१९५४ साली स्थापन झालेल्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे चंद्रकांत खोत हे माजी मंडळ प्रमुख, मुंबईत सातरस्ता येथील मॉडर्न मिल कंपाउंड च्या चाळीत राहिलेले चंद्रकांत खोत यांनी 'बिंब प्रतिबिंब', 'दोन डोळे शेजारी', 'उभयान्वयी अव्यय' या सारखी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली, अनेक सिनेमांची गाणी त्यांनी लिहिली.
सकाळचे 4.30 वाजले असतील, मुंबईला अजून जाग अशी आली नव्हती, रस्तावरचे नगरपालिकेचे दिवे पेटलेले होते, मध्येच एखादे वाहन ती निर्मनुष्य शांतता भंग करून जात होती. हवेत गारवा तर होताच व रस्तेही निवांत असे, त्यातच सातरस्ता सर्कलला म्हणजेच संत गाडगे महाराज चौकात त्यांच्याच वयाला शोभेल असा एक वृद्ध आपल्या खांद्याला न पेलवणारी एक बॅग लावून , एका हाताने कमरेच्या खाली येऊ पाहणारी आपली पॅन्ट सावरत , अंगात एक भगवा मळकट सदरा , चेहऱ्यावर पांढरी शुभ्र दाढी वाढवून, पाऊल उचलायला त्रास होत असेल म्हणून ते घासतच कुठेतरी निघाला होता. बघून खरच कीव यावी अशी ती अवस्था . भल्या पहाटे हा म्हातारा कुठे चालला आहे व ते ही हे न पेलवणारे ओझे बॅगेत भरून. कदाचित समाजाने नाकारलेले त्याचे अस्तित्वच गुंडाळून तो निघाला असेल आपल्या प्रवासाला, झोपलेल्या समाजाला झोपेतच ठेऊन....... मनात थोडं कुतूहल वाटले म्हणून पुढे जाऊन मागे वळून बघितले, तर, ती व्यक्ती म्हणजे खुद्द चंद्रकांत खोत होती. मी ओळखत होतो पण माझा इतका परिचय नव्हता. ज्या व्यक्ती बद्दल इतके ऐकले होते त्याची ही अवस्था, वार्धक्य इतके का वाईट असते की ज्यांनी कशाचीच तमा न बाळगता बिनधास्तपणे आपले विचार किंबहुना अनेकांच्या कुंचबनेला वाचा फोडली त्यावर नियतीने असा सूड घ्यावा हे बघवत नव्हते. प्रत्येक पाऊल ते जिवाच्या आकांताने ओढत होते, जमत नसले तरी ते पुढे चाललेच होते, पुढे पुढे आणि पुढे, मात्र दिशा भरकटलेल्या त्या जहाजा सारखे मला वाटून गेले....
मी शाळेत असताना त्यांच्या घरी अबकडई या अंकाच्या जाहिराती साठी गेलो होतो तर अबकडई बंद झालंय, का त्रास द्यायला येता मला असे चिडून मला अक्षरशः त्यांनी घरातून पिटाळले होते. अबकडई बंद झाल्याच्या त्यांच्या वेदना समजण्याचे माझे ते वय नव्हते व अबकडई काय चीझ किंवा जादू होती हे ही माहीत नव्हते. अनेक साहित्यिकांना आपले साहित्य त्या अंकात असावे अशी भुरळ पाडणारा असा तो दिवाळी अंक. त्याची विविधता, निवडलेले साहित्य याची उंची बघितली तर त्या वेळच्या दर्जेदार साहित्यात भरच पडणारा तो अंक असे. अबकडई तील लेख आजही वाचताना मनाला एक सुसंस्कृत पोषक खाद्य मिळतंय व एक वेगळीची तृप्तता लाभते. ज्या संस्थेत मी कार्यरत होतो त्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळ या 1954 साली स्थापना झालेल्या संस्थेची भरभराट करण्यात खोतांचाही मोलाचा वाटा होता. संस्थापकांनातर संस्थेचे 2रे अध्यक्ष (मंडळप्रमुख) भूषविणाऱ्या खोतांनीच या संस्थेच्या ग्रंथालयाला समर्थ ग्रंथालय असे यथोचित नाव दिले होते. पत्र्याच्या एका पेटीतून सुरू झालेले हे ग्रंथालय आज चिंचपोकळी स्टेशन ला लागून दिमाखात कार्यरत आहे. मंडळाच्या प्रणाम हस्तलिखितातील त्यांच्या कथा या कधीच कालबाह्य न होणाऱ्या आहेत.
खोतांच्या लेखनाबद्दल आजचे लिखाण नाहीय, त्या करिता वेगळं लिहून त्यांचे लिखाण किती उच्च दर्जाचे होते हे सांगायची गरजच नाहीय. बिंब प्रतिबिंब, दोन डोळे शेजारी , सन्यासाची सावली याचे लिखाण वाचणे ही अनुभूती आहे. ते फक्त आणि फक्त वाचून अनुभवावे..
भल्या पहाटे 4 च्या ठोक्याला ते घर सोडत, सोबत एक पुस्तकांची बॅग, त्यातच एक सदरा असे, काही महाराष्ट्र टाईम्स चे वृत्तपत्र इतके ओझे घेऊन ते निघत, त्यांचा हातात मात्र दोन घडयाळे असत दोन्ही वेगवेगळ्या वेळा दाखविणारे. 4.45 च्या दरम्यान जिवाच्या आकांताने चालतच ते सातरस्ता ते आर्थर रोड नाका हे साधारणतः 500 मीटर चे अंतर पार करून साईबाबा मंदिरात पोहचत. खिशात खळखळाट असे म्हणून टॅक्सीचा विचारही ते करत नसत, कधी काळात डोक्यावर फर ची टोपी, डोळ्यात सुरमा, खांद्याला शबनम, तर अंगावर उंची अत्तर असलेला रुबाब कधीच उतरून गेला होता. या मंदिरात विसावल्यावर मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच तेजस्वी छटा येत असे. अतिशय तेजस्वी संन्यासी शोभेल असे ते रूप भासे. याच मंदिरात त्यांची व माझी भेट होत असे. या माणसा जवळीचे सगळेच लुप्त झाले होते पण त्यांच्यातील स्वाभिमान हा कायमचा त्यांच्या सोबतीला असे. ते कुणा कढुनही काही घेत नसत. जर तुम्ही एखादवेळी चहा जरी पाजलात तरी ते लक्षात ठेवून पुढ्यच्या भेटीत चहा तुम्हाला देत.
सकाळी 11 च्या सुमारास ते त्या मंदिरातून निघून बकरिअड्डा येथील साई मंदिरात जात, त्या पूर्वी नास्ता व जेवण करीत, दही व पाव हाच त्यांचा नास्ता व जेवण असे, हॉटेल पण ठरलेले, त्या देवळात आले की काहीसे विचार करत बसत, इथेच त्यांनी काही लेखनिकांना हाताशी घेऊन काही पुस्तके लिहिली. दुपारी त्याच मंदिरात बॅग सोबतीला घेऊन आराम करत. त्यांच्या बोलण्यात मात्र कधीच काही कमी आहे याची खंत नसे, विलक्षण बुद्धिमतेचे दर्शन घडेल असेच बोलणे पण ही वणवण, भटकणे त्यांना झेपत नव्हते. सरकार दरबारी एक हक्काचे घर मिळावे म्हणून बरेच प्रयत्न करूनही त्यांना छप्पर असे मिळालेच नाही.
संध्याकाळी 5 च्या दरम्यान ते निघत, अगदी गलितगात्र होऊन ते 7 वाजता सातरस्ता सर्कल ला एक हॉटेलच्या पायरीवर बसत तिथेच बसून ते जेवण करीत त्यांचा हाअवतार मात्र बघवत नसे. एका भिकऱ्याला पण लाजवेल असा या शब्दांच्या साम्राटाचा अवतार भासे. नको ते जिणे....... नको ती जगण्याची लढाई...
याच दिनक्रमेने ते आयुष्याचा उतार उतरत होते. वयाची 75 साजरी करावी हा हट्ट त्यांनी केला, व ती साजरी करूनही घेतली , कदाचित आपला शेवट जवळ आलाय हे समजत असावे. पुस्तकांनी त्यांची तुळा व्हावी ही त्यांची इच्छाही पूर्ण केली. ती पुस्तकेही त्यांनी ग्रंथालयाला देऊन टाकली. काही प्रकाशक मित्र, विद्यार्थी उत्कर्ष मंडळातील सहकारी यांनी त्यांना मदत केली, त्याचा सगळा खर्च मात्र खोतांनी कसा जमविला हे त्यांनाच माहीत. शेवटी शेवटी त्यांना पेन्शन सुरू झाली होती. कार्यक्रमानंतर त्या पुस्तकांना मी बॅग घेऊन देतो असे त्यांना सांगितले, ज्याला चाके असतील, पण ती बॅग देण्या अगोदरच खोतांनी आपल्या बॅगेवरच डोके टेकवून एका सकाळी शेवटचा श्वास त्या साईमंदिरात घेतला. अगदी बेवारसपणे निघून गेले. नियतीने त्यांच्या जवळचे सगळे ओरबाडून नेले होते, हो अगदी ओरबाडूनच, कारण जर ते मागितले असते तर हसत हसत त्यांनी ते दिले असते, या ओरबाडून नेल्याचे व्रण मात्र मनावर उमटले होते. शिरवाडकरांचा कुणी घर देता का घर म्हणत प्राण सोडणारा नटसम्राट कदाचित काल्पनिक असेल पण एका शब्दसाम्राटाचा अंतही आम्ही तसाच बघितला......अगदी भावनाशून्यतेने. साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन!
लेखन- जयवंत भोगले (माजी मंडळ प्रमुख विद्यार्थी उत्कर्ष मंडळ)