हृदयाचा रामचंद्र, रामचंद्राचे हृदय

    दिनांक  12-Jul-2018   


 

हृदय लाड आणि रामचंद्र बांगर... ‘गुरुकृपा मॉकटेल एन मोअर एलएलपी’ असे यांच्या कंपनीचं नाव. शून्यातून जिद्दीने व्यवसाय उभारणार्‍या मराठी उद्योगजगतातील याच दोन जिवलग मित्रांची ही अनोखी कहाणी...
 

‘तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया, तेरा मेरा अफसाना...’ शायर अंजान यांनी 'याराना’ चित्रपटासाठी हे गाणं लिहिलं. यामध्ये एक कडवं आहे. ‘मेरी जिंदगी सवारी, मुझको गले लगाके, बैठा दिया फलक पे, मुझे खाट से उठा के.’ हे कडवं त्या दोन मित्रांसाठीच तयार झालं असावं, असं वाटतं. दोघे २००१ पासूनचे मित्र. मात्र, अनुबंध इतके घट्ट की, एखादं रक्ताचं नातंसुद्धा फिकं पडावं. दोघांचं स्वप्न उद्योजक होण्याचं. दोघेही उद्योग करू लागलो तर घरखर्चापुरते पैसे मिळतीलच असे नाही. या विचाराने त्यातील एकाने नोकरी करायला सुरुवात केली. त्याच्या पगारात दोघांच्या संसाराचा रहाटगाडा सुरू होता. दुसरा हाताला घट्टे पडेपर्यंत मेहनत घेत होता. दोघांच्या प्रचंड मेहनतीमुळेच २०० रुपयांनी सुरू झालेला उद्योग आज काही कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. ही कथा आहे उद्योगजगतातील दोन मित्रांची. हृदय लाड आणि रामचंद्र बांगर यांची. ‘गुरुकृपा मॉकटेल एन मोअर एलएलपी’ असे यांच्या कंपनीचं नाव. अनेक प्रदर्शनांमध्ये आपण पाहिलेला ‘होममेड’ हा त्यांचाच ब्रॅण्ड.

 

हृदय लाड आणि रामचंद्र बांगर यांची मैत्री २००१ पासूनची. दोघेही दहावीपर्यंत शिकलेले. हृदय लाड हे मूळचे रत्नागिरीचे. सुरुवातीला वरळीत एका कंपनीत काही वर्षे वॉचमनची त्यांनी नोकरी केली. नंतर एका टेक्सटाईल कंपनीत ऑफिस बॉय म्हणून कामाला लागले आणि नंतर क्लर्क म्हणून त्यांना बढती मिळाली. तिथे १४ वर्षे काम केल्यावर एका मार्केटिंग कंपनीत त्यांनी पाच वर्षे काम केले. रामचंद्र बांगर यांनी एका सरबत तयार करणार्‍या कंपनीत काम केले. तिथे मार्केटिंग, उत्पादन असे विविध विभाग हाताळले, तर दुसर्‍या एका कंपनीत ते वर्कर पार्टनर म्हणून काम करू लागले. लाड यांना मार्केटिंगचा तर बांगर यांना उत्पादन निर्मितीचा प्रचंड अनुभव होता. रामचंद्र बांगर यांच्या पत्नी कल्पना यांनी बांगर यांना एकदा विचारले की, “तुम्हाला एवढा सरबत निर्मितीचा अनुभव आहे तर तुम्ही स्वत:च का नाही व्यवसाय सुरू करत?” बांगर यांनी आपल्या पत्नीचा हा विचार लाडांसमोर ठेवला. दोघांनी व्यवसाय करण्याचे निश्चित केले. तसं पण नोकरीची गुलामगिरी करायची नाही, हे ठरलेलं होतंच.

 

सरबताचा व्यवसाय करायचा, हे पक्कं झाल्यानंतर त्यासाठी बाजारातून सामान आणलं गेलं. सामान किती असावं तर पाच किलो साखर आणि इतर आवश्यक सामग्री. एकूण खर्च फक्त २०० रुपये. पहिलेच सरबत होते ऑरेंज फॅण्टा. सुरुवातीला लोकांना ‘सॅम्पल’ म्हणूनच सरबत वाटले गेले. लोकांना सरबताची चव वेगळी आणि छान वाटली. लोक आता सरबत विकत घेऊ लागले. मागणी वाढल्याने वरळी कोळीवाड्याची खोली कमी पडू लागली म्हणून घाटकोपरला लक्ष्मीनगरमध्ये कारखाना सुरू झाला. लाड नोकरी करून सरबताचं मार्केटिंग करायचे, तर बांगर उत्पादन निर्मितीकडे लक्ष द्यायचे. अजून हवा तसा व्यवसायात जम बसला नव्हता म्हणून लाड नोकरी करायचे आणि स्वत:चं चार जणांचं आणि बांगर यांचं चार जणांचं कुटुंब सांभाळत होते. इकडे बांगर सरबताच्या भट्टीवर हाताला फोड येईपर्यंत राबत होते. काही दिवसांनी लाड यांनी नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळ व्यवसायात उतरले. दोघे बाईकवरून ८० -९० सरबताच्या बाटल्या घेऊन दुकानात पोहोचविण्यासाठी जात. पुरेसा पैसा नसल्याने कामाला माणसं ठेवणं परवडत नव्हतं. त्यामुळे या दोघांनाच मालक आणि कामगाराची भूमिका पार पाडावी लागे.

 

२००८ -०९ मध्ये त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी घटना घडली. एका मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीने पुढच्या दोन वर्षांसाठी जमेल तितके सरबत ‘गुरुकृपा’कडून खरेदी करण्याचा करार केला. अनामत रक्कम म्हणून ७० हजार रुपये दिले. ही रक्कम या दोघांसाठी मोठी होती. कारण, त्या अगोदर चार-पाच हजार रुपयांवर हा आकडा कधीच गेला नव्हता. आलेल्या पैशातून त्यांनी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी केली. दुर्दैवाने ती मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनी बंद पडली. आता आणखी पुढे जायचे तर पैसे लागणार होते. आणायचे कुठून पैसे? यक्षप्रश्न होता. हृदय लाड यांनी आपला स्वत:चा फ्लॅट विकला. १५ लाखांचं भांडवल उभं राहिलं. दिवसरात्र मेहनत करेन आणि तुमचं घर परत मिळवून देईन, हा बांगर यांनी दिलेला शब्द काही वर्षांतच खरा करून दाखवला. लाड यांनी नवीन फ्लॅट घेतला. दरम्यान, त्या १५ लाखांमुळे कंपनी कितीतरी पुढे गेली होती. या सर्व संघर्षामध्ये हृदय लाड यांच्या पत्नी वृंदा तर बांगर यांच्या पत्नी कविता यांनी मोलाची साथ दिली.

 

कंपनीला १५ वर्षे झाली. या दोघांनिशी सुरू झालेल्या कंपनीमध्ये २५ हून अधिक कामगार कार्यरत आहेत. दिवसाला दोन हजार किलो साखर उत्पादनासाठी लागते. आज त्यांच्याकडे बी. टेक केलेले कर्मचारी आहेत. बांगर पूर्वीच्या सरबत कंपनीत काम करत असताना इंग्रजीमधलं मराठीत भाषांतर करून सरबत तयार करत असत. त्यांनी तिथे ज्ञात असलेले पाच फ्लेवर इकडे तयार केले, तर उरलेले फ्लेव्हर त्यांनी स्वत:च विकसित केले. आज त्यांचा ‘होममेड’ हा सरबताचा ब्रॅण्ड अत्यंत लोकप्रिय आहे. पानपसंद आणि लेमन पुदिना या सरबतांना विशेष मागणी असते. सोबतच केशर थंडाई, पिंक पेरू, जिरा सोडा, फालुदा, प्रीमियम कॉफी, काश्मिरी गुलाब, ब्ल्यू कोराको यासारख्या ४५ फ्लेवर्सची ते निर्मिती करतात. विक्रोळीमध्ये ज्या भाड्याच्या जागेत ते कारखाना चालवत, ती जागाच त्यांनी विकत घेतली. तिथे आता अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज कारखाना सुरू आहे. दर महिन्याला १ लाख सरबताच्या बाटल्या येथे तयार होतात. २०० रुपयांनी सुरू झालेला हा उद्योग निव्वळ १५ वर्षांत करोडो रुपयांची उलाढाल करत आहे.

 

हृदय लाड आणि रामचंद्र बांगर यांची ही मैत्री व्यवसायापलीकडची आहे. निव्वळ घर चालावं यासाठी त्यांनी व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा व्यवसाय भारतभर पसरला आहे. लवकरच ते परदेशातसुद्धा आपली उत्पादने निर्यात करणार आहेत. नाक्यावर आपल्या मैत्रीचं प्रदर्शन करणार्‍या मुलांसाठी या दोघांची मैत्री मार्गदर्शक ठरेल, तर भागीदारीत उद्योग करू पाहणार्‍या मराठी तरुणांना हे दोघे आदर्शवत आहेत. त्यांची ही मैत्री चिरायू राहो, या शुभेच्छा!

-प्रमोद सावंत