संसदेतील राहुल गांधी यांचे भाषण ऐकताना 1930 च्या दशकात जर्मनीत, हिटलरचा सहकारी ज्योसेफ गोबेल्सने खोटेपणाला कशी प्रतिष्ठा दिली होती, त्याची झलक भारतीयांना पाहायला मिळाली. दडपून आणि वारंवार आत्मविश्वासपूर्ण आवाजात खोटे बोलत राहिल्याने असत्य हेच सत्य आहे, असे वाटू लागते. पुढील पाच वर्षे भारतीयांना राहुल गांधी यांच्या या असत्याच्या फॅक्टरीतून निघणार्या अनेक खोटेपणाच्या युक्तिवादांसाठी सिध्द व्हावे लागेल. मात्र भाजपला या असत्याला तितक्याच जोमदारपणे आणि प्रभावीरीत्या प्रत्युत्तर देण्याची व्यवस्था निर्माण करावी लागेल.
चूक करण्यास धैर्य लागत नाही, ती कबूल करण्यास लागते. पण राजकीय फायद्यासाठी आणि जनतेचा बुध्दिभेद करण्यासाठी, हेतूत: व बेधडक चुकीची आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये करण्यास, खूपच अधिक धैर्य आणि निगरगट्टपणा लागतो. म. गांधी यांनी आपल्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकात, आपण केलेल्या चुकांची नि:संदिग्ध व जाहीर कबुली दिली आहे. पण लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर, केलेल्या आपल्या पहिल्याच भाषणात राहुल गांधी यांनी, बेधडकपणे सरकारवर अनेक खोटे आरोप करीत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे करताना, आपण काही चुकीचे वागत-बोलत आहोत, याची जराही खंत त्यांना वाटत नसल्याचे दिसून आले. संसदेच्या सभागृहांमध्ये केलेल्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करता येत नाही, या संरक्षण कवचाचा पुरेपूर गैरफायदाही राहुल गांधी यांनी घेतला.
आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी, सरकारच्या कृषी कायदे, अग्निवीर योजना, नीट परीक्षेतील पेपरफुटी, मणिपूर, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचे हस्तांदोलन, वगैरे अनेक मुद्द्यांना सफाईने विपर्यस्त कलाटणी देताना , बेधडक खोटे कसे बोलायचे त्याचा वस्तुपाठ घालून दिला. पण त्याहीपेक्षा अधिक आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी हिंदूंबाबत केले. हिंदू हे हिंसक आहेत, असा आरोप त्यांनी केला, आणि हिंदूंची मक्तेदारी भाजपकडे नाही, असे सांगितले. पंतप्रधान मोदी, भाजप आणि रा. स्व. संघ म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेसला आणि गांधी परिवाराला, हिंदूंबाबत बोलण्याचा अधिकारच काय? कारण ‘संपुआ’ सरकारच्या काळातच काँग्रेसने समस्त हिंदूंना, जातीयवादी आणि गुन्हेगार ठररिर कायदाच संमत करण्याचा घाट घातला होता. भाजपच्या जोरदार विरोधामुळे, ते विधेयक संसदेच्या पटलावर मांडले गेले नाही इतकेच.
मात्र त्यातून काँग्रेसचा हिंदूद्वेषी दृष्टिकोन स्पष्ट झाला. राहुल गांधी यांच्या आजच्या भाषणातून त्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले. अमेठीतून पराभव होणार असल्याचे दिसताच, राहुल गांधी थेट मुस्लिमांची बहुसंख्या असलेल्या केरळमधील वायनाड मतदारसंघात पळाले. त्यांना हिंदूंचा पाठिंबा असता, तर त्यांनी उत्तर भारतातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक का लढविली नाही? सनातन धर्माचा उच्छेद झाला पाहिजे, या द्रमुक नेत्याच्या विधानावर राहुल गांधी किंवा काँग्रेसने का टीका केली नाही? याचे कारण, काँग्रेस आणि गांधी परिवाराचा हाच मूळ विचार आहे. हिंदू हे हिंसक असते, तर भारताची फाळणीच झाली नसती. नौखालीत आणि पश्चिम पाकिस्तानात, हजारो हिंदूंचे हत्याकांड झाले नसते. काश्मीरमधून पंडितांना, नेसत्या वस्त्रांनिशी पलायन करावे लागले नसते. कैरानामधून हिंदूंना पलायन करावे लागले नसते. हिंदूंना लव्ह जिहादशी झुंजावे लागले नसते. पण या वस्तुस्थितीशी राहुल गांधी यांना काहीही देणे-घेणे नाही. त्यांना त्यांचा फक्त हिंदूविरोधी अजेंडा राबवायचा आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून इतके पूर्वग्रहदूषित आणि दिशाभूल करणारे विचार व्यक्त केले की, लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर ओम बिर्ला यांनी त्यांच्याशी केलेले हस्तांदोलनही त्यांच्या या विकृत आणि निलाजर्या दृष्टिकोनातून सुटले नाही. बिर्ला यांची निवड झाल्यावर त्यांना अभिवादन करण्यासाठी राहुल गांधी त्यांच्या आसनाजवळ आले होते. तेव्हा बिर्ला यांनी आपल्याशी ताठ उभे राहून हस्तांदोलन केले असे सांगत, राहुल गांधी म्हणाले की पंतप्रधानांशी हस्तांदोलन करताना मात्र बिर्ला यांनी त्यांच्यापुढे मान तुकविली. हे सांगताना बिर्ला हे पंतप्रधानांच्या इशार्यावर नाचणारे कठपुतळी अध्यक्ष आहेत, असे सूचित करण्याचा केलेला प्रयत्न अश्लाघ्य होता. खरे तर काँग्रेसच्या राजवटीतच लोकसभा अध्यक्ष हे, पक्षश्रेष्ठींच्या हातचे बाहुले बनले होते त्याचे प्रत्यक्ष उदाहरणही आहे. संपुआ सरकारच्या काळात, एकदा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांनी, लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी जाऊन त्यांना सभागृह स्थगित करण्याचा पक्षश्रेष्ठींचा निरोप दिला आणि त्यानुसार त्यांनी सभागृहाचे कामकाज स्थगितही केले होते. त्याला सत्तेपुढे झुकणे म्हणतात. पण हा इतिहास राहुल गांधी सोयीस्करपणे विसरले आहेत.
आपण पहिल्याच भाषणात भरपूर वादग्रस्त विधाने केल्याची जाणीव झाल्यामुळे असेल कदाचित, पण भाषणाच्या शेवटी आम्ही विरोधी पक्ष हे सरकारचे शत्रू नाही, आम्ही सरकारपुढील समस्या सोडविण्यासाठी त्याच्याशी सहकार्य करण्यास तयार आहोत. लोकसभेचे अध्यक्ष हे सभागृहातील सर्वात मोठे नेते असून, आपण त्यांचा आदर करतो वगैरे मानभावी वाक्ये राहुल गांधी यांनी टाकली. पण यापुढील काळात सरकारवर टीका करताना, आपण सत्यापलाप करण्यास अजिबात कचरणार नाही, दडपून खोटे बोलू हेच राहुल गांधी यांनी या भाषणातून दाखवून दिले. इतकेच नव्हे, तर देशात जाती-पातींमध्ये आणि धर्मा-धर्मांमध्ये हेतूत: वैमनस्य निर्माण करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, हेही त्यांनी दाखवून दिले.
मोदी सरकारवर तथ्यांच्या आधारावर टीका करणे काँग्रेसला शक्यच नाही, ही गोष्ट राहुल गांधी यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळे सत्याला वाकवून आणि बुध्दिभेद करणारे फसवे युक्तिवाद करून, सरकारची बदनामी करण्याचे त्यांचे धोरण भाजपने वेळीच ओळखले पाहिजे. आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या ठरावाला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणाला सडेतोड प्रत्युत्तर देतीलच. तरीही येती पाच वर्षे भाजपला राहुल गांधी यांच्या असत्याशी किती आणि कसा लढा द्यावा लागणार आहे, ते राहुल गांधी यांनी आजच्या भाषणात दाखवून दिले आहे. त्यांच्यासारख्या निर्लज्ज खासदाराच्या बेलगाम वक्तव्यांचा समाचार घेण्यासाठी, भाजपला विशेष तयारी करावी लागेल. सामाजिक माध्यमांवरही भाजपला विशेष सजग राहावे लागणार आहे, कारण आजच्या तरुण पिढीवर या माध्यमांतील मतांचाच प्रभाव सर्वाधिक पडलेला असतो. महात्मा गांधी यांचे ‘सत्याचे प्रयोग’ भारतीयांनी स्वीकारले असले, तरी या नकली गांधींच्या ‘असत्याच्या प्रयोगा’पासून जनतेला सावध करण्यासाठी भाजपला विशेष सिध्दता करावी लागणार आहे.