मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गारपीट नुकसानीची पाहणी

मराठवाड्यात नुकसानग्रस्तांसोबत शिंदेंची चर्चा, आठवडाभरात मदत जाहीर करण्याचे आश्वासन

    12-Apr-2023
Total Views | 51
/cm-eknath-shinde-visits-unseasonal-rain-hited-area

मुंबई
:- अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्यातील क्षेत्राला गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील गारपीट नुकसानीची पाहणी करत बळीराजाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात ९ एप्रिल रोजी वादळी वारा, गारपीटीसह ढगफुटीसदृश पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाऊन पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असून पंचनामे पूर्ण झाल्यावर आठवड्याभरात तुम्हाला मदत दिली जाईल अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली.

अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अनेक भागांना मोठा फटका बसला होता. यातील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. या गावातील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या घरांची या पावसात मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. या पडझड झालेल्या घरांची पाहणी करून मुख्यमंत्र्यांनी या गरीब शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात तात्काळ उभारणी‌ करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच वनकुटे मधील पडझड झालेल्या‌ २२ कुटुंबाना तात्काळ शबरी घरकुल योजनेमधून घरकुल घरे उपलब्ध करून देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

अवकाळी पावसाने या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली आहेत. झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावेत असेही त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला सांगितले.

यावेळी भेटीनंतर शेतकरी बांधवांशी संवाद साधताना झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून घ्यावे. ते प्राप्त झाल्यानंतर आठवडाभरात तुम्हाला झालेल्या नुकसानीची भरपाई देऊ असे सांगून शिंदे यांनी त्यांना आशवस्त केले. त्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला यावेळी १० किलो गहू व तांदळाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटपही करण्यात आले.

कोणत्याही परिस्थितीत सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या नैसर्गिक आपत्तीवेळी त्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. यापूर्वी देखील झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींची मदत कालच जाहीर केली असून आजवर सर्वाधिक म्हणजे १००० कोटींचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले असल्याचे देखील यावेळी बोलताना सांगितले.

याप्रसंगी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, शिवसेना प्रवक्ते संजीव भोर, शिवसेना भाजपा चे स्थानिक पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

धाराशिवमध्ये शिंदेंचा शेतकऱ्यांशी संवाद

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मोर्डा आणि वाडी बामणीला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वादळ आणि अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला.

मोर्डा गावातील सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे या दांपत्याच्या द्राक्ष बागेच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. दोन एकर क्षेत्रावरील ही द्राक्ष बागायत ८ एप्रिलच्या वादळी पावसाने भुईसपाट झाली होती. या दांपत्याची भेट घेऊन मुखमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी या दाम्पत्याने कोणकोणते कर्ज घेतले आहे याची त्यांनी विचारपूस केली. पूर्णपणे सपाट झालेल्या या द्राक्ष बागेची पाहणी करून लवकरात लवकर मदत करण्यात येईल असे सांगून शिंदे यांनी त्यांना आशवस्त केले.

यानंतर वाडी बामणी या गावातील बाबासाहेब उंबरदंड यांच्या शेतातील कलिंगड, ड्रॅगन फ्रुट पिकाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली. तसेच पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर झाल्यानंतर लवकरात लवकर मदत केली जाईल असेही त्यांनी त्यांना सांगितले. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत, तुळजापूरचे आ. राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121