वादळ की वादळापूर्वीची शांतता?

    दिनांक  16-Jul-2018   पाकिस्तानचा आजवरचा इतिहास पाहता हे सारं ‘वादळापूर्वीची शांतता’ याच गटवारीत मोडतं. दुसरीकडे भारतात जम्मू व काश्मीरचा प्रश्न महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला असताना शेजारील पाकिस्तानात या प्रकारची वादळापूर्वीची शांतता चिंताजनक आहे. पाकिस्तानातील अनेक बाटलीबंद राक्षस आता हळूहळू अशा निर्णायक वेळी बाहेर येऊ लागले आहेत. आता हे राक्षस किती धुमाकूळ घालतात, हे २५ जुलै आणि त्यानंतरच्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

 

गतिक राजकारणाचे संदर्भ गेल्या काही वर्षांत कमालीचे बदललेले असताना पाकिस्तानसारख्या आधीच अवघड जागेचं दुखणं असलेल्या देशात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने तेथील सर्वच दुखण्यांनी एकत्रितपणे डोकं वर काढलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ ज्या दिवशी लंडनहून लाहोरला परतले, त्याच दिवशी देशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभांमध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि त्यात अक्षरशः किड्यामुंग्यांसारखी मारली गेलेली माणसं पाहता, येत्या २५ जुलै रोजी होणारी निवडणूक आणि त्यानंतरच्या काळात पाकिस्तानसमोर आणि पर्यायाने भारतासह संपूर्ण आशिया खंडासमोर काय वाढून ठेवलंय, याची कल्पना येईल. लंडनच्या एव्हनफिल्डमधील गडगंज संपत्तीप्रकरणी उत्तरदायित्व न्यायालयाने त्यांना व त्यांची कन्या मरयम शरीफ यांना अनुक्रमे १० आणि ७ वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमध्ये नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) अर्थात पीएमएल-एन हा पक्ष सत्तेत आहे. तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झालेले नवाझ शरीफ पनामा पेपर्स प्रकरणात अडकल्याने पदच्युत झाले आणि पीएमएल-एनचेच शहीद खाकान अब्बासी पंतप्रधान झाले. इतकंच नव्हे तर नवाझ यांना उर्वरित आयुष्यात कोणतेही सार्वजनिक पद स्वीकारण्यास वा निवडणूक लढविण्यासदेखील न्यायालयाने अपात्र ठरवले. त्यानंतर नुकतीच न्यायालयाने शरीफ यांना सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्याने पाकिस्तानचं एकूण प्रकरणच अधिक क्लिष्ट झालं.

 

पीएमएल-एनची सारी भिस्त नवाझ शरीफ यांच्यावर आहे. त्यामुळेच शरीफ यांनी निवडणुकीच्या तोंडावर लंडनहून पाकिस्तानात परतण्याचा आणि कारावासात जाण्याचा निर्णय घेतला. यातून स्वतः नवाझ आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला जाईल. पक्षाचे अध्यक्ष आणि नवाझ यांचे बंधू शाहबाझ शरीफदेखील सध्या याच प्रयत्नात आहेत. उद्या जर पीएमएल-एन बहुमताने सत्तेत आलाच तर पाकिस्तानी संसदेत दोन तृतीयांश बहुमताने हे उत्तरदायित्व न्यायालयच बरखास्त करून न्यायालयाचा निर्णयही रद्दबातल ठरविण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पाकिस्तानात परतण्यात असंख्य धोके, त्यात अगदी जीवालाही धोका असताना नवाझ यांनी काहीतरी मोठा पराक्रम करून आल्याच्या थाटात पाकिस्तानात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आगमनावेळी लाहोर व आसपासच्या भागात पद्धतशीरपणे तणाव निर्माण झाला, विमानतळ व इतर भागात कार्यकर्त्यांची गर्दी वगैरे जमली. त्यामुळे मग लाहोरहून इस्लामाबादला विशेष विमानाने आणि इस्लामाबादहून चिलखती गाड्यांमधून कडेकोट सुरक्षेत रावळपिंडीच्या आदियाला तुरुंगात शरीफ बापलेकांची वरात न्यावी लागली. त्यामुळे अंतिमतः जोरदार पुनरागमन करण्याचा शरीफ कुटुंबीयांचा हेतू चांगलाच यशस्वी झाला.

 

हवा निर्माण करण्यात यश मिळालं असलं तरी त्यापुढील मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही. ही निवडणूक अनेकार्थांनी वेगळी आणि कुतूहलजनक आहे. यावेळेस मतदान केंद्रांच्या आतमध्येही पाकिस्तानी लष्कर तैनात असेल. या लष्कराचे आजवरचे पराक्रम पाहता, या निर्णयाचे परिणाम काय होतील, हे वेगळं सांगायला नको. दुसरीकडे पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफचा अध्यक्ष इम्रान खानदेखील पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असून पाकिस्तानी लष्करालादेखील इम्रानसारखाच बोलका पोपट त्या पदावर हवा आहे. इम्रान खानदेखील काही धुतल्या तांदळासारखा नसून त्याच्यावरही नवाझ यांच्या तोडीस तोड आरोप आहेत. मुळात पाकिस्तानच्या राजकारणात कोणीच धुतल्या तांदळासारखा नाही. विशेषतः पाकिस्तानावर अनिर्बंध वर्चस्व गाजवणाऱ्या पंजाब आणि त्याखालोखाल सिंध या प्रांतातील सर्वपक्षीय नेत्यांकडील, उमेदवारांकडील अब्जावधींच्या संपत्तीचे साधे आकडे जरी ऐकले तरी आकडी येईल, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे आसिफ अली झरदारी आणि बिलावल भुत्तो यांचीही तीच गत आहे. अशातच कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पक्षासह अनेक कट्टरपंथीय इस्लामवादी पक्षही निवडणुकीत उतरले आहेत. शिवाय यात कुणीही जिंकलं, तरी त्यांच्या नशिबी लष्कर, चीन (आणि आता न्यायालय !) हे राहू-केतू आहेतच. त्यामुळे आत्ता निवडणुकीचा जोर कितीही असला तरी पाकिस्तानचा आजवरचा इतिहास पाहता हे सारं ‘वादळापूर्वीची शांतता’ याच गटवारीत मोडतं. दुसरीकडे भारतात जम्मू व काश्मीरचा प्रश्न महत्त्वाच्या टप्प्यावर आलेला असताना शेजारील पाकिस्तानात या प्रकारची वादळापूर्वीची शांतता चिंताजनक आहे. पाकिस्तानातील अनेक बाटलीबंद राक्षस आता हळूहळू अशा निर्णायक वेळी बाहेर येऊ लागले आहेत. आता हे राक्षस किती धुमाकूळ घालतात, हे २५ जुलै आणि त्यानंतरच्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.