पुणे मेट्रोने ऑगस्ट महिन्यात एकूण ३ कोटी, ७ लाख, ६६ हजार, ४८१ कोटी रुपयांचा महसूल जमा करीत, पुणे शहरासाठी मेट्रोची ही सेवा किती आवश्यक आहे, यावरच शिक्कामोर्तब केले. दररोज सरासरी ६५ हजार, ८२२ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. स्वातंत्र्य दिनी सर्वाधिक म्हणजे ८५ हजार, ३२३ प्रवाशांची नोंद झाली. पुणे मेट्रो अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेली नाही.
तिसरा आणि चौथा टप्पा अंतिम टप्प्यात असून, जेव्हा हे दोन्ही टप्पे पूर्णत्वास जातील, त्यावेळी मेट्रोच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होईल, ज्यायोगे शहरातील रस्त्यावर येणार्या खासगी वाहनांच्या संख्येत घट होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल. शहरातील वाहतूककोंडी पाहता, बस तसेच चारचाकी वाहनातून प्रवास करण्यापेक्षा मेट्रो ही जलद तसेच अधिक सोयीची असून, ती किफायतशीरही आहे. म्हणूनच पर्यावरणास अनुकूल अशा या मेट्रोकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे भविष्य म्हणून पाहिले जाते.
गेल्या २० वर्षांत पुणे किती विस्तारले, याचा अंदाज वाढलेल्या लोकसंख्येवरून यावा. २००१ मध्ये पुण्याची लोकसंख्या ३३ लाख इतकीच होती आणि एका अंदाजानुसार, ती आज १ कोटी, ३१ लाख इतकी आहे. म्हणजेच २० वर्षांत ती तब्बल २८८ टक्के इतकी वाढली. येथील लोकसंख्येची घनता प्रति चौ.किमी १३ हजार इतकी. वाढीची अनेक कारणे असली, तरी औद्योगिकीकरण हे प्रमुख कारण. त्याचबरोबर पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. अनेक शैक्षणिक संस्थांचे प्रमुख केंद्र हे पुणे असल्याने संपूर्ण भारतातून येथे विद्यार्थी शिकण्यासाठी दाखल होतात. मात्र, लोकसंख्येच्या वाढीच्या याच वेगाने शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडला असून रस्ते, सार्वजनिक वाहतूक आणि पाणीपुरवठा यांची समस्या तीव्र झाली आहे. पर्यायाने वायू प्रदूषण तसेच वाहतूककोंडी ही नित्याची.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, २००१ मध्ये पुणे शहरातील वाहनांची संख्या ही केवळ १६.५ लाख इतकी होती. आज ती ६१.७ लाख झाली आहे. वाहनांच्या संख्येतील वाढ २५९ टक्के इतकी आहे. दरम्यानच्या काळात पुणे हे ‘आयटी हब’ म्हणून जगाच्या नकाशावर उदयावर आले. सुमारे चार लाख कर्मचारी या क्षेत्रात काम करतात. येत्या दोन वर्षांत त्यात आणखी एक लाख कर्मचार्यांची भर पडेल, असा अंदाज आहे. या वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेशा प्रमाणात घरे उपलब्ध होत असली, तरी शहरातील उपलब्ध रस्त्यांची लांबी आणि रुंदी आहे तितकीच आहे. रोज होणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी काही रस्त्यांचे रुंदीकरणही केले गेले. तथापि, त्यालाही मर्यादा आहेतच. पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था ही तर कायम दुर्लक्षित राहिली. म्हणूनच लोकसंख्येच्या प्रमाणात शहरातील खासगी वाहनांची संख्याही वाढत गेली. म्हणूनच ज्या प्रवासाला १५ ते २० मिनिटे इतका वेळ अपेक्षित आहे, त्या प्रवासाला ४५ मिनिटे ते एक तास इतका वेळ लागू लागला आहे.
मेट्रो सेवा हा या सर्व समस्यांवरचा प्रभावी उपाय आहे. म्हणूनच शहरातील मध्यवर्ती भागात या सेवेचा पाया उभारला गेला. पुणेकरांना ‘पार्किंग टू पार्किंग’ अशी प्रवासाची सवय. घरातून बाहेर पडले की वाहन हवे, ही मानसिकता बदलून काही शे मीटर चालण्याची सवय स्वतःला लावून घेतली तर पुणेकरांचा प्रवासासाठीचा मोठा वेळ वाचू शकेल. तसेच, हा प्रवास वातानुकूलित मेट्रोतून होणार आहे. वनाझ ते रुबी हॉल खासगी वाहनाने लागणारा वेळ हा ४५ मिनिटांपासून एक तास असा कितीही असू शकतो. त्याचवेळी मेट्रो मात्र निर्धारित वेळेत तो पूर्ण करणार आहे. सुमारे २५ मिनिटे इतका तो कमी आहे. हीच गोष्ट पिंपरीपासून शहरात येण्यासाठी लागणार्या वेळेची. २५ मिनिटांत पिंपरीहून डेक्कनला येणे शक्य झाले आहे. जानेवारी महिन्यापर्यंत मेट्रो स्वारगेटपर्यंत धावेल. तसेच, रामवाडीपर्यंतचा टप्पाही खुला झालेला असेल. या टप्प्यात येरवडा, कल्याणीनगर हा महत्त्वाचा भाग. तसेच, पिंपरी-चिंचवड भागात जाणार्या प्रवाशांसाठी स्वारगेट भागातील प्रवाशांना मेट्रो उपलब्ध झालेली असेल.
मेट्रो ज्या ठिकाणी जाते, त्या मार्गावर लांब पल्ल्याच्या बस न सोडता, मेट्रो स्थानकांपर्यंत फिडर सेवेची दर दहा मिनिटाला-मेट्रोच्या वेळेत बससेवा दिली, तर प्रवाशांना ते अधिक सोयीचे ठरणार आहे. ‘पीएमपीएल’ तसेच मेट्रो या दोन्हींची प्रवासी संख्या वाढण्यास त्याची मदत होईल. त्यामुळे वाहतूककोंडी कमी होण्याबरोबरच हवेची गुणवत्ता सुधारणार आहे. म्हणूनच मेट्रो, मनपा आणि प्रवासी या तिघांनी प्रचंड इच्छाशक्ती दाखवली, तरच रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत घट होणार आहे.
पुणे हे वाढणारे शहर. म्हणूनच मेट्रोसारख्या पर्यायाची येथे नितांत गरज आहे. मेट्रो हे वाहतुकीचे भविष्य आहे, इतका साधा तर्क लक्षात घेतला, तरी ते पुरेसे आहे!
संजीव ओक