यासीन मलिकची गैरसोय होतेय, लक्ष द्या! राहुल गांधींना पाकिस्तानाहून पत्र

मुशाल हुसैन मालिकने लिहीले राहुल गांधी यांना पत्र

    07-Nov-2024
Total Views | 87

yasin
 
 नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधील कश्मीरी पंडीतांचा जीव घेणारा, दहशतवादाचा पुरस्कार करत भारतविरोधी गरळ ओकणारा, तरूणांची माथी भडकवणारा, कुख्यात गुंड यासीन मलिक आता कारागृहात आयुष्य कुंठीत आहे. त्याच्या सोबत जेल मध्ये अमानवी व्यव्हार केला जातो आहे, म्हणून त्याने उपोषणास सरूवात केली आहे. बाहेर त्याची पाकिस्तानी बायको मुशाल दारोदारी भटकत आहे. अशातच त्यांनी काँग्रेसच्या राहुल गांधी यांना पत्र लिहून तिचा नवरा यासीन मलिक कसा अहिंसक माणूस आहे आणि या उपोषणामुळे त्याला कसा त्रास होत आहे हे त्यांनी सांगितलं.

राहुल गांधींकडे मदतीचा हात
मुशाल यांनी राहुल गांधींकडे मदतीचा हात पसरवला असून म्हटले की मलिकवर भारताविरुद्ध कारवाई केल्याबद्दलचा
३५ वर्ष जुना खटला चालवला जात आहे. आणि आता एनआयए त्याच्यावर नोंदवलेल्या बनावट गुन्ह्यांमध्ये त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत आहे.मुशाल यांनी राहुल गांधींना संसदेत आपला उच्च नैतिक आणि राजकीय प्रभाव वापरून यासीन मलिकच्या प्रकरणावर चर्चा सुरू करण्याची विनंती केली. ते केवळ दिखाव्यासाठी नव्हे तर जम्मू-काश्मीरमध्ये खरी शांतता राखण्याचे साधन बनू शकते असे सुद्धा मत यासिन यांच्या बायकोने व्यक्त केले.

यासीन मालिकवर लागलेले आरोप
यासीन मलिकविरुद्धचा सुरू असलेला खटला कुठल्याही एका प्रकरणावरचा नसून त्याला गुन्हेगारीची बरीच मोठी पार्श्वभूमी आहे. त्याचा दहशतवादाशी संबंध असल्याचा इतिहास बराच जुना आहे. १९९०च्या दशकात जेव्हा इस्लामिक कट्टरवाद्यांनी काश्मिरच्या खोऱ्यातून काश्मिरी पंडितांची हत्याकांड सुरू केले, तेव्हा यासिन मलिकचे नाव काश्मिरी पंडितांना लक्ष्य करून मारणाऱ्यांमध्ये समाविष्ट होते. याशिवाय १९९० मध्ये हवाई दलाच्या चार जवानांची हत्या केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे, जो त्याने स्वतः मीडियासमोर स्वीकारला आहे. यासीनवर काश्मिरी पंडित न्यायाधीश न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांच्या हत्येसह इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचाही आरोप आहे. एवढेच नाही तर आज त्याच्यावर प्रलंबित असलेले खटले हे त्याच्या कुकर्माचे फळ आहेत. खोऱ्यात दहशतवादी कारवाया करण्यासोबतच दहशतवाद्यांसाठी निधी उभारणे आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.

यासीन मालिकची काँग्रेसशी मैत्री!
इतक्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना त्याची बायको कुठल्या आधारावर राहुल गांधींना पत्र पाठवते हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला असेल. तर त्याचे उत्तर काँग्रेसकाळातील त्यांच्या मैत्रीत आहे. १९९० मध्ये काश्मीर खोऱ्यात झालेल्या रक्तपाताला जबाबदार असलेली व्यक्ती २००६ मध्ये अचानक काँग्रेसची लाडकी बनली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वत: यासिन मलिक याला नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी बोलावून त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली होती. या मुलाखतीचा परिणाम असा झाला की, यासिन मलिकला मोठ्या मीडिया संस्थांच्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये बुद्धजीवी म्हणून बोलवले जाऊ लागले.

अखेर मोदीकाळात शासन!
खुलेआम हत्या करणारा आणि दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या यासीन मालिकला अखेर मोदी सरकारच्या काळात गजाआड करण्यात आलं. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा केल्याप्रकरणी पकडले होते, ज्यानंतर तपासाअंती अनेक दहशतवादी कारवायांना त्याने पाठींबा दिल्याचे समोर आले.
२०१७ साली अखेर त्याला अटक करण्यात आली. १९ मे २०२२ रोजी विशेष न्यायालयाने त्याला विविध आरोपांखाली दोषी ठरवले. मोदी सरकारच्या कारवाईमुळे अखेर त्याला अटक करण्यात आली. काँग्रेसच्या काळात मात्र, अशा दहशतवाद्यांचे लाड पुरवले जात असत. याच कारणामुळे आज यासीन मालिक याची बायको राहुल गांधी यांच्याकडे मदतीची याचणा करीत आहे.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121