महासत्ता स्वप्नाचा शत्रू : आळस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2018   
Total Views |
 

कार्यक्षम, उत्साही देशांची वर्गवारी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने १६८ देशांची नुकतीच पाहणी केली. सर्वाधिक शारीरिक कष्ट करणाऱ्या देशांच्या या यादीत युगांडाने अव्वल स्थान पटकावले आहे. या यादीत शेवटच्या क्रमांकावर कुवेत आहे. त्यामुळे कुवेत हा सर्वाधिक ‘आळशी देश’ म्हणून समोर आला आहे. उत्साही असलेल्या किंवा शारीरिक कष्ट घेण्याच्या या पाहणीत अमेरिका १४३, ब्रिटन १२३, सिंगापूर १२६, ऑस्ट्रेलिया ९७, फिलिपिन्स १४१, ब्राझील १६४ व्या स्थानांवर आहेत. कुवेत, अमेरिकन सामोआ, सौदी अरेबिया व इराकमधील निम्म्याहून अधिक नागरिक पुरेसा व्यायाम करत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या युगांडामध्ये फक्त साडेपाच टक्के नागरिक पुरेसे कार्यक्षम नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. पुरेसा व्यायाम म्हणजे काय, हे संघटनेच्या तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यात नियमित ७५ मिनिटांचा भरपूर व्यायाम किंवा आठवड्यात १५० मिनिटांचा मध्यम व्यायाम हे निकष ठरविण्यात आले होते. आरोग्य संघटनेच्या या निष्कर्षांशी आपल्या व्यायामाची तुलना करून प्रत्येकाने तातडीने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कारण या यादीत भारत तब्बल ११७व्या क्रमांकावर आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत पुढे यायचे असेल आणि २०२०पर्यंत महासत्ता म्हणून उदयास यायचे असल्यास भारतीयांना आपला आळस झटकण्याशिवाय पर्याय नाही. कारण, शारीरिक आरोग्य हे मानसिक आरोग्याशी थेट जोडलेले असते. त्याचा देशाच्या एकूण वृद्धीमध्ये निश्चितच फरक पडत असतो. हे सर्व भारतीयांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. युवकांची सर्वाधिक संख्या असलेला देश म्हणून आपल्या देशाची जागतिक पटलावर ओळख आहे. त्याच्याबाबत असा अहवाल येणे, ही मोठी धोक्याची नांदी आहे.

 
 

पाहणी करण्यात आलेल्या बहुतांश देशांमध्ये पुरुषांपेक्षा महिला कमी उत्साही किंवा शारीरिक मेहनत कमी करत असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे यात आर्थिक वर्गवारीही करण्यात आली होती. त्यातील निष्कर्ष बोलके आहेत. गरीब देशांमध्ये जास्त शारीरिक श्रम घेण्याचे प्रमाण श्रीमंत देशांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, गरीब राष्ट्रातील उत्साह हा विकसित देशांसाठी एक धडा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. श्रीमंत देशांच्या निरुत्साहामागे बैठे काम आणि वाहनांचा अत्याधिक वापर ही कारणे नोंदविली गेली आहेत. अमेरिका आणि ब्रिटनच्या उदाहरणांवरून हे चित्र अधिक स्पष्ट होते. श्रीमंत देश (३७ टक्के) हे मध्यम आर्थिक स्थिती असलेल्या देशांपेक्षा (२६ टक्के) आणि गरीब देशांपेक्षा (१६ टक्के) अधिक आळशी असल्याची आकडेवारी अहवालात आहे. ‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य संपत्ती लाभे’, हा सुविचार बालकांना सांगणारी भारतभूमी ही प्राचीन काळापासून सुदृढ मानली जाते. आजच्या आधुनिक युगात विविध पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकार्‍यांना लवकर झोपणे शक्य नसले तरी, त्यांच्यासाठीही आरोग्यदृष्ट्या सक्षम राहण्यासाठीचे अनेकविध पर्याय आपल्या योगासनांत उपलब्ध आहेत. भारतीय इतिहासाची सुवर्णपाने चाळली तर सहज लक्षात येते की, अजोड शारीरिक क्षमता आणि उच्च मनोवस्था असणार्‍या अनेक राष्ट्रपुरुषांनी व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. उदा. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वामी विवेकानंद.

 

विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणाला नुकतीच १२५ वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने त्यांचा ‘व्हॉट इंडिया व्होटस टुडे, इज द मसल्स ऑफ आयर्न नव्हरज ऑफ स्टील’ हा संदेश प्रत्येक भारतीय तरुणाने अंगिकारण्याची गरज आहे.पाश्चिमात्त्यांच्या अनेक प्रथा-परंपरा यांचे अंधानुकरण आपण करत असतो. त्यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थानही देतो. मात्र, समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर त्यांनी कधीच कमी केला आहे, याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या ऋषिपरंपरेत सांगितल्याप्रमाणे सकारात्मक कामात स्वतःला गुंतवल्यास तन आणि मन निरोगी राहण्यास मदत होते. याचा विसर आजमितीस आपल्याला पडला असल्याचे दिसून येते. आजच्या युवा पिढीकडे, युवा भारताकडे जग आशेने पाहत आहे. विविध अवकाश मोहिमा या तरुण भारताने सफल केल्या आहेत. त्यामुळे आता भारतीयांनी आळस झटकून महसत्तेकडे आगेकूच करण्याची वेळ आली आहे.
 
 

      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@