“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी आहे. जिथे जाईल तिथे पोखरायला सुरुवात करते,” हे उद्धव ठाकरेंचे बेताल वक्तव्य त्यांच्या आजच्या विदारक स्थितीचे प्रतीक आहे. निवडणुकीतील दारुण पराभवातून आलेल्या राजकीय नैराश्याचे बळी ठरलेल्या उद्धव ठाकरेंची अवस्था म्हणूनच गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही अशीच झाली आहे.
एकदा माणूस बाटला की, तो काहीही बरळू शकतो. कारण, बदललेल्या निष्ठेनुसार त्याचे विचार, श्रद्धा, दैवतेही बदललेली असतात. त्यात कमकुवत माणूस बाटला की, तो अजूनच लाचार होऊन जातो. कारण, नव्या दैवतांना त्यांच्याकडून मिळणार्या संभाव्य कृपाप्रसादावरच त्याचा डोळा असतो. तशा आशयाच्या कित्येक म्हणीदेखील मराठीत प्रसिद्ध आहेत. उद्धव ठाकरेंचेही असेच काहीसे झाले आहे. कोणे एकेकाळी शिवसेनाही हिंदुत्ववादी होती. किंबहुना, तसे म्हणवून घेण्यात शिवसेनेला अभिमानाची अनुभूतीसुद्धा येत असे. मात्र, बाळासाहेबांनी पुत्रप्रेमापायी उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे प्रमुख केले आणि हिंदुत्ववादी शिवसेनेची वाटचाल हिंदुत्व, मराठी माणूस या त्यांच्या मूलभूत मुद्द्यांपेक्षा ‘मी व माझे कुटुंब’कडे होऊ लागली. एकदा पक्ष व्यक्तिगत व कौटुंबिक स्वार्थाने लडबडला की, त्याचे जे होते, तेच इथेही झाले. पक्षाची दिशा, ध्येय, धोरणे सगळ्याशी फारकत घेऊन संजय राऊतांच्या डोक्याने पक्ष चालायला लागला आणि पक्षातील कर्तबगार, मातब्बर मंडळींनी पक्षातून काढता पाय घेतला. राज ठाकरेंपासून सुरू झालेली ही गळती आज एकनाथ शिंदेंपर्यंत येऊन ठेपली असली, तरी उद्धव ठाकरे काही सुधारायला तयार नाहीत. ‘बुडत्याचा पाय खोलात’ या उक्तीनुसार त्यांची वाटचाल सुरू आहे. त्याचीच प्रचिती उद्धव ठाकरेंनी नुकत्याच केलेल्या एका अत्यंत सुमार विधानातून आली. परवा मुंबईतील शिक्षक सेनेच्यावतीने आयोजित मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे वाळवी आहे. जिथे जाईल तिथे पोखरायला सुरुवात करते,” असे बेताल वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले की, “रा. स्व. संघ आधी दिसत नाही, पण नंतर कळते, वाळवी लागली आहे. आपल्याला वाळवीसारखे काम करायचे नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. तसे प्रखर राष्ट्राभिमानी हिंदू तयार करण्याचे काम करा.”
आता वस्तुस्थिती अशी आहे की, तोंडाच्या वाफा दवडणारा, इतरांना सांगून ते स्वतःच न करणारा माणूस म्हणून उद्धव ठाकरे ओळखले जातात. मविआच्या काळातील मुख्यमंत्री म्हणून त्यांची कीर्ती काय वर्णावी... ‘कोविड’ महामारीच्या संकटकाळातही हे महाशय घरबसल्या राज्यशकट अगदी यशस्वीरित्या हाकण्याचा दावा करीत होते. आधीच महामारी, त्यात ठाकरेंसारखे शून्य प्रशासकीय अनुभव असलेले नेतृत्व, यामुळे महाराष्ट्राची सर्वतोपरी वाताहतच झाली. उद्योगधंदे बंद पडले, मंदिरांनाही टाळे लागले आणि परिणामी महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा गर्तेतरुतून बसला. त्यानंतरही विकास प्रकल्पांवर चालवलेली स्थगितीची कुर्हाड असेल, अंबानींच्या घराबाहेर स्फोटके पेरण्याचे उद्योग असतील, अनिल देशमुखांच्या १०० कोटींच्या वसुलीचे प्रकरण, टीकाकारांना तुरुंगवारी घडविण्याचे सूडाचे राजकारण असेल, असा सत्तेचा जो जो म्हणून गैरवापर असेल, तो तो ठाकरे आणि त्यांच्या साथीदारांनी अगदी बिनबोभाटपणे केला. कोविड सेंटर्स, खिचडीवाटप घोटाळा, एवढेच काय, तर मृतदेहांच्या पिशव्यांच्या कंत्राटातही भ्रष्टाचार करून मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याची म्हण वास्तवात ठाकरे आणि त्यांच्या टोळीने वर्तनातून सिद्ध करून दाखवली. म्हणून सोशल मीडियावर कुठेही फेरफटका मारला, तरी ठाकरेंवर एकाहून एक रंजक मजकूर आपल्याला सापडू शकेल. अशा या सत्तालोलुप उद्धव ठाकरेंनी भाजपशी दगाफटका करत मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्वावरही पाणी सोडले. संघावर तीनदा तीनदा बंदी घालणार्या काँग्रेसबरोबर पाट लावला. आता दिल्लीत नवीन दैवते, नवे पोशिंदे सापडल्याने त्यांच्यासाठीचे नवे तराणे गाणे व बांगा मारणे, हे उद्धव ठाकरेंसाठी अनिवार्य आहे. आपल्या तीर्थरुपांनी जे कमावले, त्या लाखाचे बारा करण्याचे काम उद्धव ठाकरे अगदी आजही अव्याहतपणे करीत आहेत. कोणे एकेकाळी दिग्विजय सिंहांसारख्या वाचाळवीराला सोनिया गांधींना खुश करण्यासाठी जी जी कामे करायला लागत असत, ती आता संजय राऊतांच्या शिकवणीनुसार उद्धव ठाकरे करताना दिसतात.
संघ हा राजकीय पक्ष नाही. मात्र, हिंदुहितासाठी संघाचे स्वयंसेवक आवश्यक ते ते सगळे करतात. २०१३ सालच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालकांनी स्वयंसेवकांना शतप्रतिशत मतदानाचे महत्त्व विशद केले होते. देशात लोकशाही अक्षुण्ण ठेवायची असेल, राजकारणातून लाभार्थी झालेल्या उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, मेहबुबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला, सुप्रिया सुळे व त्यांच्या कुटुंबासारख्या लोकांपासून लोकशाहीचे संरक्षण करायचे असेल, तर सर्वच भारतीयांनी १०० टक्के मतदान आवश्यकच आहे. त्यानंतर स्वयंसेवकांनीही मतदार जागृती केली आणि त्याचे सकारात्मक परिणाम प्रत्यक्ष दिसूनही आले. हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्ली विधानसभा निवडणुकीतही संघाच्या या सज्जनशक्तीची प्रचिती दिसून आली. सज्जनशक्तीच्या या जागृतीने काही कपाळकरंट्यांच्या सत्तेची सोन्याची ताटे मिळविण्याच्या मनसुब्यांवर वरवंटा फिरवला. हा वरवंटा इतका मजबूत फिरला की, किती तरी प्रकारच्या अनैसर्गिक, अघोरी व अफलातून आघाड्या करूनही उद्धव ठाकरे यांच्यासारख्यांच्या पक्षाला सत्तेत काही येता येत नाही. कारण, जरा संकट आले म्हणून त्यांनी आपला विचार बदलला. उद्धव ठाकरेंची सगळी रखरख ही त्यातूनच आली आहे.
संघाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा आहे. समाज संघाला या सगळ्याच्या पलीकडे मानतो. कारण, नैसर्गिक आपत्ती असो वा अन्य कोणतेही भीषण संकट, संघ हा जात-पात-धर्म असा कुठलाही भेदभाव न करता, स्वयंसेवक हा मदतीसाठी सदैव तत्पर असतो. संघावर अशा प्रकारची शेलकी टीका केल्याने संघाला काडीमात्र फरक पडत नाही. यापूर्वीही उद्धव ठाकरे असो वा अन्य राजकारणी, यांनी संघावर शिंतोडे उडवण्याचे अश्लाघ्य प्रयत्न करून बघितले. संघाच्या विचारसरणीवर, संघाच्या मूल्यांवर, अगदी गणवेशापासून ते शाखेतील महिलांच्या सहभागापर्यंत, संघाला दूषणे देण्याची पुरोगामी आणि तथाकथित सेक्युलर पक्षांमधील स्पर्धा अजूनही संपलेली नाहीच. पण, यामुळे संघ कदापि खचला नाही की संघाकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोनही बदलला नाही. उलट संघावरील अशा वाह्यात टीकाकारांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन निश्चितच बदललेला दिसतो. एकूणच काय तर आपल्या कर्मांची पुरेशी शिक्षा मिळूनही उद्धव ठाकरेंनी संघ, भाजपद्वेषाचा घेतला वसा टाकलेला नाही. ज्यांच्या नादी ते लागले आहेत, ते शरद पवार, सोनिया गांधी त्यांचे काय करणार, हे काल शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करून दाखवून दिले. भाजपसोबत युतीत असताना ठाकरेंकडे एक सन्मानाचे पदही होते, सत्तेत सहभागही होता, कसे का असेना, स्वतःच्या पक्षावर नियंत्रण तरी होते. आता मात्र उद्धव ठाकरेंची गत गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही, अशीच झाली आहे!