नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. आंदोलक अनेक ठिकाणी गाड्या थांबवत असून तोडफोड करीत असून रेल्वेला ८८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बंगालमध्ये रेल्वेला सर्वाधिक फटका बसला आहे. शनिवारी रेल्वेने तोटा क्षेत्रनिहाय नोंदविला.
केलेल्या पाहणीनुसार 88 कोटींच्या संपत्तीचे नुकसान झाले असल्याचे भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे. त्यापैकी पूर्व रेल्वे क्षेत्रातील ७२ कोटींची मालमत्ता, दक्षिण पूर्व रेल्वे विभागात १३ कोटी आणि ईशान्य सीमांत झोनमध्ये तीन कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रेल्वे संरक्षण दलाचे डीजी अरुण कुमार म्हणाले, "पश्चिम बंगाल मध्ये परिस्थिती सर्वात वाईट आहे. तेथे सर्वाधिक ७२ कोटींचे नुकसान झाले आहे."
ते म्हणाले, 'बंगालमध्ये हावडा, सियालदह आणि मालदा येथे सर्वाधिक परिणाम झाला. येथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या रॅलीनंतर रेल्वे मालमत्तेवर हल्ला झाला. आता परिस्थिती पूर्ववत झाली आहे. येथील हिंसाचार ममतांच्या मेळाव्यानंतर झाला." भारतीय रेल्वेने हिंसक घटनांसाठी ८५ एफआयआर नोंदविल्या आहेत. रेल्वेचे अनेक कर्मचारी जखमी झाले. कुमार म्हणाले, "काही लोक असे आहेत ज्यांना हिंसाचाराच्या व्हिडिओद्वारे ओळखले गेले आहे आणि आम्ही त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केल्या आहे.ईशान्य भागात २२०० अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली आहे."