मुंबई : 'बाईपण भारी देवा' चित्रपटातील सहा अभिनेत्रींपैकी दिलखुलास आणि हसरं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेत्री सुकन्या मोने. अभिनयासोबत ज्यांना नृत्याची आवड आहे अशा सुकन्या यांनी आपल्या खऱ्या नावाबद्दल एक किस्सा नुकताच एका मुलाखतीत सांगितला.
तर अभिनेत्री सुकन्या मोने यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचं नाव वेगळंच ठेवण्यात आलं होतं. सुकन्या यांचा जन्म मुंबईत झाला. सुकन्या यांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब चाळीतून थेट ब्लॉकमध्ये राहायला गेले. लेकीचा जन्म होताच चाळीतून मोठ्या घरात गेल्यामुळे वडिलांनी त्यांचं नाव धनश्री असं ठेवलं. धनाची पेटी अशा आशयाने त्यांनी धनश्री हे नाव ठेवलं होतं. पण त्यांच्या आईला मात्र हे नाव आवडलं नाही. त्यामुळे आईने मुलीचं नाव सुकन्या असं ठेवलं. सुकन्या नावाप्रमाणेच त्यांनी मोठं व्हावं अशी आईची इच्छा होती. कालांतराने सुकन्या यांनी नावाला शोभेल असेच मराठी चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केलं. सुकन्या मोनेंनी हा किस्सा 'दिल के करीब' या मुलाखतीत सांगितला होता.
सुकन्या मोने यांचा 'बाईपण भारी देवा' नंतर आगामी ‘इंद्रधनुष्य’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एबीसी क्रिएशन्स निर्मित या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, सागर कारंडे, प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. एक पुरुष आणि सात बायका असे चित्रपटाचे कथानक असणार आहे.