
अमरावती येथे आरपीएफच छापा
१३ ई-तिकिट तिकिटांसह दोघांना अटक
भुसावळ, ७ जून
अवैधरित्या रेल्वेचे ई-तिकिट विकणार्या दोघांना रेल्वे सुरक्षाबलाच्या पथकाने सुरक्षा आयुक्तअजय दुबे यांच्या र्मादर्शनाखाली अमरावती येथे छापा टाकून अटक केली आहे.त्यांच्याकडून २८ हजार ७५० रुपयांचे १३ ई-तिकिटे तसेच दोन संगणक, २ प्रिंटर्स व रोख १९ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले आहे.
याबाबत सहाय्यक सुरक्षा आयुक्त राजेश दिक्षित यांनी पत्रकार परिषदेत अमरावती येथे केलेल्या कारवाईची माहिती देतांना ते म्हणाले की, अमरावती येथे रेल्वे ई-तिकिटात काळाबाजार होत असल्याचे लक्षात आल्याने सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांनी विशेष गुप्त पथक गठीत केले आहे. ६ जून रोजी दुबे यांना गुप्त माहिती मिळाली की अमरावती येथील जयस्तंभ चौक, राका मॉल मधील बिना ट्रॅव्हल्स पेक ऍण्ड ट्रीप व गांधी सायबर कॅफे या ठिकाणी ई-तिकिटांची अवैध विक्री दलालांमार्फत होत आहे. त्यामुळे त्यांनी निरीक्षण प्रविण कस्बे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अंबिका यादव, समाधान वाहुलकर, प्रधान आरक्षक मिलिंद तायडे, आरक्षक मनिष शर्मा, विनोन जेठवे, योगेश पाटील यांचे पथक पाठवून या दोन्ही दुकांनांवर छापा टाकला.
तेथे त्यांना बिना ट्रॅव्हल्स मधून १७ हजार ४६० रुपये किमतीचे ८ ई-तिकिट अमिर मुर्तजा काझी वय ४४, रा. बडगावरोड अमरावती व गांधी सायबर कॅफे मधून ११ हजार २९० रुपये किमतीचे ५ ई-तिकिट शरद कांतीलाल गांधी वय ४५, रा.रिया प्लाझ, अमरावती असे एकूण २८ हजार ७५० रुपये किमतीचे अवैध १३ ई-तिकिट यांच्याकडून मिळून आले. तसेच बिना ट्रॅव्हल्समधून ९ हजार ५०० रुपये व गांधी सायबर कॅफे मधून १० हजार २०० रुपये असे एकूण १९ हजार ७०० रुपये मिळून आले.या पथकाने या दोघांना अटक करुन १३ ई-तिकिट, रोख रक्कम, दोन संगणक, प्रिंटर्स आदी साहित्य जप्त केले आहे. यातील शरद गांधी याच्याकडून ई-तिकिटांचा आणखी काळाबाजार उघडकीस येणार असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे सुरक्षा बलाने अवैध रेल्वे ई-तिकिट विकणार्यांवर ही भुसावळ रेल्वे विभागातील ४ थी कारवाई केली आहे. यापूर्वी अकोला, जळगाव व नाशिक येथे कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत अशा प्रकारच्या १९ केसेस केल्या असून २२ जणांना अटक केली आहे.
सुरक्षा आयुक्त अजय दुबे यांनी कुठल्याही रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणार्या अवैध दलालांना बळी न पडता त्यांच्याकडून तिकिट विकत घेवू नये व असा प्रकार निदर्शनास आल्यास त्यांनी जवळच्या आरपीएफ ठाणे किंवा ऑल इंडिया यात्री सुरक्षा हेल्पलाईन १८२ वर सुचना द्यावी असे आवाहन प्रवाशांना केले.