मुंबई : ‘धर्मवीर.. मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाच्या यशानंतर आता ‘धर्मवीर २.. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित ‘धर्मवीर २’ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच सुरु झाले असून चित्रकरणाची पहिली झलक समोर आली आहे.
‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई यांनी धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक याचे काही फोटो सोशल मिडियावर एक पोस्ट केले आहेत. ज्यात त्यांनी या चित्रपटाच्या चित्रिकरणाचे काही खास क्षण शेयर करत चाहत्यांनी माहिती दिली आहे. त्याबद्दल त्यांनी लिहिले आहे की, “ ‘धर्मवीर’ च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि '' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ''धर्मवीर - २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट'' या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर आज चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे.लवकरच अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यामुळे सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत आपल्या भेटीला...!!
हिंदुत्व हे हिंदुस्थानातील प्रत्येकाचे सर्वस्व असायला हवे – प्रसाद ओक
“हिंदुत्व हे हिंदुस्थानातील प्रत्येकाचे सर्वस्व असायला हवे. माझ्यासाठी हिंदुत्व हा माझा प्राण आहे. मी हिंदुस्थानात राहतो. मी हिंदु असल्याचा मला दर्व आणि अभिमान आहे. आणि जी-जी माणसं हिंदुत्वासाठी झटत, सोसत आली आहेत, ती प्रत्येक माणसं माझ्या मनात देवाच्या जागी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे या सगळ्यांसाठीच मनात अपार अभिमान आहे. हिंदुत्व मोठं करण्यासाठी आणि जपण्यासाठी ज्यांनी कष्ट केले आहेत त्यांना माझा मुजरा आहे”.