मुंबई : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठाच्या नोकरीत समाविष्ट करून घेण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी दिले. कोकण कृषी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या प्रकल्पग्रस्तांचा गेली ४० वर्षे रखडलेला प्रश्न पुनर्वसन प्राधिकरणाच्या विशेष मोहिमेअंतर्गत मार्गी लावण्यास चालना मिळाली.
महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुंबईतील वरळी येथील कार्यालयात बुधवारी कोकण कृषी विद्यापीठाच्या जागेवरील प्रकल्पग्रस्त, संघटनेचे पदाधिकारी व विद्यापीठाचे रजिस्ट्रार यांची माधव भांडारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत निकषपात्र सर्व प्रकल्पग्रस्तांना विशेष मोहिमेद्वारे नोकरीत सामावून घेण्याचे आदेश माधव भांडारी यांनी दिले. कृषी विद्यापीठाचे रजिस्ट्रार सुभाष चव्हाण, प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष माजी आ. विजयराव गव्हाणे, सचिव केदार साठे व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.