‘रामायण’ चित्रपटात एन्ट्री आणि आता कपूर कुटुंबीयांसह फोटोशूट, अजिंक्य देव करिष्मा कपूर सोबतही लवकरच दिसणार
मुंबई : ‘माहेरची साडी’ हा मराठी चित्रपटसृष्टीला आयकॉनिक चित्रपट देणारे अभिनेते अजिंक्य देव सध्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता ‘रामायण’ या चित्रपटात मराठमोळे अभिनेते अजिंक्य देव यांची एन्ट्री झाली असून अद्याप ते कोणती भूमिका साकारणार हे गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटात 'भरत'ची भूमिता अभिनेता आदिनाथ कोठारे साकारणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आणि त्या पाठोपाठ अजिंक्य देव देखील रामायण चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची माहिती त्यांनीच महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत दिली. अजिंक्य देव यांनी त्यानंतर कपूर कुटुंबीयांसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. अजिंक्य देव या फोटोत रणबीर कपूर, नीतू कपूर आणि करिश्मा कपूर यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सेल्फी काढले आहेत.
अजिंक्य देव यांनी कपूर कुटुंबासोबत पोस्ट केलेल्या या फोटोला कॅप्शन दिले आहे की, “कपूर कुटुंबीयांची भेट घेऊन छान वाटलं”. दरम्यान, अजिंक्य देव लवकरच अभिनेत्री करिष्मा कपूर सोबत एका वेब सीरीजमध्ये दिसणार असून त्यांचेच भाऊ अभिनय देव यांनी सीरीजचे दिग्दर्शन केले आहे.
‘रामायण’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली असून चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याबाबत बऱ्याच बातम्या समोर आल्या असल्या तरी चित्रपट ज्यावेळी चित्रित पुर्णपणे होईल तेव्हाच कलाकारांची नेमकी माहिती कळेल. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असे सांगितले जात आहे.