माणसांचा ताळेबंद

    07-Aug-2023
Total Views | 70
Article On Madandas Devi Written By Rashmi Bhatkhalkar

‘मदनदासजी देवी’ या नावाच्या उच्चारातच विलक्षण ‘ऑरा’ सामावलेला आहे. माझ्यासारख्या त्यांना लांबूनच पाहणार्‍या सामान्य कार्यकर्तीला तर परमपूज्य गुरुवर्याच्या रूपात पाहताना मनोमन परिषदेची कार्यकर्ती असल्याचे समाधान वाटले. ‘दिसतं तसं नसतं’ असं बाहेरच्या जगात असतं; पण संघ परिवारात दिसते त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांचे प्रभावशाली असणे असते.

विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ म्हणून काम करताना एकापेक्षा एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभत राहिला. त्यांच्या सहवासातल्या अनेक घटना, कृती जीवनावर अत्यंत परिणामकारक ठरल्या. मदनदासजींना मी एकदा लांबूनच पाहिले होते. त्यांचे भाषणही मी कधी ऐकले नव्हते किंवा त्यांनी एखादे उच्चारलेले वाक्य पण ऐकण्याचा मला योग आला नव्हता. आपण कामाशी जोडलेले कार्यकर्ते कामच करत राहतो, ओळख व्हावी म्हणून आपल्याकडे पुढे पुढे करण्याची पद्धत नाहीच. त्यामुळे त्यांच्याशी ओळख करून घेण्याचा मी ही कधी प्रयत्न केला नाही किंवा तसा संकोच ही वाटला असेल.
 
पुढे १९९३ साली नंदुरबारला मी पूर्णवेळस कार्यकर्ती म्हणून आले. बाळासाहेब जहागीरदार हे नंदुरबारमध्ये संघ परिवारातले मोठे प्रस्थ होते. त्यांच्याकडे माझी राहण्याची सोय होती. त्यांच्याकडे येऊन चार महिने झाले होते. रोज सकाळी काका-काकू आणि मी असा आमचा स्वयंपाकघराच्या टेबलवर ऐकत्र चहा पिण्याचा कार्यक्रम असायचा. त्या सोबत गप्पा आणि मग पुढचा दिनक्रम. एकदा रोजच्याप्रमाणे मी अशीच सकाळी ६.३० वाजता वरच्या खोलीतून खाली उतरले आणि टेबलापाशी येताच जहागीरदार काका-काकू आणि चक्क मदनदासजी दिसले. काही क्षण स्वप्नात आहोत की काय असे वाटले.

पण, त्यांनी माझ्याकडे एखाद्या आरोप्याकडे बघावे तसे पाहिले. त्यांच्या डोळ्यातले भाव मला लगेच समजले. उठायला उशीर झाल्याचे मला त्यांनी जाणवून दिले होते. शरमेने मला काही बोलताही आले नाही. काकांनी माझी ओळख करून दिली. त्यांना लगेच निघायचे होते. आदल्या रात्री उशिरा केव्हातरी ते धुळ्यातला एक कार्यक्रम आटोपून नंदुरबारला मुक्कामी आले होते. सुनियोजित प्रवास नव्हता तो. प्रवासातल्या दोन गाड्यांमधला पहाटेचा हॉल्ट होता. पण, निघताना त्यांनी आठवणीने माझी कानटोचणी केली. “पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे वेळापत्रक हे सकाळी ५.३० वाजता तरी सुरू झाले पाहिजे, म्हणजे दिवस पुरतो. वेळ तर जातच राहतो. तो जास्तीत जास्त उपयोगात आणणे, हाच तर आपल्या कामाचा पाया आहे.” हे एवढेच ऐकवले, पण मला एक संपूर्ण अभ्यासवर्ग ऐकण्याचा लाभ मिळाल्याचे भासले.

खरंच वेळ आणि गती यांची जर सांगड घातली नाही, तर आजचे काम उद्यावर ढकलायला काय लागतं? बिघडणार तर कुणाचेच नाही! ना कुणी जाब विचारणार आणि पुनरुत्थानाचे काम तर आजही आहे आणि जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत राहणार आहे. प्रश्न असतो तो आपल्या स्वतःच्या हिशोबाचा! माणूस म्हणून जन्म तर मिळालाच, पण अखंड आयुष्यभर कार्यकर्ता म्हणून जगायचं स्वीकारलं असेल, तर आपल्याकडून होणार्‍या कार्याची मिळकत काय? जसे उद्योग करताना उद्योजक जागा, कच्चा माल, मशिनरी, कामगार, अन्य खर्च यावर गुंतवणूक करतो आणि त्यातून येणार्‍या मिळकतीबरोबर ताळा करून वर्षाची ‘बॅलेन्स शीट’ बनवतो, तेव्हा त्याला कळते की नफा झाला की तोटा आणि नफा झाला तर त्याचं प्रमाण काय? छोट्या नफ्यासाठी किती वेळ आणि मेहनत लावली? मग या उद्योगात काय बदल केले पाहिजे? असा उद्योजकाला विचार करावा लागतो. त्यातले कर्तृत्वान उद्योजक पुढे जातात, मोठे उद्योगपती बनतात. काहींचे ‘चलती का नाम गाडी’ असे चालू राहते. काही जण एका वर्षांच्या प्रगतीला पाच वर्षं लावतात. हे जसं उद्योजकांच्या बाबतीत घडतं तसंच ते कार्यकर्त्यांच्या बाबतीतही घडलं पाहिजे.

तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तुमच्याकडून लावला जाणारा वेळ, तुमच्याकडून राबविण्यात येणारे कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प, त्यासाठी किती जणांना संपर्क करता? किती जणांना कामाशी जोडता? किती जणांना कार्यकर्ता म्हणून उभे करता? वर्षभरात किती कार्यकर्ते उभे केले? अशी जेव्हा माणसांची ‘बॅलेन्स शीट’ दरवर्षी आपल्याला तयार करण्याची वेळ येईल, तेव्हा ती नफ्यात ठेवण्यासाठी नक्कीच सकाळी ५.३० वाजता उठावे लागेल.

मदनदासजी असेच जगले, ‘एलएलबी’, ‘सीए’ असे दुहेरी पदवीधर. हिशोबाने काम केले, म्हणून अखंड प्रवास करत राहिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला खर्‍या अर्थाने ‘अखिल भारतीय’ बनविले. कार्यकर्ता व्यवहाराची प्रारूप, पुस्तके ते प्रत्यक्षात जगले. या त्यांच्या अखंड प्रवासात कित्येक कार्यकर्त्यांना त्यांचा परीस स्पर्श झाला असेल. कार्यकर्त्यांच्या आयुष्याचे सोने व्हावे म्हणून नाही, तर त्यांनी या धरतीचे सोने करावे म्हणून...

त्यांच्या अनंत स्मृतींना विनम्र अभिवादन...

रश्मी भातखळकर

अग्रलेख
जरुर वाचा
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखावा आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी.सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121