साधारणपणे १९९३-९४ साल असेल. मी ’किर्लोस्कर कंपनी’च्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. रविवार होता. त्यामुळे दिवसभर काय करायचे, हा प्रश्न होता. म्हणून ठरवले की, दिल्लीच्या झंडेवाला संघ कार्यालयात जावे. तशी काही ओळख नव्हती; पण धडकून यावे. ही मनीषा होती.
तिथे जे कार्यालय प्रमुख होते, त्यांना भेटलो आणि माझा परिचय करून देऊ लागलो. ‘मै पुणे के नजदिक कराड महाराष्ट्र का स्वयंसेवक हूँ’ तेवढ्यात मागे बसलेली व्यक्ती म्हणाली, “अरे वा, म्हणजे तुम्ही आपल्या महाराष्ट्रातले की?” माझी विस्मणशक्ती जोरदार. चेहरा ओळखीचा वाटतोय; पण नाव आठवत नाही. मी म्हटले, “मी कराडचा स्वयंसेवक आहे.” मराठीत उत्तरलो. “आपला परिचय काय?” ते म्हणाले, ‘’मी मदनदास. मदनदास देवी, सोलापूरचा आहे.” मग माझी ट्यूब पेटली. आमच्या बर्याच गप्पा झाल्या. कार्यालय पाहून घेतले. तेथील विशेष गोष्टी ऐकल्या. परमपूज्य डॉ. हेडगेवार यांच्या पुतळ्याला नमस्कार केला. कार्यालयात प्रांतशः साप्ताहिक शाखा चालत असत, हे ऐकून आश्चर्य वाटलं.
माझी आणि मा. मदनदासजी यांची ही पहिली भेट. त्यानंतर महाराष्ट्रातील एका संघ शिक्षा वर्गात भेट झाली. त्यावेळी मी त्यांना ‘दिल्लीत आपण अचानक भेटलो होतो’ अशी आठवण करून दिली. त्यानंतर परत काही वर्षांनी अशाच एका संघ शिक्षा वर्गात भेटलो. त्यावेळी ते मला हसून म्हणाले, ‘दिल्लीवाले.’ त्यानंतर बरीच वर्षे गेली. माझी आणि त्यांची भेट एकदम प्रशांती कुटिरम बंगळुरु येथे मे २०१२ साली झाली. त्यांना पॅरालिसीस झाल्याने ते विश्रांतीसाठी तेथे असत. त्या वर्गात बरेच स्वयंसेवक आणि सेविका आल्या होत्या. आमचे प्रार्थनेच्या निमित्ताने रोज संध्याकाळी एकत्रीकरण होत असे.
एकदा असेच मी मदनदासजींना म्हणालो, “आता आमचे वर्गातले दिवस संपत आले आहेत, तर तुमच्या खोलीत एकत्रीकरण करूया का?” त्याला त्यांनी होकार दिला. तिथे जे काही संघ संबंधित लोक आले होते, त्या सर्वांना ठरलेल्या दिवशी सायंकाळी ४ वाजता स्वतःकडे असलेला चिवडा घेऊन मदनदासजींच्या खोलीत बोलवले. प्रशांतीमध्ये आंब्याची झाडे खूप होती. अखिलेश नावाचा एक बाल त्याच्या आजोबांबरोबर आला होता. त्याला कैर्या आणायला सांगितल्या होत्या. सर्व चिवडा एकत्र करून त्यावर आंब्याच्या फोडी टाकल्या आणि मदनदासजींच्या उपस्थितीत चंदनाचा जोरदार कार्यक्रम झाला. नंतर मदनदासजींबरोबर चहापान झाल्यावर त्यांनी अर्धा एक तास आमच्याशी संवाद साधला. ‘संघकार्य अमृत हैं, तो हम अमृत के बिंदू हैं’ अशा धर्तीचे संबोधन सर्वांच्याच मनाला भावले. अनेक प्रांतातले स्वयंसेवक आले असल्यामुळे, तो बहारदार कार्यक्रम सर्वांच्याच लक्षात राहिला.
पुढे लगेचच मे २०१४ मध्ये पुन्हा प्रशांती कुटिरममध्ये पुन्हा एकदा भेट झाली. त्यावेळी ते थोडे अशक्त वाटले. मी त्यांना भेटायला गेल्यावर माझ्या कुटुंबाची चौकशी केली आणि माझ्या मुलीला अर्पिताला संस्कृतची आवड आहे सांगितल्यावर, हे लक्षात ठेवून चमू कृष्णशास्त्री (सहसंस्थापक, संस्कृत भारती) यांची भेट घालून दिली. कार्यकर्त्याच्या कौटुंबिक गरजा लक्षात घेऊन त्याला मदतीचा हात देणे, हा मदनदासजींचा स्वभाव मला भावला.
एकदा अचानक एक संकट माझ्यासमोर उभे राहिले. प्रार्थनेला माझ्या मागे मदनदासजी उभे होते. प्रार्थना जवळजवळ संपत आली होती आणि मदनदासजींनी अचानक माझा खांदा पकडला. त्यातून मी एक दिव्यांग. काय करावे ते सूचेना. हळुवार मागे वळलो आणि त्यांना आधार द्यायचा प्रयत्न केला. इतर स्वयंसेवकांच्या लक्षात आल्यावर त्यांना व्यवस्थित आधार दिला गेला आणि व्हीलचेअरवर बसवले. पण, त्यावेळी मी मात्र क्षणभर घाबरलो होतो. काही विपरित माझ्याकडून घडले असते तर? हे लिहिताना अजूनही छाती भरून येते.
पुढे मात्र त्यांची आणि माझी प्रत्यक्ष भेट झाली नाही. त्यांचा स्वीय साहाय्यक आणि संघ प्रचारक अमोल विठले यांच्याशी मी सातत्याने संपर्कात असे. आता नुकताच दि. ९ जुलैला मी अमोलजींना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी सांगितले, आम्ही बंगळुरूच्या राष्ट्रोत्थान हॉस्पिटलमध्ये आहोत आणि मदनदासजींची प्रकृती स्थिर आहे.
त्यानंतर १५ दिवसांनी मदनदासजींच्या मृत्यूची बातमी ऐकून मन थार्यावर राहिले नाही. वरील सर्व आठवणी डोळ्यासमोर सारख्या येत राहिल्या आणि मन दुःखी झाले.
मदनदासजींना शत शत नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हरी ओम तत्सत्...
केदार गाडगीळ