संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ६ व्या आसियानच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी काल थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये दाखल झाले. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी संबंधित नेत्यांशी द्विपक्षीय संरक्षण संबंधांच्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला तसेच भारत आणि अन्य देशांमधील संबंध आणखी सुधारण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
विशेष म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी भारताची ही पहिलीच भेट ठरली. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील वाढत्या संरक्षण संबंधांबद्दल समाधान व्यक्त केले आणि पुढच्या महिन्याच्या अखेरीस वॉशिंग्टन डीसी येथे होणाऱ्या बैठकीत पुन्हा भेटण्याची तयारी दर्शविली.
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांवर निशाणा साधत दहशतवादावर सगळ्याच देशांनी ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तर दहशतवादाला थांबवण्यासाठी कोणत्याही मार्गाने त्यांना होणारी आर्थिक मदत बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अन्य राष्ट्रांना केले. कोणत्याही देशाचे नाव न घेता ते म्हणाले की,"राज्य पुरस्कृत दहशतवाद हा फक्त एक “वेदनादायक कर्करोग” नाही तर देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणारे एक कारण आहे".