मुंबई : साहित्य अकादमीचे २०२३ सालचे युवा पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. पुरस्कारांसाठी मराठी विभागाअंतर्गत ७ नामांकने होती तर बालसाहित्य पुरस्कारासाठी ५ नामांकने जाहीर झाली होती. त्यापैकी विशाखा विश्वनाथ यांच्या 'स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना' या काव्यसंग्रहाला युवा साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच बालसाहित्य विभागात एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद' या काव्यसंग्रहाला पुरस्कार मिळाला आहे.
युवा साहित्य पुरस्कारासाठी देविदास सौदागर यांची 'उसवण' कादंबरी, समृद्धी केरकर यांचे 'निसर्ग संवेदना' निबंध, श्वेता पाटील यांची 'आपल्याला काय त्याचे' कादंबरी, स्वप्नील चव्हाण यांच्या 'रज्जूत मज्जा' हा ललित कथा संग्रह, वैभव भिवर्कर यांचा 'करुणेचे कॉपीराइट्स' हा काव्यसंग्रह आणि विनायक होगाडे यांच्या 'डिअर तुकोबा' या कादंबरीला नामांकने मिळाली होती. तर बालसाहित्य पुरस्कारांमध्ये 'चुटकीचे जग' हि फारुख काजी यांची कादंबरी, दौलतबंकी आणि त्याचा खजाना' हि बबन मिंडे यांची कादंबरी, 'जादूकी झप्पी' या प्रदीप आवटे यांच्या ललित कथा, 'नदी रुसली, नदी हसली' सुरेश सावंत यांचा काव्यसंग्रह आणि 'सुंदर माझी शाळा' या गणेश घुले यांच्या काव्यसंग्रहाला नामांकने जाहीर झाली होती.
एकूण २० भारतीय भाषांतील पुरस्कार जाहीर झाले आहेत, मणिपुरी मैथिली आणि संस्कृत भाषेतील पुरस्कार अजून जाहीर व्हायचे आहेत. प्रत्येक भाषेतील ३ जेष्ठ लेखकांच्या चमूने हे पुरस्कार निवडले आहेत. मराठी भाषेतील पुरस्कार निवडण्याच्या समितीत डॉ. अक्षय कुमार काळे, साहित्यिक बाबा भांड आणि डॉ. विलास पाटील यांचा समावेश होता. तर बालसाहित्य पुरस्कार निवडीच्या समितीत डॉ. कैलास अंभुर्णे, उमा कुलकर्णी आणि शफाअत खान यांचा समावेश होता.
आपण व्यक्त होण्यासाठी म्हणून लिहीत जातो, हळूहळू आपल्याला कळत, माझं जे वाटणं आहे ते कित्येकांचा वाटणं आहे. स्वतःची वेदना प्रातिनिधिक स्वरूपात इतरांच्या भावनाना शब्दबद्ध आपण करत असतो. हे जर आपल्याला करता येत असेल तर ते आपण करायला हवं. कविता मला करता येते, सुचते त्यामुळे हा एकप्रकारचा आशीर्वादच लाभला आहे मला. मी माझ्या पिढीतल्या कित्येक जणांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करते असं मला वाटतं. आणि हे करत असताना आपल्यानावापुढे साहित्यिक लागणं हा माझ्यासाठी नक्कीच सुखद धक्का आहे.
-विशाखा विश्वनाथ