आदिकवी वाल्मिकींचा ‘राम’

    17-Feb-2024
Total Views | 100
Adikavi Valmiki Ram
भारतीय वाङ्मयामध्ये वाल्मिकी ऋषींना ‘आदिकवी, महाकवी’ म्हणून अग्रपूजेचा मान असून, ‘वाल्मिकी रामायण’ काव्याचा ‘आदिकाव्य ग्रंथ’ म्हणून गौरव केला जातो. वाल्मिकी ऋषी कोण होते? अनेक जण त्यांना लुटारू-वाटमार्‍या मानतात. पण, प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषी स्वतःबद्दल काय म्हणतात, हे महत्त्वाचे आहे. रामायणात एके ठिकाणी स्वतःचा परिचय देताना, ‘मी प्रचेतस मुनींचा दहावा पुत्र आहे’ असे ते म्हणतात. ‘रामायण’ मूळातून वाचल्यावर, आपणास वाल्मिकी ऋषींची खरी ओळख होते. ते विद्वान पंडित व कांंतदर्शी थोर कवी होेते. महान तपस्वी होते. त्यांच्या काव्यातून होणारे ऋतुवर्णन, निसर्गवर्णन, नीतीशास्त्र, राजकारण, तत्त्वज्ञान याचे विलोभनीय मनोरम्य दर्शन वाचकांना थक्क करते, त्याचबरोबर वाल्मिकी ऋषींच्या प्रज्ञा प्रतिभेचे, रसिकतेचे, विद्याव्यासंगाचेही दर्शन स्तिमित करते.

वाल्मिकींनी एका पराक्रमी पुरुषाची (रामाची) वीरगाथा देवर्षी नारदांकडून ऐकली आणि पुढे ब्रह्मदेवांच्या दृष्टांत आज्ञेने त्या वीरपुरुषाच्या गौरवगाथेला शब्दरुपात गुंफले. ही एका महाप्रतापी पुरुषाची म्हणजे अध्याध्येच्या राजा रामाची शौर्यगाथा होय. जिला आपण ‘वाल्मिकी रामायण’ म्हणून ओळखतो. वाल्मिकींच्या या रामायणात ना चमत्कारांना स्थान आहे, ना अतर्क्य अतिशयोक्तीयुक्त घटना प्रसंग आहेत. ‘वाल्मिकी रामायण’ ही देवकथा नसून, एका प्रतापी पुरुषाची मानवकथा आहे. हेच वाल्मिकी रामायणाचे पहिले वैशिष्ट्य आहे.

करुणेतून काव्याचा जन्म

नित्यनेमाप्रमाणे वाल्मिकी ऋषी तमसा नदीवर स्नान संध्येस गेले असता, एका मिथुनरत क्रौंच पक्ष्याच्या जोडप्यातील नराला एका शिकार्‍याने बाण मारल्याने, तो मृत होऊन पडला आहे व क्रौंच पक्षिणी विरहाने तडफडून प्राण सोडते, असे हृदयद्रावक, करूण दृश्य पाहतात आणि त्यांच्या तोंडून त्या शिकार्‍याला शाप देणारा, उत्स्फूर्त उद्गार बाहेर पडतो की,‘मा निषाद पतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः।’....आणि हाच करूण उद्गार भारतीय काव्यसृष्टीतील पहिले काव्य, छंद ठरतो. शोक भावनेतून उत्स्फूर्त प्रगटला म्हणून त्याला ‘श्लोक’ म्हटले गेले. आपल्या तोंडून असे काव्य बाहेर पडल्याचे, खुद्द वाल्मिकींनाच आश्चर्य वाटते. दिवसभर ते त्या श्लोकाचेच चिंतन करीत राहिले व रात्री त्याच विचारात झोपी गेले. पहाटे त्यांना ब्रह्मदेवाचा दृष्टांत होतो आणि नारदांकडून ऐकलेली रामकथा-चरित्र तू या श्लोकाप्रमाणे लिही, ते रामायण चिरकाल लोकांमध्ये प्रसिद्ध राहिल, अशी देववाणी ऐकू येते. ब्रह्मदेवाची आज्ञा शिरसावंद्य मानून, वाल्मिकी ऋषी रामायण लेखनाचा श्रीगणेशा करतात. त्यामध्ये ब्रह्मदेवांच्या आशीर्वादात्मक आज्ञेचा स्पष्ट उल्लेख करतात. तो असा की,
यावत स्थास्यन्ति गिरयः सरितःच महीतले।
तावत रामायण कथा लोकेतु प्रचरिष्यति।

‘जो पर्यंत या धरेवर नद्या वाहत आहेत, पर्वत स्थिर आहेत, तोवर हे मुनीवरा तुझे रामायण सर्व लोकात चिरकाल प्रसिद्ध राहील.’ इति ब्रह्मदेव.

‘वाल्मिकी रामायणा’चे स्वरूप

विद्यमान ‘वाल्मिकी रामायणा’मध्ये सात कांडे आणि २४ हजार श्लोक आहेत. प्रत्येक कांडामध्ये अनेक सर्ग आहेत १) बालकांड, २) अयोध्याकांड ३) आरण्यकांड ४) किष्किंधाकांड ५) सुंदरकांड ६) युद्धकांड आणि ७) उत्तरकांड अशा सात कांडांमध्ये रामकथा विस्तारलेली आहे. काही अभ्यासकांच्या मते, ‘बालकांड’ व ‘उत्तरकांड’ वाल्मिकींनी लिहिलेले नसून, कोणीतरी नंतर जोडलेली आहेत. या मतास वाल्मिकींच्या रामायणातील युद्धकांडातच पुरावा मिळतो, तो असा की, युद्धकांडात रामाचा राज्याभिषेक झाल्यावर, रामराज्य सुरू होते, असे सांगून ग्रंथाची फलश्रुती कथन केलेली आहे. आपल्या पारंपरिक ग्रंथलेखन पद्धतीनुसार, फलश्रुती हाच ग्रंथाचा समारोप असतो. त्यामुळे ती शेवटी असते. दुसरी गोष्ट म्हणजे, देवर्षी नारदांनी जी रामकथा वाल्मिकींना सांगितली, ती रामराज्याभिषेकापर्यंतच होती. म्हणूनच वाल्मिकींनी युद्धकांडात रामराज्याभिषेकानंतर ग्रंथसमाप्ती दर्शक फलश्रुती कथन केली असावी. यावरून उत्तरकांड त्यातील सीतात्याग वगैरे गोष्टी मूळ वाल्मिकी रामायणात नाहीत, असे अभ्यासक म्हणतात. रामराज्याभिषेकाने रामायणाचा सुखांत समारोप वाल्मिकींनी केलेला आहे. वाल्मिकी हे रामाचे समकालीन होते. रामराज्यातील आदर्श अशा शासनव्यवस्था, कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था यांचे वाल्मिकी रामायणातून सुरेख दर्शन घडते. वाल्मिकी रामायणास सुमारे पाच हजार वर्षे झाली आहेत आणि आजही ते प्रेरणादायी-स्फूर्तीदायी आहे. असे हे कालजयी वाल्मिकी रामायण, विश्वातील सार्या रामकथांची मूळ गंगोत्री आहे.
 
जगामध्ये जी महाकाव्ये ख्यातकीर्त, अमर मानली जातात, त्यामध्ये मिल्टनचे ‘पॅरडाईज लॉस्ट’ आणि होमरचे ‘ईलियड’ यांना पाश्चात्य लोक विशेष श्रेष्ठ मानतात; पण क्रांतदर्शी वाल्मिकींचे ‘रामायण’ हे त्या दोन्हीपेक्षा प्राचीन असून, ते भारतातीलच नव्हे, तर जगाच्या वाङ्मयातील पहिले ‘आदि महाकाव्य’ आहे.होमरच्या ‘ईलियड’वरून वाल्मिकी रामायणाची रचना झाली, असे काही विद्वान (?) पाश्चात्य अभ्यासकांचे मत आहे. त्यांनी वाल्मिकी हे होमरच्या शेकडो वर्षे आधीचे कवी आहेत, हा काल संदर्भ लक्षात घ्यावा. दुसरी गोष्ट म्हणजे, होमरच्या ‘ईलियड’मधील नायिका हेलन ही स्वेच्छेने नवर्‍याला सोडून, प्रियकराकडे पळून जाते, तर वाल्मिकी रामायणातील नायिका सीता ही पतीनिष्ठ असून, तिचे अपहरण होते. हा हेलन व सीतामधील फरक, भारतीय स्त्री व पाश्चात्य स्त्री यांच्यातील फरक आहे, हे अभ्यासकांनी लक्षात घ्यावे. भारतीयांना अशा लोकोत्तर, एकमेवाद्वितीय, पराक्रमी पुरुषांचे अपूर्व काव्य सांस्कृतिक-साहित्यिक वारसा म्हणून लाभले, हे भारतीयांचे परमभाग्य. ‘रामो भूत्वा रामं यजेत।’ असे या वारशाचे आपण अभ्यासपूर्वक, भक्तिभावाने वसा म्हणून प्राणपणाने जतन, संवर्धन केले पाहिजे. ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

विद्याधर ताठे
(पुढील रविवारी - महर्षी व्यासांचा ‘राम’)



अग्रलेख
जरुर वाचा
सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले

सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीला वेळ...

पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया समोर! म्हणाल्या, "प्रत्येक गोष्टीला वेळ..."

(Rohini Khadse Breaks Silence After Husband Pranjal Khewalkar’s Arrest) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली. प्रांजल खेवलकर यांच्यावर ही रेव्ह पार्टी आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्टीदरम्यानचा व्हिडीओ पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आता रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांन..

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच...

पहलगाम हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, "दहशतवादी पाकिस्तानचे की भारतातच..."

(P Chidambaram's Remark on Pahalgam Terror Attack) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. यामध्ये भारताने हवाई हल्ले करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यासंदर्भातच विरोधी पक्षांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली होती, जी सत्ताधाऱ्यांनी मान्य केली. मात्र संसदेत चर्चेपूर्वी, ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी एका मुलाखतीत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121