मुंबई : मराठी चित्रपटांचे कथानक कायमच प्रेक्षकांना कसे बाधून ठेवता येईल याचा विचार करत बांधले जाते. प्रेमपट किंवा ऐतिहासक पट जितके प्रेक्षकांच्या मनाला भावतात तितकाच भयपट प्रेक्षकांची पसंती मिळवतोच. असाच एक धमाल विनोदी भयपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सुस्साट' या नव्या विनोदी भयपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अव्वल विनोदी कलाकार सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब एकत्रित येत प्रेक्षकांना हसवणार आहेत.
अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट,ए बी इंटरनॅशनल, मर्ज एक्स आर स्टुडिओ आणि डीएनए पिक्चर्स घेऊन येणाऱ्या 'सुस्साट' या चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच लंडनमध्ये सुरु झाले आहे. 'सुस्साट' हा हॉरर कॉमेडी चित्रपट अंबर विनोद हडप यांनी लिहिला असून विशाल देवरुखकर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव,प्रथमेश परब यांच्यासोबत अभिनेत्री विदुला चौगुले पहिल्यांदाच हटके भूमिकेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहे. इतकेच नाही तर, विजय केंकरे आणि शुभांगी लाटकर यांच्यासारखे वरिष्ठ कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटाच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एका जुनाट प्रथेचा पर्दाफाश धमाल पद्धतीनं केला जाणार आहे.