धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला सर्पदंश

    11-Jul-2023
Total Views |
One Person died due to snake bite

मुंबई : पावसाळ्यात धरणात व नदीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असतानाच आता धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाला सर्पाने दंश केल्याने त्याचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे. चिपळूण येथे मित्रांसोबत आपल्या गावाकडे सहलीसाठी आलेल्या मुंबई-घाटकोपर येथील एका व्यक्तीला कळवंडे धरणात आंघोळ करताना पाण्यातच तीनवेळा सर्पदंश झाला व डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले. ही घटना रविवार दि. ९ जुलै रोजी सायंकाळी घडली. मुंबई घाटकोपर येथून पाच मित्र विकेंड असल्याने दोन दिवसापूर्वी पावसाळी सहलीसाठी संगमेश्वर परिसरातील आपल्या गावी आले. तेथे फिरून रविवारी ते चिपळूण येथे आले. दुपारी ३ वाजता खानपान करुन ते कळवंडे धरणावर आंघोळीला गेले.
 
दरम्यान, संजय तुकाराम कापरट (४६, रा. घाटकोपर, मुंबई) याला पोहताना सापाने पाण्यातच तीनवेळा दंश केला. सुरवातीला ते त्यांला समजले नाही, परंतु नंतर अंगात विष चढू लागल्याने तो अस्वस्थ झाला. त्याला प्रथम लाईफ केअर येथे आणण्यात आले, परंतु तेथे उपचारासाठी वेळ लागणार असल्याने त्याला कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्याला डेरवण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत शरीरात विष पूर्णपणे भिनले होते. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. शवविच्छेदन केल्यावर तीनवेळा सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचे पार्थिव मुंबई येथे नेण्यात आले.