मालवण : कोकणातील सर्वात प्रसिद्ध जत्रा म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. मालवण तालुक्यातील मसुरे गावातील आंगणेवाडीत दरवर्षी भरणाऱ्या भराडीदेवीच्या या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित जत्रेसाठी २२ फेब्रुवारी २०२५ ही तारीख निवडण्यात आली आहे. आंगणेवाडीतील जत्रा कधी होणार याकडे भाविकांकडे लक्ष लागून राहिलेले असते. इतर यात्रा-जत्रा किंवा उत्सवांप्रमाणे या आंगणेवाडीत होणाऱ्या जत्रेची तारीख दिनदर्शिका किंवा पंचांग पाहून ठरवली जात नाही. या जत्रेची तारीख देवीला कौल लावून ठरवली जाते. आंगणेवाडीत देवीला कौल लावण्याची एक खास पद्धत आहे. वर्षानूवर्षे या पद्धतीनेच देवीला कौल लावून जत्रेची ठरवली जाते. यावर्षी भराडी देवीने दिलेल्या कौलानुसार २२ फेब्रुवारी ही तारीख ठरवण्यात आली आहे.
कोकणात ग्रामदैवत, कुलदैवत आणि प्रत्येक गावात, वाडीत स्थापन झालेली विविध देवतांची मंदिरे अशी अनेक दैवते असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात यात्रा-जत्रा आणि उत्सव साजरे केले जातात. कोकणातील प्रत्येक उत्सवच खूप खास असतो पण त्यातही आंगणेवाडीत होणाऱ्या भराडी देवीच्या जत्रेला विशेष महत्व लाभले आहे. आंगणेवाडीतील भराडी देवी जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पूर्वी ही जत्रा आंगणे कुटुंबीयांपुरतीच मर्यादित होती पण गेल्या काही वर्षात या जत्रेची किर्ती राज्यभर पसरली आहे. पूर्वी फक्त एसटीनेच या जत्रेच्या ठिकाणी पोहोचण्याची सोय होती पण आता रेल्वे आणि खाजगी वाहनेही उपलब्ध झाल्यामुळेदरवर्षी खूप मोठ्या संख्येने भाविक या जत्रेसाठी उपस्थित राहतात. राज्याच्या विविध भागातून भाविक या जत्रेसाठी येतातच पण मुंबईत राहणारे लाखों चाकरमण्यांची पाऊले या जत्रेसाठी आपल्या गावाकडे वळतात. एकदा का तारीख या जत्रेची तारीख ठरली की त्याच दिवशी चाकरमणी या जत्रेला गावी जाण्यासाठी तिकिटे बुक करायला सुरुवात करतात. त्यामुळे या जत्रेच्या काळातील वाहनांची तिकिटे महिना-दोन महिने आधीच बुक झालेली असतात. चाकरमण्यांप्रमाणेच या गावात राहणाऱ्या आणि विशेषत: आंगणेवाडीत राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये या जत्रेचा खूप उत्साह असतो. त्यांच्यासाठी हा वर्षातील सगळ्यात मोठा सोहळा असतो. तारीख ठरल्यामुळे आंगणेवाडीतही या जत्रेच्या जय्यत तयारीला आता सुरुवात झाली आहे.