रा.स्व.संघ कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने कार्यरत संस्थेतर्फे बलोपासनेला उत्तेजन
चिनावल ता.रावेर :
प्राचीन भारतीय संस्कृतीत ‘शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम् (बलवंत समाजच धर्मरक्षण करु शकतो) असे विचारसूत्र जाते. ते कालातील,चिरंतन आहे...बलदंड, सशक्त, निरोगी युवापिढीच समाज व राष्ट्राचे रक्षण, संरक्षण करु शकते, या व्यापक हेतूने चिनावल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांनी 1992 मध्ये विवेकानंद बहुउद्देशिय सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था स्थापन केली. तिच्या मूर्तीमंत प्रतीक आहे चिनावल-वाघोदा मार्गावरील अत्याधुनिक व्यायामशाळा.
श्रीधर चांगदेव सरोदे व भालचंद्र जडे आदींच्या पुढाकाराने ती आधी संघस्थानावर (मेस्को मैदानावर) सुरु झाली. सध्याच्या नव्या जागेत 2005-6 मध्ये ही व्यायामशाळा सुरु झाली.
तिच्या सर्वतोपरी उन्नतीसाठी सध्या संस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद मुरलीधर भारंबे, उपाध्यक्ष मनोज शामराव कंडारे व सचिव योगेश राजाराम भंगाळे, संचालक पंकज भागवत नारखेडे, गोपाळ देवचंद पाटील, अनिरुद्ध सिताराम सरोदे, मनीष शरद पाटील, विलास नामदेव महाजन, मयूर अनिल पाटील, निलेश धनजी नेमाडे, राहूल सुरेश नारखेडे आदी तनमनधनपूर्वक विशेष योगदान देत आहेत.
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या खुल्या भूखंडावर ही व्यायामशाळा आहे. पश्चिमेकडील अर्धा भूखंड या परिसरातील व्यसनमुक्ती आणि शाकाहाराचे पुरस्कर्ते, पूज्य महामंडलेश्वर जर्नादन हरिजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि भक्त व लोकसहभागाने उभारल्या जाणार्या सतपंथ भव्य मंदिरासाठी दिलेला आहे.
यावल-रावेर मार्गावर उत्तरेकडे 3 कि.मी. असलेले चिनावल हे तापीपलिकडच्या परिसरातील कष्टाळू शेतकरी आणि उच्चशिक्षितांचे समृद्ध अन् सुमारे 11-12 हजार लोकवस्तीचे गाव.
केळी, ऊस मुख्य पीक. व्यायामप्रेमींना तर तिचा खूप उपयोग होतोच. पण शेती परवडेनाशी होत असल्याचे मानत परिसरातील युवक लष्करी व पोलीस दल इ. सेवांकडे आकृष्ट होत आहे. साहजिकच शरीर सौष्ठव आणि काटकता, सोशिकता यासाठी बलोपासना आवश्यक असल्याचा नवविचार अंगिकारणार्या नवीन पिढीसाठीही ती वरदान ठरत आहे, हे सुंदर हस्ताक्षरात नोंदवलेल्या हजेरीपटावरुन स्पष्ट होते.
व्यायामशाळेचे देखणे स्वरूप असे- पूर्व पश्चिम सुमारे 22 फूट आणि उत्तर दक्षिण सुमारे 65 फूट प्रशस्त आकार, बलोपासनेची देवता वीर हनुमानाची सुंदर मोठी व देखणी प्रतिमा, खेळती हवा व भरपूर प्रकाश योजनेसाठी दोन्ही बाजूला रुंद दरवाजे, ग्रिलच्या 5 मोठ्या खिडक्या, तळाला छान फरशी, भिंतीवर मोठमोठे आरसे आणि दक्षिण बाजूला एकीकडे स्वच्छतागृह आणि दुसरीकडे नळ व पेयजलाची व्यवस्था (2 मोठे माठ, रोज नियमित भरलेले) आणि शेवटी 2 खोल्या आहेत.
अत्त्याधुनिक साहित्य
महत्वाचे म्हणजे सर्वांगसुंदर व्यायामासाठी, शरिराच्या सर्व अवयवांचे स्नायू बळकट होण्यासाठी आवश्यक ती सर्व अत्त्याधुनिक आणि लक्षावधी रुपयांचे साहित्य, उपकरणे येथे आहेत.
पाय व गुडघे बळकट करणे, खांदे व हात बळकट करण्यासाठी पुलअप्स काढणे, पोटाची चरबी कमी करणे, दंड बळकट करणे, छाती रुंद करणे, पाठ व मणके बळकट करणे, कंबर ते डोके यांचा व्यायाम, पालथे होत वजन उचलणे... यासाठीचे आवश्यक व अत्याधुनिक साहित्य त्यात आहे. सोपान उखा जाधव हे व्यवस्थापन पाहतात.
आ.जावळे यांच्या निधीतून प्राप्त रुग्णवाहिकेचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवशी तिचे लोकार्पण झालेले आहे. वाजवी दरात शेकडो गरजू रुग्णांना तिचा उपयोग होत असतो.
संपर्क- योगेश राजाराम भंगाळे-9423582138
युवापिढीकडून आचारसंहिता, शिस्तीचे काटेकोर पालन
सर्वकल्याणाचा व्यापक विचार आणि सेवा, समर्पण, शिस्त( अनुशासन) हा संघ परिवाराचा स्थायीभाव राहिलेला आहे, त्यादृष्टीने या व्यायामशाळेच्या सर्वच कामकाजात अनुशासनाला महत्त्व आहे, तशी सुस्पष्ट नियमावलीच उजव्या बाजूच्या भिंतीवर दर्शनी बाजूला सुंदर व ठळकरित्या लिहिलेली (पेन्ट केलेली) आहे. )
प्रवेश फी अवघी 100 रु. दर 10 तारखेपूर्वी भरावी, व्यसन वा अपेयपान करुन येऊ नये, वेळेवरच यावे, सोबत छोटाा नॅपकिन वा टॉवेल आणावा, काही नुकसान झाल्यास भरपाई करावी लागेल....या नियमांचे कटाक्षाने पालन केले जाते, एकूणच कुणालाही आवडेल,अशी खूप काही शिकवणारी नियमावली आहे.