‘समृद्ध’ महाराष्ट्राची भाग्यरेषा

    14-Aug-2023   
Total Views |
 Samruddhi Highway
दि. १० डिसेंबर, २०२२ रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण संपन्न झाले. अनेक नावीन्यतापूर्ण बाबींचा समावेश, प्रगत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, पर्यावरण आणि विकास यात समतोल साधून साकारलेला असा हा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग.’ राज्यातील दुर्लक्षित आणि विकासापासून वंचित भागांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न, यातून देशातील पायाभूत प्रकल्पांमधील समृद्धी महामार्ग हा मैलाचा दगड ठरावा. तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला असा हा प्रकल्प सर्वार्थाने महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरला आहे. त्याविषयी...

शातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे राज्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्राला सर्वांगीण दृष्टीने प्रगतिपथावर आणण्यासाठी अनेकांनी हातभार लावला. २०१४ साली राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचे शिवधनुष्य हाती घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी यांना जोडण्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची धुरा हाती घेतली. राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू केले. राजकीय पाठबळ, प्रशासनावर पकड, केंद्र सरकारशी असलेले सलोख्याचे संबंध यांना आपल्या कल्पकतेची जोड देत फडणवीसांनी ’समृद्धी’चे महास्वप्न प्रत्यक्षात साकार करुन दाखविले. तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचे विकासाचे ‘व्हिजन’ आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ऑनफिल्ड’ उतरुन काम करणे, या सुसूत्र नियोजनातून साकारलेला असा हा महाप्रकल्प.

नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे डिसेंबरमध्ये लोकार्पण केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत मेमध्ये प्रकल्पाचा ८० किलोमीटरचा दुसरा टप्पाही जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. तेव्हा समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याविषयी जाणून घेऊयात!समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भरवीरपर्यंत असणार आहे. ८० किलोमीटर लांबीच्या या रस्त्यात सात मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग आणि हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. यावर तीन टोल गेट असणार आहेत. सिन्नर येथील गोंदे इथून नाशिक आणि पुणे भागात जाण्यासाठी नागरिकांना फायदा होईल. घोटी तालुका इगतपुरीपासून भरवीरजवळचा इंटरचेंज हा अंदाजे १७-१८ किमीचा आहे. या इंटरचेंजमुळे शिर्डीकडे जाणार्‍या प्रवाशांना फायदा होईल. शिर्डी ते भरवीर पूर्वी अडीच तासांत होणारा प्रवास ‘समृद्धी महामार्गा’मुळे ३० ते ३५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. मे महिन्यात खुला करण्यात आलेल्या या दुसर्‍या टप्प्यामुळे एकूण ७०१ किलोमीटर लांबी असलेल्या महामार्गातील ६१० किलोमीटरचा मार्ग प्रवाशांना वाहतुकीसाठी उपलब्ध झाला आहे.


 Samruddhi Highway


देशासह जगभरात नावाजल्या जाणार्‍या या महामार्गाला मागील काही महिन्यांपासून अपघातांच्या मालिकेमुळे वेगळ्याच चर्चेला आणि आरोपांना सामोरे जावे लागले. महामार्गावर वेगवान गतीने धावणार्‍या गाड्या आणि त्यातून होणारे अपघात यामुळे मनुष्यहानी होत असून प्रकल्पाच्या आखणीवेळी झालेल्या चुकांमुळे लोक मृत्युमुखी पडत असल्याचा दावाही काही मंडळींनी केला. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही याची शाश्वती तथ्यात्मक बाबी पडताळून पाहिल्या, तर सहजगत्या लक्षात येईल. रात्रीच्या वेळी सुसाट वेगाने धावणार्‍या गाड्या, अवजड वाहनांमुळे छोट्या वाहनांना होणार्‍या अडचणी, काही मद्यधुंद चालकांमुळे निष्पाप जीवांशी होणारा खेळ आणि गाड्या पळवण्याची राक्षसी स्पर्धा, यामुळे होणार्‍या अपघातात निरपराध नागरिक मृत्युमुखी पडतात. त्याला समृद्धी महामार्गदेखील अपवाद नाही. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेने घर्षण होऊन टायरफुटी, प्राणी रस्त्यावर आल्यामुळे, चालकाला डुलकी लागल्यामुळे, तांत्रिक बिघाड हीदेखील अपघातांमागची काही प्रमुख कारणे आहेत.


परंतु, अशा असंख्य कारणामुळे होणार्‍या अपघातांची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर ढकलून काही जाणत्या नेत्यांनी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मनाचा खुजेपणा दाखवत सरकारवर टीका केली. पण, जनता जागरूकतेने या सर्व गोष्टींचे मूल्यमापन करते आणि त्यावर उत्तरही देते, हे कथित जाणत्या नेत्यांच्या लक्षात राहील नसावं. असो. तर समृद्धी महामार्गावर होणार्‍या अपघातांवर आळा घालण्यासाठी महामार्गाच्या आखणीपासूनच काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात आता आणखी भर टाकण्यात आली आहे. ‘समृद्धी महामार्गा’च्या दुसर्‍या टप्प्यातील रस्त्यांवर अपघात टाळण्यासाठी आणि अपघाताची तीव्रता कमी करण्यासाठी दुसर्‍या टप्प्यात २४४ ठिकाणी रस्त्याच्या कडेला अन् दुभाजकांवर ‘इम्पॅक्ट एटेन्यूएटर’ उपकरणे बसवण्यात आली आहेत. या उपकरणांमुळे परस्परांना धडकणार्‍या वाहनांची गतीज ऊर्जा शोषली जाणार असून, त्यातून अपघाताची तीव्रता कमी होणार आहे. तसेच अपघातात प्रवासी समोरील बाजूला आदळण्याचे प्रमाणही यामुळे आटोक्यात येणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.


समृद्धी महामार्ग दृष्टिक्षेपात...
  • मुंबई ते नागपूर ८१२ किलोमीटर अंतर कापण्यासाठी १४ तासांऐवजी आठ तास लागतील.


  • ७०१ किमी इतकी या महामार्गाची लांबी. छ. संभाजीनगर ते नागपूर प्रवासासाठी चार तास आणि छ. संभाजीनगर ते मुंबई प्रवासासाठी चार तास लागतील.


  • प्रकल्पाचा अंदाजे खर्च ५५ हजार, ४७७ कोटी रुपये

  • नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छ. संभाजीनगर, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून जाणारा महामार्ग

  • राजधानी अन् उपराजधानी एकाच मार्गावर

  • दोन दशकांत होणार २० लाख रोजगार निर्मिती

  • शहरांसोबत गावखेडीही विकासपथावर

  • सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांना समृद्धतेने जोडणारा दुवा

  • पर्यटन वाढीसाठी होणार मोठी मदत

  • प्रादेशिक असमतोल निष्ठ करण्यात बजावणार मोठी भूमिका

  • लोणार सरोवर, वेरूळ अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान महामार्गामुळे जवळ येणार

  • तसेच बुलढाणा जिल्ह्यातील गजानन महाराज शेगाव आणि नगर जिल्ह्यातील शिर्डी ही महत्त्वाची धार्मिक स्थळे जोडली जाणार

  • वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम, छ. संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक स्थळे महामार्गाच्या कवेत
अपघात रोखण्यासाठीच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना
  • २४४ ठिकाणी ‘इम्पॅक्ट एटेन्यूएटर’ उपकरणे तैनात

  • वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी १५ वाहतूक कक्षांची उभारणी

  • टायर तपासणी केल्यानंतरच वाहनांना महामार्गावर प्रवेश देण्याचा नियम

  • महामार्गावर प्रवेश करण्यापूर्वी वाहनचालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझर चाचणी होणार; मद्यपींवर आला घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

  • वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिमापक यंत्रे कार्यान्वित
जग दाखवणारा महामार्ग!


महाराष्ट्रात भरभराट, संपन्नता, ऐश्वर्य, वैभव आणि सुबत्ता आणेल असा विश्वास देऊ करणारा महामार्ग म्हणून ‘समृद्धी महामार्गा’कडे पाहिलं जात आहे. त्यामुळे पुढचे जग दाखवणारा महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाला भविष्यातही ओळखले जाईल, असा मला विश्वास आहे. रस्ते हे विकासाचे वाहक असतात, हे वैश्विक सत्य जिथे प्रत्यक्षात अवतरले, तो नागपूर-मुंबई या दोन महानगरांना जोडणारा महामार्ग म्हणजे ‘समृद्धी महामार्ग’ आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न मी दोन दशकांपूर्वी पाहिले होते आणि त्यात या महामार्गाची संकल्पना माझ्या डोक्यात घोळत होती. ही संकल्पना प्रत्यक्षात यायला मी मुख्यमंत्री असताना मुहूर्त लाभला. केवळ ’अतिवेगवान वाहतुकीचा रस्ता’ इतके मर्यादित उद्दिष्ट डोळ्यांसमोर न ठेवता, अत्याधुनिक पायाभूत सेवासुविधा प्रवाशांना या महामार्गाच्या अनुषंगाने पुरवल्या जाणार आहेत. येत्या दोन दशकांत २० लाख रोजगारांची निर्मिती करून विकासाचे नवे मॉडेल राज्यात आणण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे. राज्यातील वंचित विभागांना मुख्य प्रवाहाशी जोडून, अधिग्रहित होणार्‍या जमिनीचा वाजवी आणि योग्य मोबदला देत शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करून, पर्यावरणपूरक विकास साधत राज्यात समृद्धी आणणारा हा महामार्ग आहे. विकास, उद्योग, शेतकर्‍यांच्या सोयीसुविधा, नव्या शहरांची निर्मिती, पर्यावरणाचे संतुलन साधून केलेला हा प्रकल्प जग दाखवणारा महामार्ग आहे.

- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.