अनेक वेळेला आपले कॉम्प्यूटर, लॅपटॉप हँग करणारे, पेनड्रईव्ह, हार्डडिस्क करप्ट करणारे कॉम्प्यूटर व्हायरस मोठ्या तज्ञ सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या देखील नाकीनऊ आणतात. त्यामुळे अनेकांना स्वत:चा महत्वाचा डेटा गमवावा लागतो, किंवा महत्वाचे काम बाकी ठेवावे लागते. नेमके असे असते काय या व्हायरस मध्ये? या बद्दल आज जाणून घेऊयात.
कॉम्प्यूटर व्हायरस हे एखाद्या साथीच्या रोगातील विषाणू प्रमाणेच असतात. जसे साथीच्या रोगातील विषाणू एका शरिरातून दुसऱ्या शरीरात पसरून शरीर विविध आजारांनी ग्रासून टाकतात, त्याच प्रमाणे कॉम्प्यूटर व्हायरसचे देखील असते. त्यामुळेच कॉम्प्यूटर व्हायरस म्हणजे कॉम्प्यूटरमधील विषाणू होय. जो कॉम्प्यूटरमध्ये अनेक समस्या निर्माण करत असतो. त्यामुळे कॉम्प्यूटर प्रणाली बिघडते, त्यातील काही महत्वाची माहिती या व्हायरसच्या क्षेत्राखाली आल्यास त्यासही धक्का लागण्याची शक्यता असते.
तांत्रिक भाषेत सांगायचे झाल्यास कॉम्प्यूटर व्हायरस हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असतो ज्यात विशिष्ट कोडींग केलेली असते. मात्र ही कोडींग दुर्भावानेच्या उद्देशाने केलेली असते, ज्यामुळे कॉम्प्यूटरच्या नेहमीच्या पद्धतीत बिघाड होत असतो. त्याच बरोबर एका फाईल मधून दुसऱ्या फाईलमध्ये हा कोड आपोआप जात असतो अश्या प्रकारचे कोडींग स्ट्रक्चर याचे असते. त्यामुळे एका कॉम्प्यूटरमध्ये व्हायरस गेल्यास त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतर कॉम्प्यूटर्सवर देखील त्याचा तत्काळ परिणाम जाणवतो. अनेकवेळी असे व्हायरस बनवले जातात, जे कॉम्प्यूटरच्या मुख्य प्रोग्राम संचालक "मॅक्रो"वरच परिणाम करणारे ठरतात, आणि परिणामी संपूर्ण प्रणालीच बंद पडते, अथवा बिघडते. आणि जर कॉम्प्यूटर नेटवर्कमध्ये असेल त्यावेळी नेटवर्कमधील सगळ्या कॉम्प्यूटर्सवर याचा परिणाम जाणवतो.
कसा होतो व्हायरस हल्ला?
कोणताही व्हायरस हा इन्टरनेट, अंतर्गत नेटवर्क, अथवा इतर बाह्य माध्यमांतून कॉम्प्यूटरमध्ये प्रवेश करत असतो. असा व्हायरस कॉम्प्यूटर फाईल, प्रोग्रॅम अथवा डॉक्यूमेंटमध्ये साठून राहतो. ज्यावेळी व्हायरस ग्रस्त प्रोग्रॅम, फाईल अथवा डॉक्यूमेंट रन केल्या जातात, त्यावेळी त्याऐवजी व्हायरसचा कोड एक्जीक्युट होतो, परिणामी प्रणालीत बिघाड व्हयला सुरुवात होते. एका प्रोग्रॅमवर दुसरा प्रोग्रॅम अवलंबून असल्यामुळे त्यातही व्हायरसचा प्रवेश होतो, आणि अश्या प्रकारे खूप कमी वेळात संपूर्ण कॉम्प्यूटर प्रणालीवर व्हायरसचा परिणाम होतो.
मोठमोठ्या संस्थेत कॉम्प्यूटर्स हे अंतर्गत नेटवर्कमध्ये जोडले गेलेले असतात. त्याला 'लॅन' असे म्हणतात. एखाद्या कॉम्प्यूटरमध्ये शिरलेला व्हायरस हा एक-एककरून संपूर्ण लॅनवर विपरीत परिणाम करतो. अशाच प्रकारे इंटरनेटवर (सर्वात मोठे नेटवर्क) एखादा व्हायरस प्रसारित झाल्यास त्याचा जगातील अनेक कॉम्प्यूटर्सवर हल्ला होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी "रॅमसम वेअर" नामक व्हायरसने संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. यामुळे अनेक देशांचे कॉम्प्यूटर्स बिघडले होते, तथा अनेकांना मोठ्याप्रमाणात अडचण निर्माण झाली होती. इंटरनेटवर असल्यामुळे संपूर्ण जगभर या व्हायरसचा परिणाम जाणवला होता.
व्हायरसचे प्रकार -
व्हायरसचे अनेक प्रकार आज जगभर पसरलेले आहेत. कमी घातक ते अतिघातक अशा सर्वप्रकारचे व्हायरस खालील प्रकारात मोडतात.
अपेंडींग व्हायरस
बूट सेक्टर व्हायरस
स्पेसिफिलर व्हायरस
सोमॉस व्हायरस
एन्क्रिप्टेड व्हायरस
एक्जीक्युटेबल व्हायरस
मॅक्रो व्हायरस
मल्टीपार्ट व्हायरस
एम.बी.आर व्हायरस
रॅबीट व्हायरस
स्टेल्थ व्हायरस
रेसिडेंट व्हायरस
कसा होतो प्रसार?
इंटरनेट, लॅन, मॅन, व्हॅन या मुख्य नेटवर्क प्रणालीतून मुख्यत्वे व्हायरसचा प्रसार होत असतो. आजच्या ४ जीच्या काळात इंटरनेटचा मोठ्याप्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे व्हायरस प्रसारित होण्याची वारंवारिता देखील यामुळे वाढत असते. इमेल, टेक्स्ट संदेश, इंटरनेटमधून डाऊनलोड केलेली फाईल, सोशल मिडीयामधील स्कॅम लिंक असे अनेकविध मार्ग व्हायरसचा प्रसार करण्यासाठी उपलब्ध आहे. इन्स्क्रीप्शन सारख्या तंत्रामुळे तर अनेक असे संदेश असतात जे बह्यरूपी साधे वाटतात, मात्र त्यामागे व्हायरस दडवलेला असू शकतो. त्यामुळे आपल्या इमेल, सोशल मिडियावर आलेल्या अनोळखी संदेश, लिंकवर क्लिक करणे टाळावे. खात्रीशीर नसलेल्या कोणत्याही फाईल्स डाऊनलोड करू नये.
व्हायरस पासून कसा करणार कॉम्प्यूटर संरक्षित?
जसा एखाद्या आजारापासून लांब राहण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय करत असतो, त्याच प्रमाणे आपले कॉम्प्यूटर व्हायरस पासून सुरक्षित राहावे यासाठी काही काळजी घेतली गेली पाहिजे.
१. फायरवॉलचा वापर करणे
फायरवॉल हे कॉम्प्यूटरमधील सुरक्षेसाठीची तटबंदी असते. कॉम्प्यूटरमध्ये फायरवॉल इंस्टॉल केल्यास अनेक व्हायरस हल्ले ते परतवून लावत असते. त्यामुळे मोठ्याप्रमाणात आपले कॉम्प्यूटर सुरक्षित राहू शकते.
२. अॅन्टी-व्हायरसचा वापर
अॅन्टी-व्हायरसचा वापर करणे हा व्हायरस पासुन संरक्षण करण्याचा उत्तम पर्याय आहे. अॅन्टी-व्हायरस आपल्या कॉम्प्यूटर ला पूर्णपणे सुरक्षित ठेवत असतो. पूर्ण कॉम्प्यूटर स्कॅनिंगचा पर्याय देखील यात उपलब्ध असतो, त्यामुळे विविध प्रोग्रॅम, फाईल, आणि इतर ठिकाणी असलेल्या सर्व प्रणालींना हे सुरक्षित करत असते.
३. जटील पासवर्डचा वापर करणे
कुठल्याही वेब अकाऊंटवर पासवर्ड टाकताना कधीही आपला मोबाईल क्रमांक, अथवा इतर क्रमांक देऊ नये. त्यात शब्द, संख्या आणि विशेष शब्दांचा वापर करावा. प्रत्येक ठिकाणी पासवर्ड हा सारखा असू नये. त्याची लांबी कमीत कमी आठ शब्दांची असावी.
मला वाटते वरील सर्व पर्यायांचा वापर केल्यानंतर आपण प्रभावी पणे व्हायरस पासून आपले कॉम्प्यूटर संरक्षित करू शकतो.
- हर्षल कंसारा