Live Updates : कॉंग्रेसने फक्त सत्तेसाठी राजकारण केले.
देशातील नागरिकांना खरे खोटे माहित आहे.
इतिहास उघडून पहा कोणी काय चुका केल्या आहे हे कळेल.
नवी दिल्ली : मोदी सरकार पाडायचे हा काँग्रेसचा निश्चय असल्याने अविश्वास प्रस्तावाचे नाटक करून काँग्रेसने आपण सरकार पाडण्यामध्ये किती उतावीळ आहोत हे दाखवून दिले आहे असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत मांडले आहे. पीडीपीकडून हा अविश्वास प्रस्ताव आला आणि काँग्रेस सदस्यांची जुळवाजुळव करून या प्रस्तावाला समर्थन देण्याचा प्रयत्न करत आहे असे देखील नरेंद्र मोदी आज म्हणाले. आम्ही जनतेच्या मतांनी स्पष्ट बहुमताने निवडून आलो आहोत तरी कॉंग्रेसला आमच्यावर विश्वास नाही असे देखील नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
लोकतंत्रावर देशातील सगळ्यात पक्षांचा विश्वास असणे गरजेचे आहे. मात्र विरोधी पक्षांना आपला अहंकार आवरता येत नाही म्हणून हे आमचे सरकार पाडण्याचा घाट रचत आहेत. आपल्या देशातील राजकारणाला नकारात्मक राजकारणाने पूर्णपणे घेरले असून विकास करण्याची वृत्ती आता विरोधी पक्षांची संपली आहे असे टोमणे यावेळी नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावले. काँग्रेसला स्वत:वर विश्वास नाही म्हणून यांचे विचार मतीमंद झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मंचावर भारताबद्दल गुण गायले जातात तरी यांना आपल्यावर विश्वास नाही असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
आम्ही जनतेला स्वावलंबी बनवण्यासाठी किती नव्या योजना आणल्या मात्र तरी देखील यांचा आमच्यावर विश्वास नाही. यांची मानसिकता पुढे जाण्याची नाही तर देशाला मागे ढकलण्याची मानसिकता आहे. वस्तू व सेवा कर, मेक इन इंडिया यावर देखील यांचा विश्वास नाही. कोणतेही कार्य करायचे असेल तर त्याला काही कालावधी लागतो मात्र यांना आमच्यावर विश्वास नाही आणि पिढीजात राजकारण पुढे चालवायचे असल्याने हे राजकारणाची खेळी करतात असे स्पष्ट मत नरेंद्र मोदी यांनी यावेळी मांडले.