पुरातत्त्व आणि आर्य : एक ऊहापोह

    24-Oct-2020
Total Views | 397

arya_1  H x W:



मागच्या लेखापासून ‘पुरातत्त्व’ (Archaeology) हे शास्त्र आर्यांच्या स्थलांतराच्या आणि आक्रमणाच्या बाबतीत काय सांगते, ते आपण पाहत आहोत. त्यामध्ये सिंधू खोर्‍यातल्या प्राचीन नागरीकरणाचे अवशेष हे इ. स. पूर्व किमान चौथ्या सहस्रकातले किंवा अजूनच प्राचीन आहेत, हे पाहिले. सिंधू नागरीकरणात घोडे आणि रथ यांचे पुरावेसुद्धा आपण पाहिले. आर्यांनी सिंधू खोर्‍यात तथाकथित आक्रमण केल्यानंतर पुढच्या काळात वेदांची निर्मिती केलेली नसून वस्तुत: तो काळ वैदिक संस्कृतीचाच होता - अर्थात वैदिक साहित्याची निर्मिती त्याच्या कितीतरी आधीच झालेली असल्याचेही आपण पाहिले. एकत्रपणे विचार केल्यास काय सांगतात हे विविध पुरावे? या पुराव्यांमधून आर्यांच्या स्थलांतराची किंवा आक्रमणाची कथा सिद्ध होते का?


आर्यांनी बाहेरून येऊन युद्ध केले? की कत्तल केली?


मागच्या एका लेखात पाहिल्याप्रमाणे कार्नेल विद्यापीठातले विद्वान मानववंशशास्त्रज्ञ डॉ. के. आर. केनेडी यांच्या मते, सिंधू खोर्‍यात झालेल्या उत्खननांमध्ये मिळालेल्या मानवी सांगाड्यांवर कुठल्याही शस्त्राच्या खुणा नाहीत, वार केल्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे युद्धात मारले गेलेल्या किंवा कुणीतरी ठरवून कत्तल केलेल्या मृतांचे असे ते सांगाडे दिसत नाहीत. एखादे घनघोर युद्ध म्हणावे, तर एका वंशाचे परकीय आक्रमक आणि अजून वेगळ्याच वंशाचे एतद्देशीय लोक, असे दोघांचेही मृतदेह यामध्ये मिळायला हवेत. पण, तसे दिसत नाही. ते सांगाडे एका समान जीवशास्त्रीय वंशाच्या लोकांचे आहेत. परकीय क्रूर भटक्यांनी काही एतद्देशीय लोकांची कत्तल केली आणि उरलेल्या लोकांना दक्षिणेत हाकलून दिले असे म्हणावे, तर जीवशास्त्रीयदृष्ट्या त्याच वंशाचे लोक आजही त्या परिसरात राहतात. के ‘एएसआय’चे एक प्रधान निदेशक अमलानंद घोष यांचे मतही आपण पाहिलेले आहे. शिवाय युद्धात अथवा कत्तल करून मारलेले लोक वाटावेत, इतक्या मुबलक संख्येनेही ते मृतदेह मिळालेले नाहीत. मुळात ते सगळे मृतदेह समकालीनसुद्धा नाहीत. त्यामुळे इथे ना युद्धाची कथा खरी ठरते, ना कत्तलीची शक्यता शिल्लक राहते. त्यातले बहुतेक सर्वच जण नैसर्गिकरीत्या मरण पावलेले दिसतात. अनेकांची तर अगदी वैदिक पद्धतीने दफने झाल्याचेही आपण मागे पाहिले आहे. त्यातले काही मृतदेह नदीच्या पुरासोबत वाहून आलेल्या गाळात रुतलेले असेही मिळाले आहेत. ज्या काही अगदी थोड्या मृतदेहांमधून डीएनएचे नमुने उपलब्ध होऊ शकले, त्यांच्या चाचणीमधून ते ‘बाहेरून’ कुठून आलेले असल्याची चिन्हे मात्र दिसत नाहीत. अशा पद्धतीने हा युद्धाचा, कत्तलीचा किंवा स्थलांतराचा सगळा सिद्धांतच कोलमडून पडतो.


सिंधू नागरीकरणाचे पुढे काय झाले?



मागे एका लेखात आपण हे पाहिले आहे की, वायव्य भारताच्या विस्तीर्ण परिसरात काही ठिकाणी नद्यांना सातत्याने पूर आल्याने तो परिसर वसतीयोग्य राहिला नाही, तर अजून काही परिसरात सातत्याने दुष्काळ पडल्याने तो ही वसतियोग्य राहिला नाही. हा पूर किती वेळा आला असेल? इ. स. पूर्व दुसर्‍या सहस्रकात दर एक-दोन वर्षांनी एक महापूर, असा निदान ९० हून अधिक वेळा पूर येऊन गेल्याची चिन्हे सिंधू खोर्‍यात आणि पंचनद परिसरात आढळतात. सतत दोन शतके अशा त्रासदायक राहिलेल्या परिसरातून लोकांनी हळूहळू इतरत्र स्थलांतरे केली असणार आणि ती नगरे पुढे ओस पडली असणार, हे ओघानेच आले. त्याच्याच अलीकडच्या राजस्थान आणि कच्छच्या परिसरात याच्या उलट परिस्थिती बनली. तिथून वाहणार्‍या सरस्वतीसारख्या महानदीचे पात्र अनेक कारणांनी लहान होत गेले, ती आटली आणि पुढे तो प्रवाह अगदीच नाममात्र शिल्लक राहिल्यामुळे त्या परिसरात कोरडा दुष्काळ पडला. हा दुष्काळ किती काळ टिकला असेल? यावरचे खरगपूर येथील आयआयटीमधील संशोधकांचे एप्रिल २०१८मध्ये प्रकाशित झालेले निष्कर्ष अतिशय धक्कादायक आहेत. त्यांचा भूशास्त्र (Geology and Geophysics) आणि भूजलशास्त्र (Hydrology) यांचा अभ्यास असे सांगतो की, त्या परिसरातला दुष्काळ त्या काळात थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल ९०० वर्षे टिकून राहिला! आताच्या आधुनिक काळातसुद्धा अशा दुष्काळी भागातून चार-पाच वर्षांच्या आतच लोक इतरत्र स्थलांतर करून निघून जातात. त्या काळात अशी नऊ शतके तिथे कोण कशाला राहिले असेल? तिथली नगरे उजाड पडली नसती, तरच नवल! सिंधू नागरीकरणाच्या र्‍हासाची खरी कारणे अशी पर्यावरणीय आहेत, कोणत्याही एखाद्या परकीय आक्रमणात नाहीत.



उत्क्रांत ग्रामीण संस्कृती


इ. स. पूर्व २६०० पासून पुढच्या काळात कधीतरी या र्‍हासाची सुरुवात झाली, असे दिसते. तोपर्यंतचा काळ ‘उन्नत हडप्पा काल’ (Mature Harappan Phase) म्हणून ओळखला जातो. पुढच्या ‘उत्तर हडप्पा काल’ (Late Harappan Phase) नावाने ओळखल्या जाणार्‍या काळात वर सांगितलेल्या कारणांनी ही नगरे ओस पडत गेली, तर त्याच्या सोबत बाकी भारतभरात ग्रामीण भागात या नागरीकरणाची वैशिष्ट्ये दिसायला लागली, असे पुरावे आढळतात. कायथा (राजस्थान), आहार/बनास (राजस्थान), सावळदा (नंदुरबार, महाराष्ट्र), दायमाबाद (उ. नगर, महाराष्ट्र) इत्यादी ठिकाणी झालेली उत्खनने सिंधू नागरीकरणाचे परिवर्तन पुढे अशा लहान लहान ग्रामीण संस्कृतीत झाल्याची साक्ष देतात. हा कालखंड इ. स. पूर्व सुमारे १६०० पर्यंतचा मानला जातो. पुढेही हाच क्रम चालू राहिला. ‘माळवा संस्कृती’ नावाने इ. स. पूर्व १६०० ते इ. स. पूर्व १४००दरम्यानचा कालखंड, तर ‘जोर्वे संस्कृती’ नावाने इ. स. पूर्व १४००ते इ. स. पूर्व १००० दरम्यानचा कालखंड ओळखला जातो. इनामगाव (पुणे, महाराष्ट्र) सारख्या ठिकाणच्या उत्खननात तर या सर्व कालखंडांचे दर्शन घडलेले आहे. सिंधू नागरीकरणात मातीची भांडी, मणी, बांगड्या आणि इतर ज्या ज्या वस्तू मिळतात, तशाच, परंतु अजूनच सफाईदार पद्धतीने बनविलेल्या वस्तू या पुढच्या काळातल्याही सापडतात. भांड्यांचा रंग, दोन रंग (काळा आणि लालसर), ती भाजण्यातला पक्केपणा, त्यावर रंगकाम, त्यांना उत्तम झिलई, त्यांची कमी कमी होत गेलेली जाडी, अशा वैशिष्ट्यांनी ही संस्कृती अजूनच उन्नत आणि उत्क्रांत स्वरूपात भारतात सर्वदूर गावागावात पोहोचली, याचीच साक्ष पटते. आर्यांच्या तथाकथित आक्रमणानंतर सिंधू नागरीकरण आणि संस्कृती संपुष्टात आली, असे आज अनेक अभ्यासक सांगतात. त्यांना या पुराव्यांच्या रूपाने एक चपराकच काळाने दिली आहे. ती संस्कृती संपलेली नाही, तर अशा छोट्या छोट्या गावांमधून ती रुपांतरित होऊन पुढेही प्रवाही राहिलेली आहे, तिचा ओघ आजही चालूच आहे.
एकूणच या सर्व ऊहापोहात आर्यांचे तथाकथित आक्रमण किंवा स्थलांतर घडल्याचे पुरावे प्रत्यक्षात कुठेच मिळत नाहीत. याखेरीज आर्यांचा ‘वंश’ म्हणून पाश्चात्त्य अभ्यासक जे वर्णन करतात, त्याला तर पुरातत्त्वात काडीमात्रही पुरावा नाही, हेसुद्धा आपण पूर्वीच तपशीलवार पाहिलेले आहे. पुरातत्त्व (Archaeology) हे शास्त्र भारताच्या प्रागैतिहासिक काळावर जो काही प्रकाश टाकते, त्यातून वारंवार सिद्ध झालेली ही गोष्ट आहे. या प्रकाशाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणारे मूठभर विद्वान आणि काही समाजविघातक हेतूंनी प्रेरित होणारे लोकच या आक्रमण आणि स्थलांतराच्या भाकडकथा सांगत असतात. त्यांच्या उपद्रवमूल्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नसल्यामुळे निरागस वाचकांनी याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.


- वासुदेव बिडवे
vkbidve@gmail.com
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121