गोड बातमीची घाई असलेल्यांसाठी, ‘एक दोन तीन चार’चा ट्रेलर रिलीज

    11-Jul-2024
Total Views |

ek doon teen chaar 
 
 
 
मुंबई : आजच्या काळातील आजच्या जोडप्यांची कथा आणि व्यथा असलेला "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा अफलातून ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण नार्वेकर यांनी केले असून कथा निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकरांनी मिळून लिहिली आहे.
 
ट्रेलरच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत नक्की पुढे काय घडेल हा एक सस्पेन्सच आहे. चित्रपटातील जोडपं, समीर आणि सायलीच्या लव्ह स्टोरीच्या आनंदी आयुष्याचं रूपांतर रोलरकोस्टर राईड प्रमाणे कोणकोणत्या वळणावर जातं याची हिंट हा ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला येते.
 
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतं की, अगदी वयाच्या २३व्या वर्षी सम्या आणि सायली या जोडप्याच लग्न झालं आहे. त्यानंतर लगेचच गोड बातमी सुद्धा येते. आणि या गोड बातमीने जो एक मोठ्ठा बॉम्ब फुटतो त्याने त्यांची जी तारांबळ उडते याची एक धमाल गोष्ट यात पाहायला मिळते.
 
ट्रेलर पाहताना आधी वाटतं की दोघांना एक नाही दोन नाही तर चक्क ४ मुलं होणारं आहेत. पण ट्रेलरच्या शेवटी वैदेहीने सहा बाळांची बातमी देऊन गुगली टाकली आहे. आता यांना चार का सहा याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
 
वैदेही परशुरामी आणि निपूण धर्माधिकारी या दोघांनी एक दोन तीन चार मध्ये प्रमुख भूमिका असून सोबत मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर, करण सोनावणे अशा कलाकारांच्याही भूमिका आहेत. जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मित ‘एक दोन तीन चार’ हा चित्रपट १९ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.