पुनर्वापर होणार्‍या प्लास्टिकवर कारवाई न करण्याची मागणी

    27-Jun-2018
Total Views |

जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे निवेदन
जिल्हाधिकार्‍यांकडून सकारात्मक प्रतिसाद

 
 
जळगाव :
शासनाने प्लास्टिकबंदी संदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे जळगावात प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. परंतु कारवाई करताना प्रशासनाने पुनर्वापर होणार्‍या प्लास्टिकपासून निर्मित पॅकिंग साहित्य, प्लास्टिकच्या वस्तू यावर कारवाई करू नये, अशी मागणी व्यापारी महामंडळाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे केली आहे.
 
 
मंगळवारी व्यापारी महामंडळाचे कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे, उपाध्यक्ष अनिल कांकरिया, सचिव ललित बरडीया, कोषाध्यक्ष संजय चोपडा आदींनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन प्लास्टिकबंदीबाबत निवेदन दिले.
 
 
शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद निर्देशानुसार ज्या प्लास्टिक थैलीचे विघटन होऊन त्याचा पुनर्वापर होतो अशा थैलीवर कायद्याने छापील असणे आवश्यक आहे. परंतु तूर्त हा कायदा लगेच लागू झाल्याने अशा प्रकारचे प्लास्टिक मटेरियल अद्याप बाजारात उपलब्ध झालेले नाही. तोपर्यंत पीपी, एसडीपीइ या प्लास्टिकपासून बनविलेले पॅकिंग मटेरियल यावर कारवाई करण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकारी देणार अधिकार्‍यांना सूचना
जिल्हाधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांना सूचना देत, कायद्याचा अभ्यास करून कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे किंवा नाही हे ठरवावे व व्यापारी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करावी असे सांगितले. तसेच तोवर कार्यवाही न करता समज देण्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना देणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.
 
 
कॅरिबॅग, डिस्पोजेबल वस्तू वापरू नये
कॅरिबॅग, एकदाच वापरल्या जाणार्‍या डिस्पोजेबल वस्तू, डिस्पोजेबल थर्माकोल किंवा त्यापासून बनविलेल्या वस्तू यावर पूर्णपणे बंदी असून त्याचा वापर करण्यात येऊ नये, असे आवाहन व्यापारी महामंडळाने केले आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांना महामंडळ पाठीशी घालणार नाही, असे कळविण्यात आले आहे.
 
 
व्यापारी, ग्राहकांचे हित लक्षात घ्यावे
प्लास्टिकबंदीच्या निर्णयाचे स्वागत असून व्यापारी व ग्राहकांचे हित लक्षात घेता कायद्यात असलेल्या काही त्रुटी शासनाने दुरुस्त कराव्या. तसेच कायद्याची सविस्तर माहिती सर्वांना होईपर्यंत कोणत्याही व्यापार्‍यावर दंडात्मक कारवाई न करता केवळ समज द्यावी, अशी मागणी महामंडळाने केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121