नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज शुक्रवारीदेखील विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे तहकुब करावे लागले. दरम्यान, सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदुरवरील चर्चेस प्रारंभ होणार आहे.
शुक्रवारी लोकसभेच्या कामकाजात विरोधकांच्या गोंधळामुळे व्यत्यय निर्माण झाला आणि अखेर संपूर्ण दिवसभरासाठी सभागृह तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाज आता २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुरु होईल. त्याचप्रमाणे राज्यसभेचेही कामकाज विरोधकांच्या गोंधळामुळे दुपारनंतर दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.
लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व सदस्यांना सभागृह सुरळीतपणे चालवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. बैठकीदरम्यान ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर विशेष चर्चेचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून यासाठी १६ तासांची चर्चा २८ जुलैला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विरोधकांनी बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर वर संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी केली असून यामुळे दोन्ही सभागृहांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षांनी चर्चा व संवादाच्या माध्यमातून कामकाज पार पाडण्याचे आवाहन केले असून प्रश्नोत्तराचा तास देखील सुरू ठेवण्यावर भर दिला आहे.