वरणगावात वीटभट्टा मालकाचा खून
15-Oct-2018
Total Views | 24
वरणगावात वीटभट्टा मालकाचा खून
- आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान
- श्वानपथक घटनास्थळवरच फिरले
- अज्ञान व्यक्तीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
भुसावळ, १५ ऑक्टोंबर
शहरातील भुसावळ रोडवरील साईनगर भागात सोमवारी सकाळी वीट भट्टा मालक सुनील ओंकार चौधरी (वय ५०, रा.शिवाजीनगर, वरणगाव) यांचा खून करुन मृतदेह घराच्या पाठीमागे निर्जनस्थळी आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत वरणगाव पोलिस स्टेशनला अज्ञान व्यक्तीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनामागे नेमका कोणाचा हात आहे? खून कोणी आणि कशाकरीता केला? यामागचे गुढ उकळण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
याबाबत सविस्तर असे की, शिवाजी नगरातील रहिवासी सुनील ओंकार चौधरी (वय ५०) यांचा वीटभट्टा आहे. सुनील चौधरी हे रविवार दि.१४ रोजी सायंकाळी ५.३० नंतर घरी परत न आल्याने रात्री त्यांचे नातेवाईक आणि मित्र मंडळींनी परिसरात शोधाशोध केली असता कुठेही त्यांचा शोध लागला नाही. त्यांचा भ्रमणध्वनीवरही संपर्क साधला असता संपर्क होत नसल्याचे कुटुंबियांची चिंता वाढली. सोमवारी दि.१५ रोजीच्या पहाटेपर्यंत नाईवाईकांनी सुनील चौधरींचा शोध घेतला. मात्र कुठेही त्यांचा शोध लागला नाही. सोमवारी सकाळी ९ ते १० च्या सुमारास साईनगरातील रेल्वे लाईन परिसरात बकर्या चारणारा गुराख्यांना ज्योती पाटील यांच्या घराच्या पाठीमागे निर्जनस्थळी अज्ञात इसमाचा खून करुन मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी पोलिसांनी सुनील चौधरींच्या नातेवाईकांनाही बोलविण्यात आल्यानंतर तो मृतदेह सुनील चौधरी यांचाच असल्याची खात्री पटली आणि शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत सहाययक पोलिस निरीक्षक सारीका कुढापे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निलेश वाघ, हेड कॉन्स्टेबल सुनील वाणी, नागेंद्र तायडे, दत्तात्रय कुलकर्णी, राहुल येवले तपास करीत अहे.
‘जंजीरी’ फिरली घटनास्थळावरच
सुनील चौधरी यांच्या शरीरावर फक्त अंडरपॅन्ट होती. बाकी दुसरे कोणतेही कपडे नव्हते. शर्ट, पॅन्ट बुट, चप्पल असेही काहीही घटनास्थळावर आढळून आलेले नाही. फक्त मोटारसायकल ही वाळूच्या ढिगार्यावर पडलेली हाती. जळगाव येथून ‘जंजीरी’नामक श्वानाला पाचारण करण्यात आले परंतु ‘जंजीरी’ ही साईनगरातील घडलेल्या घटनास्थळावरच फिरल्याने कोणतीच संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही.
‘फॉरेन्सीक लॅब’ व्हॅन पथकाची तपासणी
साईनगरात घटनास्थळावर मयत सुनील चौधरी यांची दुचाकी ही वाळूवर पडलेली होती. त्याच्या कही अंतरावर बीडीचे बंडल आणि मृतदेह होता. मयताच्या मृतदेहावर ओरबडल्याच्या खूना आढळून आल्या. जळगाव येथील पोलिसांची फॉरेन्सीक लॅब व्हॅन पथकाला पाचारण करण्यात आले होते. या पथकात सहायक केमीकल अनालायझर गौरव वराडे, हेड कॉ.विकास वाघ, किरण चौधरी, योगेश वराडे, फिंगरप्रिंट तज्ञ साहेबराव चौधरी, दीपक चौधरी यांनी घटनास्थळावरील मयताच्या प्रत्येक वस्तूंची तपासणीसाठी नाशिक फॉरेन्सीक लॅबला पाठविणार असल्याचे ‘तरुण भारत’ला सांगितले. तसेच जळगाव एलसीबीच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून मयताच्या नातेवाईकांशी चर्चा करुन पुढील तपास करणार आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक मनोज पवार, रवींद्र पाटील, दीपक पाटील, रमेश चौधरी यांचे पथक होते.
आरोपींना निश्चितच पकडणार
शहरातील मयत सुनील चौधरी यांचा खून झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यांचा खून करणार्या मारेकर्यापर्यंत निश्चितच पोलिस पोहोचणार. परंतु अगोदर ग्राऊंड फ्लोअरवर तपास सुरु आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुख्य आरोपीचा शोध घेवून पकडण्यात येईल.
सारीका कुढापे, एपीआय, वरणगाव