नवी दिल्ली : पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भात शुक्रवारी लोकसभेत ठराव मंजूर करण्यात आला. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला, त्याला सभागृहाने आवाजी मतदानाने मंजुरी दिली.
तृणमूल खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी लोकसभेच्या आचार समितीने केली होती. या समितीचा सुमारे ५०० पानांचा अहवाल शुक्रवारी लोकसभेत मांडण्यात आला. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खासदार महुआ मोईत्रा यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला.या प्रस्तावावर सुमारे १ तास चर्चा झाली. यावेळी तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी गदारोळ करून कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. चर्चेनंतर लोकसभेत आवाजी मतदानाने महुआ मोईत्रा यांच्या निलंबनाचा प्रस्ताव बहुमताने मंजुर करण्यात आला. त्यामुळे आता तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोईत्रा यांना त्यांची खासदारकी गमवावी लागली आहे.
प्रस्तावावरील मतदानात भाग घेण्यापूर्वीच विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभात्याग केला. सभागृहाबाहेर माजी खासदार महुआ मोईत्रा यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, आपल्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता. मात्र, तरीदेखील मोदी सरकारसाठी अदानी उद्योग समुह महत्त्वाचा असल्यानेच या कांगारू न्यायालयाने आपल्याला निलंबित केले आहे. मात्र, तरीदेखील आपला लढा सुरूच राहणार असल्याचे मोईत्रा यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरोधात मोदीसरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
कारवाई नियमाप्रमाणेच – प्रल्हाद जोशी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री
महुआ मोईत्रा यांच्याविरोधातील कारवाई ही नियमाप्रमाणेच झाला आहे, असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, यापूर्वी २००५ साली पैशाच्या बदल्यात प्रश्न विचारल्याप्रकरणी १० खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यावेळीदेखील ज्या दिवशी अहवाल मांडला होता, त्याच दिवशी खासदारांनी निलंबित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संबंधित खासदारांनी समितीसमोर बाजू मांडण्याची संधी मिळाल्याचे सांगून तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी त्यांना निलंबन प्रस्तावावरील चर्चेस भाग घेऊ देण्यास नकार दिला होता. त्याचप्रमाणे आजच्या प्रकरणात आपल्याला महागड्या भेटवस्तू मिळाल्याचे, परदेश प्रवास केल्याचे मोईत्रा यांनी कबूल केले आहे. तसेच हिरानंदानी यांनीदेखील मोईत्रा यांचा खर्च केल्याचे कबूल केले आहे. मोईत्रा यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघाशी संबंधित एकही प्रश्न विचारलेला नाही, तसेच युझर आयडी व पासवर्ड अन्य व्यक्तीस दिल्याचेही मोईत्रा यांनी कबुल केले असल्याचे केंद्रीय मंत्री जोशी यांनी म्हटले आहे.
या आहेत अहवालातील शिफारसी
लोकसभेच्या आचार समितीने तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार यांच्या वर्तनावर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत. महुआ मोईत्रा यांनी अत्यंत आक्षेपार्ह, बेकायदेशीर आणि जघन्य अपराध केला आहे. समितीने या प्रकरणी महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई आणि कालबद्ध चौकशीची शिफारस करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
लोकसभेचे पावित्र्य राखणे गरजेचे – ओम बिर्ला, लोकसभा अध्यक्ष
संसदेचे पावित्र्य कायम राखणे अतिशय आवश्यक आहे. कारण, जगभरात भारतीय लोकशाही या पावित्र्यामुळेच वाखाणली जाते. देशाचा विकास तसेच आपल्या नागरिकांच्या आशा – आकांक्षा पूर्ण करण्यासाठी खासदारांना निवडून दिले जाते. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी काम करणे हे प्रत्येक खासदाराचे सर्वांत पहिले कर्तव्य आहे. खासदारांनी आपले प्रश्न स्वत:च तयार करणे आणि लोकसभेपुढे ठेवणे आवश्यक आहे. खासदारांऐवजी अन्य कोणी व्यक्ती ते काम करू शकत नाही. त्याचप्रमाणे लोकसभेचे पावित्र्य जपण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला म्हणाले.
‘चीरहरण’ झाल्याचा महुआ मोईत्रा यांचा कांगावा - हिना गावित, भाजप खासदार
महुआ मोईत्रा यांच्या कृत्यामुळे जगभरात भारतीय खासदारांची प्रतिमा मलिन झाल्याचे भाजप खासदार हिना गावित यांनी चर्चेदरम्यान सांगितले. त्याचप्रमाणे मोईत्रा यांनी केवळ अदानी समूहाशी संबंधित ६१ प्रश्न विचारले असून त्यापैकी ५० प्रश्न हे दर्शन हिरानंदानी यांनी दिलेले होते. त्यांच्या युझरनेम व पासवर्डचा ४७ वेळा दुबई येथून वापर झाला आहे. त्याचप्रमाणे ६ वेळा अमेरिका, युके आणि नेपाळमधू प्रश्न अपलोड करण्यात आले आहेत. तसेच समितीने महुआ मोईत्रा यांना कोणतेही व्यक्तीगत प्रश्न विचारले नसून त्यांचा ‘चीरहरण’ होत असल्याचा दावा हा कांगावा आहे, असेही खासदार गावित म्हणाल्या.