नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान खडगा प्रसाद ओली यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. आज नवी दिल्ली येथील हैदराबाद हाउस येथे ही द्विपक्षीय चर्चा झाली. नेपाळचे पंतप्रधान खडगा प्रसाद ओली हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. या चर्चेत या दोन्ही देशांमध्ये कृषी, सुरक्षा, विविध क्षेत्रातील सहयोग अशा विषयांवर चर्चा करण्यात आल्या आहेत.
भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश कृषी प्रधान देश आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रात दोन्ही देश मिळून प्रगती करतील अशी आमची इच्छा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कृषी क्षेत्रात पशुपालन, माती परीक्षण, सेंद्रिय शेती, कृषी संशोधन आणि कृषी शिक्षण यामध्ये आपण एकमेकांना मदत करू शकतो असे देखील ते यावेळी म्हणाले.
भारतासोबत नेपाळचे भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश एकमेकांना बऱ्याच क्षेत्रात मदत करू शकतात असे देखील नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांचे सुरक्षा संबंध देखील महत्वाचे आहे. खुल्या सीमारेषेवरील घुसखोरी दोन्ही देशांना मिळून थांबवणे गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.
विकास, कुशलता, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांनी कार्य करणे गरजेचे आहे. दोन्ही देशांनी एकमेकांचे विचार आदान-प्रदान करणे गरजेचे आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.