अंधश्रध्देचा विळखा मानवी जीवनाचे नुकसान करतो व विकासाला अडथळा आणतो, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचे काम हाती घेतले आहे. संघटना समाजातील जाचक रूढी परंपरांना पर्याय देत असून त्यांना समाज सकारात्मतेने स्विकारत असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
ते शिंदखेडा येथील बिजासनी मंगल कार्यालयात आयोजित दोन दिवसीय धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या संघटना संवाद कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. समितीच्या प्रारंभीच्या काळात समाजातून खोचक प्रश्न विचारले जात होते. मात्र आता संघटनेचे कार्य केवळ समाजातील अंधश्रद्धा निर्मूलन एवढ्या पुरतेच मर्यादित राहिले नसून जातपंचायत, स्त्री पुरूष समानता, या सारखे समाजाभिमुख अनेक उपक्रम संघटनेने हाती घेतले आहेत. ह्या उपक्रमातून दिलेले पर्याय समाज स्विकारत आहे हे संघटनेचे यश असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांना आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागेल. त्यासाठीच राज्य पातळीवर संघटना संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत अकरा जिल्ह्यांमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.
प्रशिक्षक म्हणून संघटनेचे राज्य प्रशिक्षण विभाग कार्यवाह सुनिल स्वामी कोल्हापूर, राज्य सरचिटणीस डॉ. टी. आर. गोराणे पुणे, राज्य सरचिटणिस विनायक साळवे शहादा हे मार्गदर्शन करीत आहेत. पाटील म्हणाले की, प्रवाहाच्या विरोधात काम करणारी संघटना आहे. प्रवाहाच्या विरोधात जावून काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका ही चळवळीच्या भूमिकेशी सुसंगत असावी यासाठी आयोजन आहे.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.रविंद्रनाथ टोणगांवकर म्हणाले की, प्रशिक्षण शिबीरातून कार्यकर्त्यांना कामाची नवी उमेद व दिशा मिळते.डॉ. दाभोलकर यांचेनंतर संघटना समाजाभिमुख करण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. संघटनेचे विधायक काम अधिक जोमाने होण्यासाठी ही शिबिरे महत्वाची असून त्यातून स्वतःला अपग्रेड करावे असे आवाहन त्यांनी केले. शिंदखेडा शाखेचे अध्यक्ष मनोहर भोजवणी, अशोकभाई शाह हे विचार मंचावर होते
आज प्रशिक्षणार्थीचे चार गट तयार करून विचार,उपक्रम, रचना,व यशोगाथा याविषयी चर्चा व मंथन करणयात आले नंतर दुसर्या सत्रात डॉ दाभोलकर काय म्हणाले? या बाबत प्रोजेक्टरद्वारे डॉ दाभोलकरांची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली, रात्री शाखेचीबैठक कशी घ्यावी याबाबत चर्चा झाली.
धुळे, निमगुळ, शिरपूर, शिंदखेडा, पिंपळनेर, नंदुरबार, शहादा, तळोदा, कलंबू आदी शाखांचे ६० कार्यकर्ते उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी प्रा.दिपक माळी, भिका पाटील, प्रा. परेश शाह,प्रा अजय बोरदे, प्रा.संदिप गिरासे, हे परीश्रम घेत आहेत. प्रास्ताविक आणि आभार प्रर्दशन प्रा.परेश शाह यांनी व्यक्त केले.