनेक मुलींनादेखील योग्य वळणावर आणण्याचे कार्य निर्भयाच्या माध्यमातून झाले आहे.



निर्भयाच्या पथकात असणारे आठ अधिकारी
, १६ कर्मचारी आणि चार वाहने नाशिक नगरीत महिलांमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यात यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आध्यात्मिक नगरी असलेल्या नाशिकमध्ये मेट्रो सिटीसारखे नाईट कल्चर अजून तरी इतके नाही. मात्र, आगामी काळात होऊ देखील शकते. अशा वेळी आताचे निर्भयाचे कार्य त्या काळात महत्त्वाची भूमिका बजावणारे ठरेल. महिलांनी निःसंकोचपणे रात्री बाहेर पडावे, रात्री अपरात्री शहरात दाखल होणार्‍या महिलेच्या मनात सुरक्षित भाव निर्माण व्हावा, हीच मनीषा निर्भयात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची आहे. त्यामुळे महिलांना निर्भयत्व प्रदान करणारे निर्भया पथक शहरवासीयांच्या कौतुकास निश्चितच पात्र ठरत आहे.

@@AUTHORINFO_V1@@