जळगाव, 12 नोव्हेंबर
माजी महसूल व कृषिमंत्री आ. एकनाथराव खडसे आणि भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयात खटला दाखल आहे. याप्रकरणी न्यायालयाने वॉरंट बजावूनही सोमवारी, कामकाजप्रसंगी प्रतिवादी प्रीती शर्मा मेमन गैरहजर होत्या. यामुळे त्यांच्याविरुद्ध 50 हजार रुपयांचे बेलेबल वॉरंट न्यायालयाने जारी केले आहे.
महसूल-कृषिमंत्री एकनाथरावजी खडसे यांच्यावर खोटे आरोप केल्याने भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया व प्रीती शर्मा मेमन यांच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात भादंवि 499, 500 प्रमाणे फौजदारी खटला (नं. 165/16) दाखल केलेला आहे.
खटला रद्द करावा म्हणून अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर 29 सप्टेंबर 2018 रोजी फिर्यादीतर्फे अॅड. व्ही.एच. पाटील, अॅड. ए. आर. कांडेलकर तर दमानियांच्या बाजूने अॅड. खैरनार यांनी युक्तिवाद केला.
12 ऑक्टोबर रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने दमानिया यांचा अर्ज फेटाळला. तसेच दमानिया व प्रीती शर्मा-मेमन हे मुक्ताईनगर न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध 30 हजार रुपयांचे बेलेबल वॉरंट जारी केले.
या पार्श्वभूमीवर 12 नोव्हेंबर रोजी अंजली दमानिया मुक्ताईनगर न्यायालयात हजर झाल्याने त्यांना जामीन देण्यात आला. प्रीती शर्मा मेमन गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध 50 हजार न्यायालयाने रुपयांचे बेलेबल वॉरंट बजावले आहे.
आ. एकनाथराव खडसे व भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी राज्यातील विविध ठिकाणच्या भाजपा कार्यकर्त्यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात 27 न्यायालयांमध्ये बदनामीचे खटले दाखल केले आहेत.