संसदेतील वक्तव्यानंतर खासदार जया बच्चन यांना मुंबई पोलिसांकडून संरक्षण!

    दिनांक  16-Sep-2020 16:09:45
|

jaya_1  H x W:


जया बच्चन यांच्या बंगल्यावरील सुरक्षाही वाढवली!

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्जच्या वादानंतर जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन या बॉलिवूडच्या बचावासाठी मैदानात उतरल्या आहेत. मंगळवारी संसदेत त्यांनी बॉलिवूडचा बचाव करत बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते. यानंतर बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाले आहेत. काही लोक जया बच्चन यांचे समर्थन करत आहेत तर काहींनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांना खबरदारी म्हणून संरक्षण दिले आहे.


जया बच्चन यांच्या संसदेतील वक्तव्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी बच्चन परिवाराला सोशल मीडियावर ट्रोल केले आहे. परिणामी ही सुरक्षा वाढवली असल्याची माहिती मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या जुहू स्थित बंगल्याबाहेरदेखील मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहेत. सीबीआय मार्फत या प्रकरणात अनेक नवे खुलासे रोज समोर येत आहेत. सुशांतची मैत्रिण रिया व तिचा भाऊ शौविक या केसमधील मुख्य आरोपी आहेत. त्यांना ड्रग्ज घेण्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर तसेच, कंगना रणौतनेही इंडस्ट्रीत ड्रग्जचा व्यापार होत असल्याचे बोलल्या नंतर आता फिल्म इंडस्ट्रीतील ड्रग्ज प्रकरणावर चर्चा सुरू झाली आहे. याचे पडसाद संसदेतदेखील उमटले आहेत.


पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी ड्रग्जच्या वादातून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी भाजपचे खासदार रवी किशन यांचे नाव न घेता म्हटले होते की, फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावणारे इंडस्ट्रीलाच गटार म्हणत आहेत. मला आशा आहे की सरकारने अशा लोकांना अशी भाषा न वापरण्यास सांगावे.'


'जया बच्चन म्हणाल्या की काही लोकांमुळे आपण संपूर्ण इंडस्ट्रीची प्रतिमा खराब करू शकत नाही. मला लाज वाटते की काल चित्रपटसृष्टीतील लोकसभेतील आमच्या एका सदस्याने त्याविरूद्ध भाषण केले. हे लाजीरवाणे आहे. आपण ज्या ताटात जेवतो त्यातच छिद्र करु शकत नाही.' असे जया बच्चन म्हणाल्या होत्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.