भारतीय अभिजात साहित्यामध्ये ‘रामायणा’नंतरचे श्रेष्ठ महाकाव्य म्हणजे महर्षी व्यासांचे ‘महाभारत’. जगाच्या साहित्यातील सर्वात मोठे महाकाव्य म्हणून सव्वा लाख श्लोकांचे महाभारत ओळखले जाते. महाभारताच्या १८ पर्वांपैकी चार पर्वांमध्ये रामकथेचा उल्लेख आहे. विशेषतः वनपर्वातील मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला सांगितलेली ७०४ श्लोकांची रामकथा, व्यासांचे ‘रामोपाख्यान’ म्हणून सर्वपरिचित आहे. या रामोपाख्यानात व्यास धीरोदात्त रामाचे दर्शन घडवितात. व्यास महर्षींचे हे ‘रामोपाख्यान’, ‘रामो विग्रहवान धर्मः।’ या उक्तीचे प्रत्यंतर घडवते.
नमोस्तुते व्यास विशालबुद्धे, फुल्लारविंदायतपत्रनेत्रः येनत्वया भारततैल पूर्णः, प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः॥
श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रारंभी ‘ध्यान’ श्लोकात महर्षी वेदव्यांसाचा असा गुणगौरव करण्यात आला आहे. महर्षी व्यासांची ग्रंथ रचना एवढी विपुल व विविधांगी आहे की, जगाच्या पाठीवर एवढी प्रचंड ग्रंथरचना करणारे, ते एकमेव ग्रंथकार आहेत. ब्रह्मसूत्रे, स्मृती महाभारत, पुराणे, गीता, भागवत अशी त्यांची प्रचंड ग्रंथसंपदा पाहून थक्क होते. म्हणून सार्थ अभिमानाने ‘व्यासोच्छिष्टम् जगत् त्रयम्।’ अशी त्यांची थोरवी गायली जाते.
महर्षी वेदव्यास तथा कृष्णद्वैपायन व्यास हे पराशर ऋषी व माता सत्यवतीचे सुपुत्र होते. बालपणीच तपसाधनेद्वारे त्यांना दिव्यज्ञान प्राप्त झालेले होते. सरस्वती नदी किनारी त्यांचा ‘शम्याप्रास’ नावाचा आश्रम होता. भारतीय इतिहासात अनेक नारद झाले; तसेच अनेक ‘व्यास’ही झाले आहेत. महर्षी वेदव्यास हे २८वे व्यास आहेत, असे श्रद्धेय पू. धुंडामहाराज देगलूरकर म्हणतात.
महाभारतातील चार पर्वांत रामकथेचा उल्लेख
भारतीय अभिजात साहित्यसृष्टीत ‘वाल्मिकी रामायणा’नंतर थोर महाकाव्य म्हणून महर्षी व्यासांचे ‘महाभारत’ ओळखले जाते. महाभारत हे जगातील सर्वात मोठे काव्य आहे. त्यामध्ये सुमारे सव्वा लाख एवढी प्रचंड श्लोक संख्या आहे. त्यामध्ये आदिपर्व, सभापर्व, व्रतपर्व, विराटपर्व, उद्योगपर्व अशी १८ पर्वं (प्रकरणे) आहेत. या १८ पर्वांमधील ‘आरण्यकपर्व’, ‘द्रोणपर्व’, ‘शांतिपर्व’ आणि ‘वनपर्व’ अशा चार पर्वांमध्ये रामकथेचा उल्लेख आहे.
महाभारताच्या ‘आरण्यक पर्वा’मध्ये पराक्रमी भीम आणि महाप्रतापी हनुमंत यांची कदलीवनात भेट व संवाद होतो. त्यामध्ये रामकथेचा संक्षिप्तपणे (११ श्लोकात) प्रथम उल्लेख आढळतो. तसेच ‘द्रोण पर्वा’मध्ये युवा अभिमन्यूच्या मृत्यूने विषण्ण-उदास-हताश झालेल्या शोकसंतप्त युधिष्ठिराला धीर देण्यास, सांत्वनपर रामकथेचा बोध करण्यात आलेला आहे. द्रोण पर्वात १४-१५ वेळा रामाचा उल्लेख आहे. त्यानंतर ‘वनपर्वा’मध्ये मार्कंडेय ऋषींच्या मुखातून महर्षी व्यासांचे ‘रामोपाख्यान’ आलेले आहे. मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ७०४ श्लोकामध्ये रामकथा सांगतात. या ७०४ श्लोकाच्या रामकथेलाच ‘व्यासांचे रामोपाख्यान’ म्हणून अभ्यासक, साहित्यिक, वाचक ओळखतात.
शांतीपर्वामध्ये रामराज्य, रामाचा राजा म्हणून काही ओझरते उल्लेख आहेत. ते राज्यव्यवस्था, समृद्धी, संपन्नता, प्रजास्वास्थ्य अशा अर्थाने आहेत. देवर्षी नारद युधिष्ठिराला पूर्वी होऊन गेलेल्या धीरोदात्त १६ राजांची कथा सांगतात, ‘षोडष राजोपाख्यान’ म्हणून ती ओळखली जाते. त्या १६ राजांमध्ये अयोध्यापती राजारामाचे वर्णन आहे. पण तेही अगदी संक्षेपात आहे.
वनपर्वातील ‘रामोपाख्यान’
‘रामोपाख्यान’ या वनपर्वात येणार्या आख्यानात ७०४ श्लोक आहेत. हे ‘रामोपाख्यान’ महाभारतातील सविस्तर आख्यान-कथा आहे. त्याची थोडी सविस्तर माहिती घेऊ. कौरव पक्षातील दुर्योधनाशी द्यूत खेळताना युधिष्ठीर सर्व काही हरतो आणि पांडवांच्या नशिबी १२ वर्षांचा वनवास व एक वर्ष अज्ञातवास येतो. माता कुंतीला विदुराच्या घरी ठेवून, स्नुषा सुभद्रेला द्रौपदीच्या पुत्रांसह माहेरी पाठवून, द्रौपदीसह पाच पांडव वनवासाला जातात. वनातील सारी संकटे झेलून युधिष्ठिर पश्चात्तापदग्ध, उदास, हताश मनःस्थितीत असतानाच, द्रौपदीचे कौरव पक्षातील जयद्रथाद्वारे हरण होते, भीम द्रौपदीला सोडवून आणतो. या प्रसंगाने युधिष्ठिर अधिकच खचून जातो व मार्कंडेय ऋषींपुढे आपले मन मोकळे करतो. “माझ्या सारखा दुर्दैवी, दुःखी, असहाय, हतबल राजा नाही,” असे म्हणत स्वतःला अपराधी, दोषी समजून शोक करतो. युधिष्ठिराची अशी विदीर्ण मनःस्थिती व हताशा पाहून मार्कंडेय ऋषी त्याला वनवासातील धीरोदात्त रामाची कथा सांगून सांत्त्वन करीत धीर देतात, अशी या रामोपाख्यानाची पार्श्वभूमी आहे.
मार्कंडेय ऋषी म्हणतात की, ”रामावर कोणताही अपराध, चूक नसताना वनवासाची पाळी येते आणि ते खडतर वनजीवन सुखकर मानून जगत असतानाच, पत्नी सीतेचे अपहरण होते. पण, एवढी प्रचंड संकटे येऊन, धीरोदात्त राम पुरुषार्थाने रावणाचा पराजय करून, सीतामुक्ती करतो. त्यामानाने तुझी संकटे, आपत्ती मोठी नाही. तू असा शोकसंतप्त होऊन हताश-निराश, उदास होण्याचे कारण नाही. प्राप्त परिस्थितीला धीराने तोंड देऊन मार्ग काढ; उद्याचा उषःकाल तुमचा आहे.
या रामोपाख्यानात रामाचे वर्णन एक मनुष्य, एक राजा म्हणूनच आहे. देव म्हणून नाही, हे लक्षात घेण्यासारखे आहे. थोडक्यात, महाभारत कालापर्यंत राम हा देव म्हणून वर्णित होत नव्हता; वाल्मिकी व व्यासांच्या रामचरित्राचे हेच वेगळेपण आहे. व्यासमहर्षी रामाचे वर्णन-इंद्रासारखा पराक्रमी योद्धा, बृहस्पतीसारखा कुशाग्र, बुद्धिमान, समस्त धर्मतत्त्वे व विद्यांचा ज्ञाता, सत्यनिष्ठ, जितेंद्रिय, कर्तव्यपरायण, कुशल प्रशासक, प्रजाप्रिय राजा आणि सर्वांप्रती कृतज्ञ अशा विशेषणांनी केलेले आहे.
हे रामोपाख्यान महाभारतात मार्कंडेय ऋषींच्या तोंडी असले, तरी तो महर्षी व्यासांच्या प्रज्ञा-प्रतिभेचाच आविष्क़ार आहे. महाभारतातील रामाची, वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळी व अधिक माहिती पाहता, महर्षी व्यासांपुढे वाल्मिकी कृत रामायणापेक्षाही एखादी वेगळी रामकथा असावी, असे अभ्यासकांचे मत आहे.
महर्षी वेदव्यासांनी आणखी एका ठिकाणी धनुर्धारी रामाचा गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. महाभारताच्या १८व्या पर्वापैकी भीष्मपर्वात महाभारतयुद्धा प्रसंगी श्रीकृष्ण अर्जुनाला जो गीता उपदेश करतात, त्या भगवद्गीतेच्या दहाव्या, ‘विभुतीयोग’ अध्यायातील ३१व्या श्लोकात रामाचा उल्लेख आहे. ‘पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम।’ शस्त्र धारण करणार्यांमध्ये मी राम आहे, असे भगवान आपल्या विभुतीचा परिचय अर्जुनाला देतात. शस्त्रधारी योद्ध्यामध्ये रामाचे हे एकमेवाद्वितीय स्थान हे रामाच्या पुरुषार्थी पराक्रमी व्यक्तित्त्वाची थोरवी आहे. भगवद्गीतेला यावर्षी (२०२४) ५ हजार, १६९ वर्षे होत आहेत. भारतीयांचा राष्ट्रीय धर्म ग्रंथ म्हणून तिला गौरव प्राप्त आहे.
अशा प्रकारे रघुकुल गुरू वसिष्ठ ऋषी, रामायणकार वाल्मिकी ऋषी आणि महाभारतकार महर्षी व्यास यांचा राम एकसारखा असून, तो देव नसून युवराज, अयोध्यापती, सीताकांत असा मनुष्य आहे. पण, त्याचे चरित्र म्हणजे मूर्तिमंत धर्म आहे. रामो विग्रहवान धर्मः।
विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
(पुढील रविवारी ः पुराणांमधील राम)