चंद्राचे उत्तरायण व दक्षिणायन

    दिनांक  10-Jan-2018   
 

 
 
 
“या या! सुमित शेठ! काय खबर!”, आबांनी सुमितचे स्वागत केले.
 
 
“आबा, सध्या फक्त चंद्र, चंद्र आणि चंद्र!”, सुमित म्हणाला.
 
 
दुर्गाबाई हसून म्हणाल्या, “सुमित प्रेमातच पडलास की चंद्राच्या! मी काय म्हणते, आकाशातल्या चंद्राच्या नादी लागायचे सोड! आता पृथ्वीतलावरची चंद्रमुखी शोध आणि आम्हाला नातसून आण! तूझी इच्छा असेल तर मी शोधते एखादी चंद्रमुखी!”
 
 
“काय आजी तू पण आईसारखंच म्हणायला लागलीस!”, सुमित विषय बदलत म्हणाला, “आबा, आज चंद्राबद्दल अजून काही सांगा!”
 
 
“वाह! सांगेन की!”, आबा म्हणाले, “नाही तरी तू या महिन्यात चंद्राचे निरक्षण करणारच आहेस. आज तुला चंद्राच्या आकाशातील प्रवासाबद्दल सांगतो. सूर्याच्या आकाशातील प्रवासा सारखाच चंद्राचा प्रवास आहे. थोडा वेगळा आणि बराच जलद.
 
 
“पृथ्वीवरून निरीक्षण करतांना असे दिसते की सूर्य आकाशात ठराविक मार्गात फिरतो. सूर्याला या मार्गाची फेरी पूर्ण करायला एक वर्ष लागते. हा मार्ग पृथ्वीच्या इक्वेटोरियल प्लेनला (Equatorial plane) २३ अंश कलला आहे. हा असा -
 
 
 
 
 
“त्यामुळे सूर्य ६ महिने आकाशातील इक्वेटोर (Equator) च्या उत्तरेला असतो आणि ६ महिने दक्षिणेला असतो. सूर्याच्या या प्रवासाला उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणतात हे तुला माहीतच आहे.”, आबा म्हणाले.
 
 
“हो Yes! यामुळेच पृथ्वीवर उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू निर्माण होतात.”, सुमित म्हणाला.
 
 
“आणि या मुळेच सूर्याचे रोजचे उगवण्याचे स्थान बदलते. सूर्य ६ महिने पूर्वेच्या थोडे उत्तरेकडे उगवतो आणि ६ महिने पूर्वेच्या थोडे दक्षिणेकडे. उगवत्या सूर्याचे स्थान घड्याळाच्या लंबकासारखे (Pendulum) पूर्वेच्या क्षितिजावर फिरते.”, आबा म्हणाले.
 
 
“आबा, मी मागचे वर्षभर सूर्याचे निरीक्षण केल्याने, सूर्याचा हा प्रवास आता मला ओळखीचा झाला आहे.”, सुमित म्हणाला.
 
 
“शाब्बास सुमित! आता आपण चंद्राचा आकाशातला मार्ग पाहू. चंद्राचा पृथ्वी भोवती फिरायचा जो मार्ग आहे, तो एग्लिटिक प्लेनला (Ecliptic plane) ५ अंश कलला आहे. हा असा – “, आबा म्हणाले.
 
 

 
 
 
 
“आबा, या कलण्यामुळे सूर्याप्रमाणे चंद्राचा सुद्धा उत्तरायण व दक्षिणायन असा प्रवास होत असणार!”, सुमित म्हणाला.
 
 
“अगदी बरोबर! पण, जो प्रवास करायला सूर्य एक वर्ष घेतो, तो आकाशातला प्रवास चंद्र एका महिन्यात उरकतो! त्यामुळे महिन्यातले १५ दिवस चंद्र आकाशात थोडं उत्तरेकडे तर १५ दिवस थोडं दक्षिणेकडे उगवतो. त्याचे रोजचे उगवण्याचे स्थान टिपणे हा मात्र एक चिवट कार्यक्रम आहे.”, आबा म्हणाले.
 
 
“का बरे अवघड आहे?”, सुमितने विचारले.
 
 
“एक तर असे आहे, की चंद्र रोज average ५० मिनिटे उशिरा उगवतो. मग रोज वेगवेगळ्या वेळेला निरीक्षण करावे लागते. दुसरे असे की १५ दिवस, तो दिवसा उजेडी उगवतो. तेव्हा त्याला सूर्यप्रकाशात शोधावे लागते. तिसरे असे, की रोज बेट्याचा आकार वेगळा. बर, त्याची बारीक चंद्रकोर दिसेलच असे सांगता येत नाही.”, आबा सांगत होते.
 
 
त्यांना मधेच थांबवत दुर्गाबाई म्हणाल्या, “आणि चौथे कारण असे की अमावास्येला तो दिसतच नाही!”
 
 
 
“हा! हा! बरोबर! जो या सगळ्यावर मात करेल, तोच चंद्राचे निरीक्षण करू शकतो. “
 
 
“आबा, मस्तच आहे की चंद्राचा प्रवास! सूर्यासारखाच पण superfast आणि ते सुद्धा रोज वेश बदलून!”, सुमित म्हणाला.
 
 
“सुमित, आणि एक साम्य आहे. ते असे की उन्हाळ्यात सूर्य जसा १२ तासाहून अधिक वेळ आकाशात असतो, आणि थंडीत १२ तासापेक्षा कमी वेळ आकाशात असतो. तसेच चंद्र सुद्धा महिन्यातले काही दिवस १२ तासाहून जास्त वेळ आकाशात दिसतो तर काही दिवस कमी वेळ आकाशात दिसतो. त्याशिवाय उन्हाळ्यातील सूर्याप्रमाणेच चंद्र सुद्धा काही दिवस आकाशात उंच चढतो. तर काही दिवस हिवाळ्यातील सूर्यासारखा आकाशात फारसा उंच न जाता खालच्या खालीच उगवतो आणि मावळतो.
 
 
“तेही असो! तुला सांगतो सुमित, आपल्याला सूर्यामुळे सवय अशी आहे की एका दिवसात, म्हणजे २४ तासाच्या काळात, सूर्य सकाळी उगवतो आणि मग संध्याकाळी मावळतो. चंद्राच्या बाबतीत मात्र काहीपण होते! कधी शहाण्यासारखा सकाळी उगवतो संध्याकाळी मावळतो. कधी वेड्यासारखं सकाळी मावळतो, आणि संध्याकाळी उगवतो! एखाद्या दिवशी मावळतच नाही! एखाद्या दिवशी उगवतच नाही! कधी कधी उगवत नाही तरी पण दिसतो! आणि एखाद्या दिवशी उगवतो, पण दिसत नाही!”, आबा म्हणाले.
 
 
“काहीही काय आबा! हे तुम्ही काही पण सांगताय!”, सुमित म्हणाला.
 
 
“अरे! अगदी खर सांगतोय मी! सूर्याचे कसे आहे – सगळ सूर्यप्रकाशासारखं लखलखीत! पण चंद्र?! तो मनाचा स्वामी आहे! मनमौजी आहे! मनस्वी आहे! काव्याचा रावो आहे! त्याला कोणी काय म्हणावे!
 
 
“म्हणूनच त्याचे निरीक्षण करण्यात भारी गंमत आहे! आता महिनाभर तूच निरीक्षण कर आणि मी माझी वाक्ये ताडून पहा!”, आबा म्हणाले.
 
 
 
-  दिपाली पाटवदकर